Football World Cup Tournament : नायजेरिया, कोलंबियास ऐतिहासिक संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

women football

Football World Cup Tournament : नायजेरिया, कोलंबियास ऐतिहासिक संधी

पणजी : नायजेरिया व कोलंबियाने कधीही फिफा १७ वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली नाही. बुधवारी (ता. २६) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर या वेळच्या स्पर्धेत उभय संघांतील उपांत्य लढतीत विजय नोंदवणाऱ्या चमूला ऐतिहासिक संधी प्राप्त होईल.

फातोर्ड्यातच स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना जर्मनी व स्पेन या युरोपीय संघात खेळला जाईल, जो रंगतदार होण्याचे संकेत आहेत. जर्मनी संघ युरोपियन विजेता असून स्पेन २०१८ मधील स्पर्धेतील गतविजेते आहेत. जर्मनी सातव्यांदा विश्वकरंडक स्पर्धेत खेळत आहे, पण त्यांना यापूर्वी सहा स्पर्धांत अंतिम फेरी गाठता आलेली नाही. २००८ मध्ये तिसरा क्रमांक ही त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. स्पेनने उपांत्यपूर्व लढतीत ८७ व्या मिनिटापर्यंत एका गोलने पिछाडीवर राहूनही जपानला २-१ असे हरवले.

उपांत्य फेरीत जागा मिळवताना जर्मनीने ब्राझीलला २-० असे नमवले. आफ्रिकेतील नायजेरियाने सहाव्यांदा १७ वर्षांखालील महिला विश्वकरंडक स्पर्धेची मुख्य फेरी गाठताना पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी २०१०, २०१२ व २०१४ मध्ये त्यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच आटोपले होते. या वेळी चुरशीच्या उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी १-१ गोल बरोबरीनंतर बलाढ्य अमेरिकेस पेनल्टी शूटआऊटवर ४-३ फरकाने हरवले.

दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया संघ यापूर्वी चार वेळा स्पर्धेच्या साखळी फेरीतच गारद झाला होता. उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी टांझानियास ३-० असे पराजित केले. निलंबनामुळे बुधवारी कोलंबियास कार्ला विनाचा हिला मुकावे लागेल. यापूर्वी १७ वर्षांखालील महिला विश्वकरंडकाच्या साखळी फेरीतील दोन्ही लढतीत नायजेरियाने कोलंबियास हरवले आहे. नायजेरियाने २०१२ मध्ये ३-० असा; तर २०१४ मध्ये २-१ असा विजय मिळवला होता.