esakal | मणिपूर सरकारचं चानूला 1 कोटीचं बक्षीस, मुख्यमंत्र्यांची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

 Mirabai Chanu

मणिपूर सरकारचं चानूला 1 कोटीचं बक्षीस, मुख्यमंत्र्यांची घोषणा

sakal_logo
By
सुशांत जाधव

1 crore cash reward for Mirabai Chanu :ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे खाते उघडणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. 49 किलो वजनी गटात मीराबाई चानूने रौप्य पदकाची कमाई केली. वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात तिने पहिल्याच दिवशी पदक पटवण्याचा पराक्रमही आपल्या नावे नोंदवला. कौतुकाच्या वर्षावासह तिच्यावर आता बक्षीसांचा वर्षाव सुरु झालाय. मनिपूर राज्य सरकारने तिला 1 कोटी रुपये रोख बक्षीस देणार असल्याची घोषणा केलीये. मनिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी यासंदर्भातील घोषणा केली. देशाला पहिले पदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूचे त्यांनी अभिनंदनही केले आहे. (Tokyo Olympics: Manipur CM announces Rs 1 crore cash reward for Mirabai Chanu)

मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात जर्क 115 किलो आणि स्नॅच 87 किलो असे एकूण 202 किलो वजन उचलून ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी एक दिवसअगोदर भारतीय ऑलिम्पिक संघाने देखील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीसांची घोषणा केली होती. भारतीय ऑलिम्पिक महासंघाकडून सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूला 75 लाख, रौप्य पदक विजेत्याला 40 लाख तर कांस्य पदक विजेत्या 25 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या बक्षीसासही ती पात्र ठरलीये.

जगातील मानाच्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राज्यातील खेळाडूंसाठी मनिपूर सरकारने देखील यापूर्वीच बक्षीस देणार असल्याचे स्पष्ट केले होते. सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूला 1 कोटी 20 लाख, रौप्य पदक विजेत्या खेळाडूसाठी 1 कोटी आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूंना 75 लाख रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. चानूने चंदेरी कामगिरी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तिला 1 कोटी रुपये बक्षीस देणार असल्याची घोषणा केली.

loading image
go to top