बार्सिलोना संघातील दोन सदस्यांना कोरोनाची लागण 

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 5 January 2021

स्पॅनिश फुटबॉल संघ बार्सिलोनाच्या संघातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

स्पॅनिश फुटबॉल संघ बार्सिलोनाच्या संघातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. बार्सिलोना संघाच्या स्टाफ मधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे क्लबने सांगितले आहे. सोमवारी दोघांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला असून, आता उर्वरीत सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे क्लबने आज म्हटले आहे. तर क्लबने कोरोना बाधित आढळलेल्या या सदस्यांची नावे जाहीर केलेली नाहीत 

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

संघातील दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने आज बार्सिलोनाने आपला सराव देखील स्थगित केला. तर स्पॅनिश फुटबॉल लीग ला लिगा मध्ये बार्सिलोना संघाचा सामना गुरुवारी 7 तारखेला ऍथलेटिक क्लब सोबत होणार आहे. त्यामुळे बार्सिलोना संघातील कोरोना संक्रमित सदस्यांची संख्या वाढल्यास हा सामना रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

दरम्यान, यंदाच्या आवृत्तीत बार्सिलोनाचा संघ क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. बार्सिलोना संघाने 16 सामने खेळताना 8 सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. व त्यामुळे या संघाचे 28 अंक आहेत. बार्सिलोना आणि हुइस्का यांच्यात काल झालेल्या सामन्यात, बार्सिलोना संघाच्या फ्रँकी डी जोंग याने 27 व्या मिनिटाला पहिला गोल करत, संघाला आघाडी मिळवून दिली होती. यानंतर सामना संपेपर्यंत बार्सिलोना संघाने ही आघाडी टिकवून ठेवली. खेळाच्या दुसऱ्या सत्रात दोन्ही पैकी एकाही संघाला गोल करता आला नाही. तर संपूर्ण सामन्यात हुइस्का संघाला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे या सामन्यात बार्सिलोनाने हुइस्कावर 1 - 0 ने विजय मिळवला होता.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two members of the Barcelona team were infected by corona