विराट खेळला पण भारत हरला; ऑस्ट्रेलियाचे आव्हान जिवंत

विराट खेळला पण भारत हरला; ऑस्ट्रेलियाचे आव्हान जिवंत

रांची : भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेतील आव्हान पणास लागले असताना ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात काटशह देत पिछाडी कमी केली. भक्कम सुरवातीनंतर 314 धावांचे अपेक्षेपेक्षा काहीसे कमी आव्हान उभारूनही कांगारूंनी 32 धावांच्या अधिक्‍याने विजय मिळविला. कांगारू जवळपास द्विशतकी सलामी देत असताना भारताकडून कोहलीने शतकासह "विराट' प्रयत्न केले, पण त्यास तुल्यबळ साथ मिळू शकली नाही. आता विराटच्या गैरहजेरीत उरलेल्या दोन पैकी एक सामना जिंकून मालिकेत बाजी मारण्याचे आव्हान संघासमोर असेल. 

कांगारूंच्या वेगवान गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी सलामीवीर स्वस्तात गारद करीत सुरवात चांगली करून दिली. रिचर्डसनने बाद केले तेव्हा धवन जेमतेम खाते उघडू शकला होता, तर कमिन्सने रोहितला पायचीत टिपले. रायुडूचा कमिन्सने त्रिफळा उडविला. अशावेळी विराट-माही यांच्यावर धुरा होती. लायनला षटकार खेचत माहीने होमग्राऊंड दणाणून सोडले. झम्पाला आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू बॅटची कड घेऊन स्टम्पवर आदळला. ही विकेट पडल्यामुळे दडपण वाढले होते. तोपर्यंत विराट स्थिरावला होता, केदारने त्याला साथ दिली. या जोडीने 88 धावांची भर घातली.

झम्पाला दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारत केदारने खाते उघडले होते. विराटने प्रामुख्याने स्टॉयनीसवर हल्ला सुरू ठेवला होता. 25 ते 30 या पाच षटकांत 37 धावा काढत या जोडीने आगेकूच कायम ठेवली. झम्पाला स्वीप करण्याच्या प्रयत्नात केदारच चकला. पायचीतच्या कौलविरुद्ध रिव्ह्यू घेण्याविषयी त्याने विराटला विचारले, पण विराटने नकार दर्शविला. तेव्हा विराट नव्वदीत होता. त्याने मॅक्‍सवेलच्या चेंडूवर दुहेरी धाव घेत शतक पूर्ण केले. झम्पाला षटकार खेचत त्याने निर्णायक आक्रमण सुरू केले. 38व्या षटकात सलग दोन चौकार मारत विराटने स्टेडियम दणाणून सोडले, पण तिसऱ्या चेंडूवरील गुगलीने त्याला चकविले. 

विराट 38व्या षटकात बाद झाला. 12 षटकांत 7.75च्या सरासरीने 93 धावा असे समीकरण होते. मात्र जडेजा व शंकर या दोन अष्टपैलूंसह तळाच्या फलंदाजांनी केवळ आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्यास अर्धेच यश आले. त्यामुळे विजय दुरावला. कांगारूंचा स्पीनर झम्पाने 70 धावांचे मोल दिले, पण माही, केदार व विराट असे मोहरे टिपले. कमिन्स, रिचर्डसन यांनीही वेगवान माऱ्यावर प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. 

तत्पूर्वी, 193 धावांच्या तुफानी सलामीनंतरही भारताने कांगारूंच्या डावाला ब्रेक लावले. ख्वाजा-फिंच यांनी 31.5 षटकांत सलामी देत भारतीय गोलंदाजांना दाद लागू दिली नाही. 59 चेंडूंत अर्धशतक, 99 चेंडूंत शतक, 148 चेंडूंत दिडशतक अशी घोडदौड कांगारूंनी केली. डावऱ्या-उजव्या जोडीने कोणत्याच गोलंदाजाला टप्पा सापडू दिला नाही. कुलदीपने 32व्या षटकात पहिल्या यशाची प्रतीक्षा अखेर संपविताना फिंचला शतकापासून रोखले, पण ख्वाजाने दमदार फटके मारत बहारदार शतक काढले. दुसऱ्या विकेटसाठी त्याला मॅक्‍सवेलने तोलामोलाची साथ दिली. या जोडीने 46 धावांची भर घातली. शतकानंतर ख्वाजा बाद झाला, तर जडेजाच्या चपळाईला धोनीच्या कौशल्याची जोड मिळाल्यामुळे मॅक्‍सवेलचा अडथळा दूर झाला. 

कुलदीपने झटपट दोन विकेट घेत शॉन मार्श (7) व पीटर हॅंड्‌सकोम्ब (0) यांना 44व्या षटकात तीन चेंडूंच्या अंतराने बाद केले. त्यावेळी कांगारूंची 5 बाद 263 अशी स्थिती झाली होती. अशावेळी स्टॉयनीस व केरी यांनी 50 धावांची नाबाद भागीदारी रचली. त्यामुळे कांगारूंना तीनशेचा टप्पा पार करता आला. 

'विराट' कामगिरी

-कर्णधार म्हणून कोहलीच्या चार हजरा धावा. अझरुद्दिन, सौरभ गांगुली, धोनीच्या पंक्तित 
-कर्णधार म्हणून वेगवान चार हजार धावा करताना धोनी, डिव्हिलर्सला टाकले मागे 
-कोहलीच्या कर्णधारपदाच्या 63व्या सामन्यात ही कामगिरी. यापूर्वी डिव्हिलर्स 63 आणि धोनी 100व्या सामन्यात 
-कर्णधार म्हणून कोहलीची 19 शतके, 14 अर्धशतके 
-एकदिवसीय कारकिर्दीमधील 41वे शतक, ऑस्ट्रेलियाविरुद्ध आठवे. सचिनचा (7) विक्रम मोडला 
-ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा-ऍरॉन फिंचची 193 धावांची सलामी. ऑस्ट्रेलियाकडून सातवी सर्वोत्तम भागीदारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com