esakal | दुखापतीमुळे साईना सामन्याबाहेर, मात्र भारताचा स्पेनवर ३-२ ने विजय
sakal

बोलून बातमी शोधा

sain nehwal

दुखापतीमुळे साईना सामन्याबाहेर, मात्र भारताचा स्पेनवर ३-२ ने विजय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आरहूस (डेन्मार्क) : अनुभवी बॅडमिंटनपटू साईना नेहवालला दुखापतीमुळे स्पेनविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून ऐनवेळी माघार घ्यावी लागली, पण भारताने युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीसह ३-२ ने विजय मिळवून रविवारी आपल्या मोहिमेची सुरुवात केली.

लंडन ऑलिंपिकमधील ब्राँझपदक विजेती साईना भारताकडून खाते उघडण्यासाठी मैदानावर उतरली खरी; परंतु पाठीला वेदना झाल्यामुळे तिला स्पेनच्या क्लारा अजुर्मेंडीविरुद्धच्या एकेरीच्या सामन्यातून माघार घ्यावी लागली. तोपर्यंत तिने पहिली फेरी २०-२२ अशी गमावली होती. त्यानंतर मैदानावर उतरलेल्या मालविका बनसोडने मात्र जागतिक क्रमवारीत २० व्या क्रमांकावर असलेल्या बीट्रीझ कॉरालेसवर २१-१३, २१-१५ असा विजय मिळवत बरोबरी साधली.

तनिषा क्रेस्टो आणि रुतुपर्णा पांडा यांनी प्रभावी कामगिरी करत स्पेनच्या पॉला लोपेझ आणि लोरेना उसले यांचा २१-१०, २१-८ असा पराभव करत भारताला पाच सामन्यांच्या पहिल्या फेरीत २-१ अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या एकेरीच्या सामन्यात अदिती भट्टने स्पेनच्या अनिया सेटीनला २१-१६, २१-१४ असे पराभूत करत आपली प्रतिभा दाखवली. अदितीच्या विजयासह भारताने सामन्यात ३-१ अशी आघाडी घेतली.

loading image
go to top