एमसीए अध्यक्षपदी डॉ. विजय पाटील बिनविरोध?

मुंबई क्रिकेट संघटना
मुंबई क्रिकेट संघटना

मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी विजय पाटील यांची बिनविरोध निवड होण्याची शक्‍यता आहे. त्यांना महाडदळकर तसेच क्रिकेट फर्स्ट या गटांचा पाठिंबा लाभला आहे असे समजते. दरम्यान, संदीप पाटील यांना परस्परविरोधी हितसंबंधाच्या नियमामुळे निवडणुकीतून माघार घेणे भाग पडले आहे.

मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक एकमताने व्हावी, यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात आले. पण, ते विफल ठरले असल्याची चिन्हे दिसत आहेत. डॉ. विजय पाटील यांना सर्वांचा पाठिंबा लाभला; पण अन्य उमेदवाराबाबत एकमत झाले नाही आणि आज दुपारपर्यंत सर्व काही एकमताने होईल, असे चित्र असताना आता निवडणूक होण्याची चिन्हे दिसत आहेत. नदीम मेमन - मयांक खांडवाला यांचा क्रिकेट फर्स्ट गट आता माजी अध्यक्ष रवी सावंत यांच्या महाडदळकर गटाला आव्हान देईल अशी चिन्हे दिसत आहेत. मात्र, दोन्ही गटांनी डॉ. पाटील यांच्या अध्यक्षपदास पाठिंबा दिला असल्याचे सांगितले जात आहे.
महाडदळकर गटाने अमोल काळे, जगदीश आचरेकर, संजय नाईक, शाह आलम यांची महत्त्वाच्या पदासाठी निवड केली आहे. त्यातील आचरेकर यांना खजिनदारपदासाठी; तर नाईक यांना सचिवपदासाठी पसंती मिळेल. शाह आलम सहसचिव म्हणून उभे राहतील असे दिसत आहे. महाडदळकर गटाचे उमेदवार अर्ज भरत असताना विरोधी क्रिकेट फर्स्ट गटाची बैठक सुरू झाली होती.
दरम्यान, मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यालयात दिवसभर लगबग होती. आपल्या प्रतिनिधींची नावे देण्यासाठी विविध संलग्न क्‍लबचे प्रतिनिधी आज दिवसभर कार्यालयात येत होते. अर्थातच त्याचवेळी आपापल्या गटास किती पाठिंबा मिळतो याचीही चाचपणी केली जात होती. दरम्यान, काही जिमखान्यांनी प्रतिथयश नावांऐवजी नवी नावे दिली असल्याचे समजते; तर मुदत संपलेल्या अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी आपल्या मुलांची नावे समोर केली आहेत.

समालोचक असल्याने संदीप पाटील अपात्र
संदीप पाटील क्रिकेट समालोचन करीत आहेत, त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवल्यास परस्परविरोधी हितंसंबंधाच्या नियमाचा भंग होतो, असे सांगण्यात आले. मी अध्यक्ष झाल्यास परस्परविरोधी हितसंबंधाच्या नियमावलीचा भंग होतो, असे निवडणूक आधिकाऱ्यांनी सांगितले. त्याबाबत आम्ही भारतीय मंडळाचे सीईओ राहुल जोहरी यांच्याबरोबरही चर्चा केली. त्यामुळे या निवडणुकीसाठी अपात्र ठरतो, असे पाटील यांनी सांगितले. त्यांनी समालोचनाबाबतचा करार मोडणे जमणार नाही, तो करार माझ्यासाठी मोलाचा आहे; त्यामुळे सध्या तरी निवडणूक लढवता येणार नाही, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com