Virat Kohi IND vs PAK : 'विराट' बदला! दुबईतल्या पराभवाची मेलबर्नमध्ये परतफेड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

Virat Kohi IND vs PAK : 'विराट' बदला! दुबईतल्या पराभवाची मेलबर्नमध्ये परतफेड

Virat Kohi IND vs PAK : भारताने अखेर गेल्या वर्ल्डकपमधील दुबईतील पराभवाचे उट्टे मेलबर्नमध्ये लाखभर प्रेक्षकांच्या साक्षीने काढले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 विकेट्स राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. विराट कोहलीने 53 चेंडूत 83 धावा केल्या. त्याने हार्दिक पांड्याबरोबर पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत गेलेला सामना खेचून आणला. भारताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 1 धावेची गरज असताना अश्विनने चौकार मारत सामना संपवला.

पाकिस्तानच्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी 4 धावा करून माघारी परतले. नसीम शाहने केएल राहुलची तर हारिस रौऊफने कर्णधार रोहित शर्माची शिकार केली.

रोहित - राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत धडाकेबाज सुरूवात केली. मात्र 10 चेंडूत 15 धावा केल्यानंतर हारिस रौऊफच्या वेगाने त्याला चकवले. भारतीय संघाने सूर्यकुमार बाद झाल्यानंतर डावखुऱ्या अक्षर पटेलला शादाब खान, नवाझविरूद्ध धावगती वाढवण्यासाठी बढती देऊन पाचव्या क्रमांकावर पाठवले. मात्र तो 2 धावा करून बाद झाला.

भारताच्या 31 धावात 4 विकेट पडल्यानंतर हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीने डाव सावरण्यास सुरूवात केली. त्याने नवाझच्या एका षटकात तीन षटकार मारत धावगती वाढवण्यास सुरूवात केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली.

या दोघांनी सामना 30 चेंडूत 60 धावा असा आणला. मात्र फिरकीपटूंविरूद्ध आक्रमक फलंदाजी करणाऱ्या हार्दिक आणि विराट कोहलीची पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी येताच धावगती मंदावली.

मात्र विराट कोहलीने स्लॉग ओव्हरमध्ये आपला गिअर बदलला. त्याने फटकेबाजी सुरू करत 19 वे षटक टाकणाऱ्या हारिस रौऊफला सलग दोन षटकार मारत सामना 6 चेंडूत 16 धावा असा आणला. मात्र हार्दिक पांड्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. तो 36 चेंडूत 40 धावा करून माघारी परतला. त्यानंतर कार्तिकने 1 तर विराटने 2 धावा करून सामना 3 चेंडूत 13 धावा असा आणला.

मात्र नवाझने नो बॉल टाकत भारताला विजयाची संधी निर्माण करून दिली. विराटने नो बॉलवर षटकार मारत सामना 3 ला 6 धावा असा आणला. पुढचा चेंडू नवाझने वाईड टाकला त्यामुळे सामना 3 चेंडूत 5 धावा असा होता. नवाझने विराटला बोल्ड केले मात्र नो बॉल असल्याने सामना 2 चेंडूत 2 धावा असा आणला. स्ट्राईकवर असलेल्या दिनेश कार्तिक स्टम्पिंग आऊट झाला. भारताला आता 1 चेंडू आणि 2 धावांची गरज होती. नवाजने वाईड टाकत सामना भारताच्या खिशात टाकला. विजयासाठी 1 धावेची गरज असताना अश्विनने चौकार मारत विजय साकारला.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानला 159 धावात रोखले. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेत या दोघांना चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून शान मसूद (52) आणि इफ्तिकार अहमदने (51) अर्धशतकी खेळी केली.

टॅग्स :Virat kohli