ऑलिम्पियन प्रवीण जाधवचं कुटुंब सातारा जिल्हा सोडणार; जाणून घ्या नेमकं कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Archer Pravin Jadhav

सरडे (ता. फलटण) येथील प्रवीण रमेश जाधव हा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आणि सरडे गाव प्रसिध्दीच्या झोतात आले.

ऑलिम्पियन प्रवीण जाधवचं कुटुंब सातारा जिल्हा सोडणार

फलटण शहर (सातारा) : टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) धनुर्विद्या खेळाडू म्हणून पात्र ठरलेल्या प्रवीण जाधवमुळे (Archer Pravin Jadhav) सरडे गावचे (ता. फलटण) नाव जागतिक पातळीवर चर्चेचे ठरले. प्रतिकूल परिस्थिती व भूमिहीन असलेल्या या जाधव कुटुंबास घर बांधण्याच्या कारणावरुन गावातील काहीजण दमदाटी करुन जेसीबीने घर पाडण्याच्या धमक्या देत असल्याने सध्या हे कुटुंब भितीच्या छायेखाली असून ते सरडे गावासह सातारा जिल्हाच सोडण्याच्या मानसिकतेमध्ये आहे.

सरडे (ता. फलटण) येथील प्रवीण रमेश जाधव हा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आणि सरडे गाव प्रसिध्दीच्या झोतात आले. प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द, चिकाटी व खडतर परिश्रमाच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, स्थानिक पुढारी, ग्रामस्थांनी त्याची अगदी तोंड फाटे पर्यंत स्तुती तर केलीच, परंतु त्याच्या आई-वडिलांचा सत्कार करुन तुम्हाला काही अडचण असेल, तर आम्ही पाठीशी आहोत, अशी ग्वाही दिली. परंतु, प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळेच आहे. प्रवीणचे आजोबा व आजी हे दोघेही शेती महामंडळामध्ये कामाला होते. निवृत्तीनंतर त्यांनी मिळणारी फंडाची रक्कम न घेता शेती महामंडळाकडे घरासाठी जागेची मागणी केली होती. महामंडळातील तत्कालीन एका अधिकाऱ्याने त्यांना शेती महामंडळाच्या जागेत तोंडी घर बांधण्यास सांगितले. तेथे प्रवीणच्या वडिलांनी एक खोपट बांधले. प्रवीणचे वडील रमेश जाधव व आई संगीता जाधव हे आजही मजुरी करतात. प्रवीण सैन्यदलात भरती झाल्यानंतर व आर्चरीच्या निमित्ताने थोडेफार पैसे जमेल तसे पैसे प्रवीण वडिलांना पाठवीत होता, त्यातून वडिलांनी दोन खोल्यांचे बांधकाम केले.

Pravin Jadhav Home

Pravin Jadhav Home

या दोन खोल्यांपैकी एक खोली चुलत्यांना दिली व एकामध्ये प्रवीणचे आई-वडील राहतात. सदर घराशेजारील शेती महामंडळाच्याच जागेत प्रवीणने बंगलावजा घराचे काम सुरु केले होते, पाया खांदला, साहित्यही आणले. परंतु, आसपासच्या काहींनी दमदाटीने सदर काम रस्त्याचे कारण सांगून बंद पाडले. या नंतर हे काम पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न प्रवीणच्या वडिलांनी केला असता, त्यांना बांधकाम न करण्याविषयी धमकाविण्यात आल्याने व हे कुटुंब सध्या भितीच्या छायेखाली आहे. मुलाने ज्या गावाचा नावलौकिक जागतिक स्तरावर वाढवला तेथेच दमदाटीची भाषा होवू लागल्याने भेदरलेले हे कुटुंब सध्या सरडे गावच काय, पण सातारा जिल्हाच सोडून प्रवीणच्या आईचे माहेर जिरेगाव (ता. बारामती) येथे वास्तव्यास जाण्याच्या मानसिकतेत आहे.

...बांधकाम साहित्यही निम्म्या किमतीत विकले

यापूर्वीही जाधव यांनी बांधकाम काढले असता, त्यांना विरोध करण्यात आल्याने त्यांना बांधकाम साहित्य निम्म्या किमतीत विकावे लागले. शौचालयही बांधू न दिल्याने ते साहित्य दुसऱ्यांना फुकट द्यावे लागले. ज्यांचा जाधव यांच्या बांधकामास विरोध आहे, त्यांचा संबंधित जागेशी संबंध काय आहे हे प्रशासनाने स्पष्ट करायला हवे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करुन रस्ता सोडला. या रस्त्याच्या कामाचे पैसे ही जाधव यांनीच भरले, परंतु तरीही त्यांना विरोधच सहन करावा लागला. त्यामुळे प्रशासनाने याबाबत कुणाचाही दबाब न घेता भूमिका घ्यायला हवी.