esakal | शूटींग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचा गोल्डन धमाका!
sakal

बोलून बातमी शोधा

शूटींग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचा गोल्डन धमाका!

शूटींग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचा गोल्डन धमाका!

sakal_logo
By
नामदेव कुंभार

ISSF Jr. World Championship: लिमा (पेरू) येथे सुरू असलेल्या ज्युनियर जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताने आणखी दोन पदकाची कमाई केली आहे. नेमबाज मनु भाकेर हिने दुसरं सुवर्णपदक पटकावलं आहे. 10 मीटर एअर पिस्टल मिक्स प्रकारात मनु भाकेर हिने सरबजोत सिंगसोबत सुवर्णकामगिरी केली आहे. तर 10 मीटर एअर रायफल पुरुष गटात श्रीकांत धनुष, राजप्रीत सिंग आणि पार्थ माखिजा यांनी उल्लेखनीय कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. या जुनियर जागतिक स्पर्धेत भारत पदकतक्त्यात सध्या पहिल्या स्थानावर आहे. भारताच्या खात्यात चार सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन ब्राँझपदकासह 11 पदकं जमा आहेत.

10 मीटर एअर पिस्टल मिक्स प्रकारात मनु भाकेर आणि सरबजोत सिंग यांच्यासमोर भारताच्या दुसऱ्या जोडीचं आवाहन होतं. मनु भाकेर आणि सरबजोत यांनी भारताच्या शिखा नरवाल आणि नवीन यांना पराभव गेला. सुवर्णपदाच्या सामन्यात मनु भाकेर आणि सरबजोत यांनी शिखा नरवाल आणि नवीन यांचा 16-12 च्या फरकाने पराभव केला. पात्रता फेरीत आठ संघाचा समावेश होता. यामध्ये भारताच्या दोन्ही संघाने बाजी मारली. पात्रता फेरीत मनु भाकेर आणि सरबजोत यांना 386 तर शिखा आणि नवीन यांना 385 गुण मिळाले होते.

ज्यूनिअर पुरुष 10 मीटर एअर रायफल इवेंटमध्ये श्रीकांत, राजप्रीत आणि पार्थ या तिकडीनं पात्रता फेरीत एकूण 1886.9 गुणांची कमाई करुन अव्वलस्थान राखले होते. पात्रता फेरीत प्रत्येक नेमबाजाने 60-60 शॉट्स खेळले. सुवर्ण पदकासाठी खेळवण्यात आलेल्या फायनलमध्ये भारताच्या त्रिकूटाने अमेरिकेच्या संघाला पराभूत केले. विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन विल्यम शॅनर, रियालन कसेल आणि जॉन ब्लॅटन यांना मागे टाकून भारतीय त्रिकूटाने शनिवारी सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला होता. भारतीय संघाने 16-6 अशा फरकाने गोल्ड मेडलची लढत आपल्या नावे केली होती. मिश्र दुहेरीच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात राजप्रीत सिंह आणि आत्मिका गुप्ता जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या विल्यम शॅनर आणि मॅरी कॅरोलिन यांनी फायनलमध्ये 17-15 असा विजय नोंदवत सुवर्ण पदकाची कमाई केली होती.

भारताच्या महिला स्कीट संघाने सुवर्णपदकाची कमाई केली तर पुरुष संघाने ब्राँझपदक मिळवले. शनिवारी ज्युनियर जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या महिला स्कीट संघाने सुवर्णपदकाची कमाई केली; तर पुरुष संघाने ब्राँझपदक मिळवले होते. गनेमत सेखॉन, अरिबा खान आणि रियाझ धिल्लाँन यांनी अंतिम सामन्यात इटलीच्या संघाचा ६-० असा पराभव केला. गनेमतचे हे स्पर्धेतले दुसरे पदक आहे. तिने कालच वैयक्तिक प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. पुरुषांच्या विभागात भारताच्या राजीव गिल, आयुष रुद्रराजू आणि अभय सिंग सेखॉन यांनी ब्राँझपदक मिळवताना तुर्कस्तानच्या अली कॅन अर्बाची, अहमेत बरान आणि महम्मेत सेयून काया यांचा ६-० असा पराभव केला.

गनेमतकडून भारताला पदकाची अपेक्षा होतीच. नवी दिल्लीत झालेल्या सिनियर विश्वकरंडक स्कीट नेमबाजीत तिने सुवर्णपदक जिंकले होते. भारताच्या पुरुषांनी सांघिक प्रकारात ब्राँझपदक जिंकले असले, तरी राजवीर गिल, अभयसिंग किंवा आयुष रुद्रराजू यापैकी कोणालाही वैयक्तिक गटात अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही.

loading image
go to top