INDvsSA : पुण्यातील कसोटी सामन्याच्या तिकीट विक्रीस 11 सप्टेंबरपासून सुरूवात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 September 2019

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्याच्या अधिकृत तिकीट विक्रीला महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आजपासून (बुधवार, ११ ऑक्टोबर २०१९) सकाळी १०: वाजता प्रारंभ करणार आहे.

पुणेः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट सामन्याचे दि.१० ते १४ ऑक्टोबर २०१९ रोजी आयोजन करण्यात आले आहे. पुण्यामध्ये आयोजित होणारा हा दुसरा आंतराराष्ट्रीय कसोटी सामना असून याव्दारे पुण्यातील क्रिकेट विश्‍वामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. आयसीसी जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद २०१९-२१ स्पर्धेतील हा कसोटी सामना पुण्यामध्ये होत असल्याने या सामन्याचे महत्व ऐतिहासिक ठरणार आहे.

जवळपास एक वर्षाच्या अंतराने पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आयोजित होत आहे. गतवर्षी २७ ऑक्टोबर २०१८ रोजी पुण्यात भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. पुण्यामध्ये २०१७ मध्ये एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला-वहीला आंतरराष्ट्रीय व ऐतिहासिक कसोटी सामना झाला होता आणि आता याच मैदानावर २ वर्ष, ७ महिने आणि १३ दिवसांनंतर कसोटी सामन्याचे आयोजन होत आहे.

२०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाने पुण्यातील पहिला-वहीला कसोटी सामना जिंकला होता. हा सामना पाहूण्या ऑस्ट्रेलियाने तिसर्‍या दिवशीच तब्बल ३३३ धावांनी जिंकला होता. या पराभवामुळे भारतीय संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहली याची १९ कसोटी सामन्यांची अपराजित मालिका खंडित झाली होती. दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौर्‍यामध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. त्यानंतर तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या कसोटी मालिकेला २ ऑक्टोबर पासून सुरूवात होत असून या मालिकेतील दुसरा सामना पुण्यामध्ये होणार आहे. पहिला कसोटी सामना- विशाखापट्टणम (२ ते ६ ऑक्टोबर) आणि तिसरा कसोटी सामना- रांची (१९ ते २३ ऑक्टोबर) येथे होणार आहे.

कर्णधार फाफ-डु प्लसी याच्या नैतृत्वाखाली येणार्‍या दक्षिण आफ्रिका संघ पुण्यामध्ये पहिल्यांदाच खेळणार आहे. पुण्यामध्ये येणारा दक्षिण आफ्रिका संघ हा कसोटी खेळणारा सातवा संघ ठरणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघाचे टी-२० मालिकेचे सामने धरमशाळा (१५ सप्टेंबर), मोहाली (१८ सप्टेंबर) आणि बंगलुरू (२२ सप्टेंबर) येथे होणार आहेत.

कसोटी मानांकन यादीमध्ये भारतीय संघ सध्या अव्वल स्थानावर आहे. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज विरूध्दच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने २-० असे निर्विवाद यश मिळवले होते. भारतीय संघ १२० गुणांनी गुणतक्त्यात आघाडीवर असून दक्षिण आफ्रिका संघाची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ही पहिलीच कसोटी मालिका ठरणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याची तिकीटविक्री ११ सप्टेंबर पासून !
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्याच्या अधिकृत तिकीट विक्रीला महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आजपासून (बुधवार, ११ ऑक्टोबर २०१९) सकाळी १०: वाजता प्रारंभ करणार आहे.

कसोटी सामन्याची सिझन तिकीटे www.bookmyshow.com या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध असणार आहे. सामन्याची प्रत्यक्ष (बॉक्स ऑफिस) तिकीटविक्री बुधवार, २५ सप्टेंबर २०१९ पासून सुरू होणार आहे. याचवेळी दर दिवशीची तिकीटेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पुणेकर क्रीडा रसिकांना दोन वर्षांनंतर कसोटी या ‘क्लासिक’ क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे. याआधी २३ फेब्रुवारी २०१७ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना आयोजित झाला होता. जो पुण्यातील पहिला कसोटी सामना ठरला होता.

तिकीट विक्रीचे दर असेः ईस्ट स्टँड आणि वेस्ट स्टँडः सिझन तिकीट रूपये १०००/- व प्रत्येक दिवसाचे रू.४००/-; साऊथ अप्परः सिझन तिकीट रू.१५०० व प्रत्येक दिवसाचे रू. ६००/-; साऊथ लोअरः सिझन तिकीट रू. २५००/- व प्रत्येक दिवसाचे रू. १०००/-; साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट स्टँडः सिझन तिकीट रू.२०००/- व प्रत्येक दिवसाचे रू.८००/-; नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट स्टँडः सिझन तिकीट रू.२०००/- व प्रत्येक दिवसाचे रू.८००/-; नॉर्थ स्टँडः सिझन तिकीट रू. २५००/- व प्रत्येक दिवसाचे रू. १०००/-; साऊथ पॅव्हेलियन ए आणि बी स्टँड सिझन तिकीट रू. ५०००/- व प्रत्येक दिवसाचे रू.२०००ˆ/-. कॉर्पोरेट बॉक्सचे सिझन तिकीट ६२,५००/- आणि प्रत्येक दिवसाचे रू. ५०,०००/- असे शुल्क आहे.

तिकीट विक्रीच्या अधिक माहितीसाठी संपर्कः ७४१४९ २०९५० / ७४१४९ २०९५१.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ticket sale will start from 11th September for test match against SA in Pune