esakal | Tokyo Olympics: पी व्ही सिंधूने कांस्यपदक पटकावत रचला इतिहास
sakal

बोलून बातमी शोधा

PV Sindhu

Tokyo Olympics: पी व्ही सिंधूने कांस्यपदक पटकावत रचला इतिहास

sakal_logo
By
विराज भागवत

असा पराक्रम करणारी पी व्ही सिंधू ठरली पहिला महिला खेळाडू

Tokyo Olympics स्पर्धेत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने कांस्यपदकाची कमाई केली. तिने चीनच्या हे बिंगजिओ हिला २१-१३, २१-१५ अशा सरळ गेम्समध्ये पराभूत केले. सिंधूच्या या विजयामुळे भारताने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दुसरं पदक मिळवलं. याआधी वेटलिफ्टर मिराबाई चानूने रौप्यपदकाची कमाई केली होती. (Tokyo Olympics Indian shuttler PV Sindhu wins bronze medal after defeating China He Bingjiao 21- 13, 21-15 in women singles match)

सिंधूने भारतासाठी रचला धमाकेदार इतिहास

पी व्ही सिंधू हिने आपली प्रतिस्पर्धी हे बिंगजिओ हिला सामना सुरू झाल्यापासूनच दडपणाखाली ठेवले. अतिशय वेगाने गुण कमवत सिंधूने सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. तिने पहिला गेम २१-१३ असा सहज जिंकला. चीनच्या बिंगजिओकडून सिंधूला दुसऱ्या गेममध्ये तगडी टक्कर मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार काही काळ बिंगजिओने दमदार खेळ केला. पण पुन्हा एकदा सिंधूच्या अनुभवापुढे बिंगजिओला हात टेकावेच लागले. सिंधूने दुसरा गेम जिंकत कांस्यपदक आपल्या नावे केले. याआधी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सिंधूला रौप्यपदक मिळाले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक स्तरावर दोन पदके मिळवणारी सिंधू ही भारतातील पहिलीवहिली महिला खेळाडू ठरली.

सिंधूचा हा पराक्रम नमूद करत थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिला शुभेच्छा दिल्या. सिंधूला मिळालेल्या नव्या यशासाठी तिचे अभिनंदन. तिचे सातत्य, खेळाप्रति असलेली निष्ठा आणि खेळातील कौशल्य नक्कीच वाखाणण्याजोगे आहे अशा शब्दात त्यांनी सिंधूचे कौतुक केले.

त्यासोबतच, पंतप्रधान मोदी यांनीही तिचे अभिनंदन केले. सिंधूच्या विजयाने सारे भारतीय भारावून गेले आहेत. कांस्यकमाई करणाऱ्या सिंधूचे अभिनंदन. सिंधू हा भारताचा अभिमान आहे. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासातील सिंधू ही एक महत्त्वाची खेळाडू आहे, अशा शब्दात मोदी यांनी तिला शाबासकी दिली.

loading image
go to top