esakal | US Open - 18 वर्षीय एम्माने घडवला इतिहास; 53 वर्षांनी ब्रिटनला विजेतेपद
sakal

बोलून बातमी शोधा

US Open - ब्रिटनच्या 18 वर्षीय एम्माने घडवला इतिहास

क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यानंतर घरी जाण्यासाठी विमानाचे तिकीट एम्माने बुक केलं होतं. मात्र, त्यांनतर तिने स्पर्धेत एकही सेट न गमावता थेट जेतेपद पटकावलं.

US Open - ब्रिटनच्या 18 वर्षीय एम्माने घडवला इतिहास

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या 18 वर्षीय एम्मा रादुकानूने इतिहास घडवला आहे. यंदा यूएस ओपनला नवी विजेती मिळाली असून तिने 19 वर्षीय लेला फर्नांडिसला पराभूत करून विजेतेपद पटकावले आहे. 53 वर्षांनी ब्रिटनला महिला एकेरीत विजेतेपद मिळालं. एम्माने कॅनडाच्या लेला फर्नांडिसला सरळ सेटमध्ये पराभूत करून जेतेपदावर नाव कोरले. एम्माने लेला फर्नांडिसला 6-4, 6-3 अशा फरकाने हरवले.

सेमिफायनलमध्ये एम्माने युनानच्या मारिया सकारीला 6-1, 6-4 असं सरळ सेटमध्ये पराभूत केले होतं. एम्मा पहिल्यांदा एखाद्या ग्रँड स्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचली होती. 1999 नंतर पहिल्यांदाच दोन कमी वयाच्या महिलांमध्ये यूएस ओपनची अंतिम लढत झाली. तेव्हा 17 वर्षीय सेरेना विल्यम्स आणि 18 वर्षाच्या मार्टिना हिंगिस यांच्यात फायनल रंगली होती.

युएस ओपनच्या पूर्ण स्पर्धेत एम्माने एकही सेट गमावलेला नाही. स्पर्धेत 18 सेट तिने जिंकले यात पात्रता फेरीतील 3 आणि मुख्य स्पर्धेतील 6 सामन्याचा समावेश आहे. याआधी सेरेनाने २०१४ मध्ये एकही सेट न गमावता ग्रँड स्लॅम जिंकलं होतं.

महिला एकेरीच्या फायनलमध्ये धडक मारणारी एम्मा ही पहिलीच क्वालिफायर होती आणि आता विजेतेपदही पटकावले आहे. विशेष म्हणजे क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यानंतर घरी जाण्यासाठी विमानाचे तिकीट एम्माने बुक केलं होतं. मात्र, त्यांनतर तिने स्पर्धेत एकही सेट न गमावता थेट जेतेपद पटकावलं.

loading image
go to top