वीरधवल वेगवान, पण कामगिरीवर निराश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

वीरधवल खाडेने आशियाई वयोगट जलतरण स्पर्धेत सर्वात वेगवान जलतरणपटू ठरताना 50 मीटर फ्रीस्टाईल शर्यत जिंकली; पण त्याला ऑलिंपिक पात्रतेची अ कामगिरी करण्यात अपयश आले. बंगळूरला सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत 8 सुवर्ण आणि 12 रौप्यपदकांसह 28 पदके जिंकली आहेत.

मुंबई : वीरधवल खाडेने आशियाई वयोगट जलतरण स्पर्धेत सर्वात वेगवान जलतरणपटू ठरताना 50 मीटर फ्रीस्टाईल शर्यत जिंकली; पण त्याला ऑलिंपिक पात्रतेची अ कामगिरी करण्यात अपयश आले. बंगळूरला सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत 8 सुवर्ण आणि 12 रौप्यपदकांसह 28 पदके जिंकली आहेत.

वीरधवलची वेळ 22.59 सेकंद होती, तर ऑलिंपिकची अ पात्रता 22.01 सेकंद आहे. "माझ्या कामगिरीवर मी निराश आहे. सुरुवात चांगली झाली होती; पण त्यानंतर कामगिरी उंचावण्यात अपयश आले. आता सिंगापूरमधील विश्वकरंडक स्पर्धेत पात्रता नोंदवण्याचा प्रयत्न असेल. जूनपर्यंत वेळ आहे; पण लवकर पात्रता मिळवल्यास पूर्वतयारीस वेळ मिळेल,' असे वीरधवलने सांगितले.

वीरधवलने सकाळच्या सत्रात मिश्र फ्रीस्टाईल रिलेत ब्रॉंझ जिंकले होते. वीरधवल, श्रीहरी नटराज, माना पटेल आणि शिवानी कटारिया यांच्या भारतीय संघाने 3 मिनिटे 42.56 सेकंद वेळ दिली. थायलंडने (3 मिनिटे 39.17 सेकंद) सुवर्णपदक जिंकले होते.

कुशाग्र रावतने स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक जिंकताना 1500 मीटर फ्रीस्टाईल शर्यत जिंकली. त्याची वेळ 15 मिनिटे 41.54 सेकंद होती. शौन गांगुलीने 400 मीटर फ्रीस्टाईलच्या ग्रुप दोन मुलांच्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. त्याने पहिल्या दिवशी एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदके जिंकली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: veerdhaval fasted, but did not improve time