इलेक्ट्रिशियनच्या मुलाची योगामध्ये गरुडझेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaibhav Srirame win gold medals International Yoga competition

इलेक्ट्रिशियनच्या मुलाची योगामध्ये गरुडझेप

नागपूर : आजकालच्या तरुणांचा क्रिकेट व बॅडमिंटनसारख्या ग्लॅमरस खेळांकडे अधिकाधिक कल दिसून येतो. देशी योगाची बहुतेकांना ॲलर्जी असते. मात्र या दुर्लक्षित खेळातही नाव कमावता येऊ शकते हे आंतरराष्ट्रीय योगपटू वैभव श्रीरामेने आपल्या कामगिरीने दाखवून दिले आहे. त्याने गुजरातमध्ये अलीकडे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णांसह पाच पदके पटकावून योगामध्ये अमिट छाप सोडली.

दर महिन्याला जेमतेम १०-१२ हजारांची कमाई करणाऱ्या इलेक्ट्रिशियनचा (वामन श्रीरामे) मुलगा असलेल्या वैभवला खरं तर शिक्षण शिकून व नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे व्हायचे होते. घरची परिस्थिती मजबूत नसल्याने आईवडिलांना आर्थिक हातभार लावायचा होता. मात्र त्याची पावले योगाकडे कधी वळली, हे त्यालादेखील कळले नाही.

अमित प्राथमिक शाळेत शिकत असताना त्या काळात शाळेत रोज योगासनाचे क्लासेस चालायचे. शाळा सुटल्यावर मुलांना योगा करताना पाहून त्यालाही योगासनात आवड निर्माण झाली. आईवडिलांकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर त्याने योगाचा क्लास जॉईन केला. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.

गेल्या अकरा वर्षांपासून प्रशिक्षक संदेश खरे यांच्या मार्गदर्शनात योगाचे धडे गिरवित असलेल्या २१ वर्षीय वैभवने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये शंभराच्या वर पदके जिंकली आहेत. मात्र २०१५ मध्ये क्वालालंपूर (मलेशिया) येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत केलेली कामगिरी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असल्याचे त्याने सांगितले. या स्पर्धेत वैभवने एका सुवर्णासह एकूण पाच पदके जिंकून देशासह विदर्भाच्याही शिरपेचात तुरा खोवला.

वैभवने गुजरातमध्ये प्रथमच योगाचा समावेश करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही तीन सुवर्णांसह पाच पदकांची कमाई करून वैदर्भी झेंडा फडकावला. त्याने ट्रॅडिशनल योगा, आर्टिस्टिक (एकेरी) व आर्टिस्टिक (सांघिक) प्रकारांमध्ये तीन सुवर्ण आणि आर्टिस्टिक पेअर व रिदमिक पेअर ब्रॉंझपदक पटकाविले.

तब्बल नऊ फेडरेशनच्या स्पर्धा व सहा शालेय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय बंगळूर येथे पहिल्यांदाच आयोजित खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला सुवर्णपदक मिळवून दिलेले आहे. राष्ट्रीय स्तरावर त्याने दोनवेळा सर्वोत्तम योगपटूचा पुरस्कारदेखील पटकाविला.

योगा टीचर बनून युवापिढी घडविणार

कमला नेहरू महाविद्यालयात एम. कॉम. द्वितीय वर्षात शिकत असलेल्या वैभवने भविष्यात योगामध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. योगा टीचर बनून त्याला सशक्त युवापिढी घडवायची आहे. शिवाय ऑलिम्पिकमध्ये योगाचा समावेश झाल्यानंतर, त्यात देशाचे प्रतिनिधित्व करून पदक जिंकण्याचे त्याचे स्वप्न आहे.

टॅग्स :Aurangabad Newssportsyoga