
Olympics: 'गोल्डन' मॅन नीरजला पंतप्रधान मोदींचा फोन
नीरज अन् मोदींमध्ये काय झाला संवाद, वाचा...
Tokyo Olympics: टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष भालाफेक (Men's Javelin) प्रकारामध्ये भारताच्या नीरज चोप्राने इतिहास रचला. पात्रता फेरीमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या नीरजने अंतिम फेरीत अधिक चांगली कामगिरी केली. त्याने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्याच्या या सुवर्णकमाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट त्याला फोन करून शुभेच्छा दिल्या. मोदींनी स्वत: याबद्दलची माहिती दिली.
पंतप्रधान मोदींनी थेट केला कॉल-
भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राशी नुकतंच माझं फोनवरून बोलणं झालं. मी त्याला सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि त्याचं अभिनंदन केलं. टोकियो ऑलिम्पिक दरम्यान त्याने केलेल्या मेहनतीची आणि दृढतेची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. तो सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याची प्रतिभा आणि खेळभावना वाखाणण्याजोगी आहे. त्याच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून आणि संपूर्ण भारतीयांकडून शुभेच्छा.
मोदींनी जिंकल्यावरही केलं होतं ट्वीट-
नीरजने सुवर्णपदक जिंकल्यावर लगेच पंतप्रधान मोदी यांनी त्याला अभिनंदनाचे ट्वीट केले होते. "टोकियोमध्ये आज नीरजने इतिहास रचला! नीरज चोप्राने आज जे साध्य केले ते कायम लक्षात राहील. तरूण आणि तडफदार अशा नीरजने अप्रतिम कामगिरी केली. तो उल्लेखनीय आणि उत्कटतेने खेळला आणि त्याने अतुलनीय धैर्य दाखवले. सुवर्ण जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन", अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली होती.
नीरजने ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीयांसाठी सोनेरी आनंद मिळवून दिला. सर्वात लांब भालाफेक करत त्याने सुवर्णपदक पटकावले. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत हे भारताचं पहिलंच सुवर्णपदक ठरलं. 2008 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्रा याने शूटिंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक मिळवून दिलं. त्यानंतर वैयक्तिक खेळांमध्ये हे भारताचं दुसरं सुवर्णपदक ठरलं.