IND vs NZ : न्यूझीलंडचा पेपर गेला अवघड; विराट अन् शामीच्या ग्रेस गुणांमुळं टीम इंडिया काठावर पास!

Virat Kohli
Virat Kohli esakal
Updated on

India Vs New Zealand Virat Kohli : भारतात सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये भारताची विजयी रथ सुसाट सुटला होता. आधी ऑस्ट्रेलिया मग पाकिस्तान त्यानंतर दुबळ्या अफगाणिस्तानला आरामात लोळवत भारतीय संघ धरमशालामध्ये पोहचला होता.

मात्र धरमशालेत त्यांचा मुकाबला हा न्यूझीलंडशी होणार होता. न्यूझीलंड हे प्रकरण भारतासाठी वर्ल्डकपमध्ये कायम जड गेलं आहे. तो पेपर आला की भारताच्या पोटात कळ येऊन ढोपर दुखतं. धरमशालेत हेच झालं. भारताने गोलंदाजी करताना सुरूवात चांगली केली. मात्र सोपे झेल सोडत न्यूझीलंडला पुनरागमनची संधी दिली.

मात्र मोहम्मद शामीने भेदक मारा तर भारताला पुन्हा सामन्यात खेचून आणले. फलंदाजीतही तसंच! दमदार सुरूवातीनंतर मोक्याच्या क्षणी भारताने विकेट्स फेकल्या अन् विराट कोहलीचं टेन्शन वाढवलं. अखेर विराटने आपली चेस मास्टरवाला क्लास दाखवत भारताला न्यूझीलंडच्या पेपरात पासिंग मार्क मिळवून दिले.

भारताने न्यूझीलंडचे 274 धावांचे आव्हान 4 विकेट्स राखून पार केले. विराट कोहलीने 95 धावांची खेळी केली तर रविंद्र जडेजाने त्याला 39 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. भारताने या विजयासोबतच गुणतालिकेत 10 गुणासह अव्वल स्थान पटकावले आहे.

Virat Kohli
IND vs NZ : विराटचं शतक हुकलं मात्र 2019 चा बदला घेत गुणतालिकेत पटकावलं अव्वल स्थान

फिल्डिंगमध्ये कधी अर्शपर तर कधी फर्शपर

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् दोन महोम्मदांनी टीम इंडियाला झकास सुरूवात करून दिली. मात्र बुमराहच्या गोलंदाजीवर रविंद्रने रविंद्रचा झेल सोडला अन् न्यूझीलंडने मुसंडी मारत सामन्यावर पकड निर्माण केली.

रचिन रविंद्र या न्यूझीलंडवासी भारतीय खेळाडूने डॅरेल मिचेलच्या साथीने 159 धावांची भागीदारी रचत भारताला टेन्शन दिले. मात्र फिल्डिंग कोच टी दिलीप हे बाऊंड्री लाईनवर आले अन् कॅच सोडणारी टीम इंडिया जीव तोडून फिल्डिंग करू लागली.

यामुळे मोहम्मद शामीचा देखील हुरूप वाढला अन् त्यानं विकेट्स घेण्याचा धडाकाच लावला. एका बाजूने मिचेलने शतक ठोकत बाजू लावून धरली होती. मात्र दुसऱ्या बाजूने शामीने येईल त्याची शिकार करत त्याची डाळ शिजू दिली नाही.

मोहम्मद शामीचा दणका

हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला अन् टीम इंडियातील दोन खेळाडूंचे उखळ पांढरे झाले. एक म्हणजे सूर्यकुमार यादव आणि दुसरा म्हणजे मोहम्मद शामी! यातील मोहम्मद शामीने संधीचं सोनं केलं. त्यानं रोहितला माझी जागा बेंचवर नसून संघात आहे हे दाखवून दिलं. त्यामुळे आता शार्दुल ठाकूरचे प्लेईंग 11 मध्ये खेळणे अवघड झाले आहे.

धरमशालाच्या खेळपट्टीवर नवीन चेंडू टाकायला मिळाला तर विकेट्स देखील मिळतील असं गणित होतं. कारण पांढरा बॉल हा सुरूवातीची 10 ते 15 षटकेच स्विंग होतो. मात्र सेकंड चेंज बॉलिंग मिळून देखील सीमवर अप्रतिम नियंत्रण असलेल्या शामी पहिल्या चेंडूपासूनच आपला जलवा दाखवला.

शामीने रचिन आणि डॅरेल मिचल या दोन्ही मोठी खेळी करणाऱ्या फलंदाजांना बाद करत आपण देखील भागीदारी तोडण्यात माहीर असल्याचे दाखवून दिले. याचबरोबर त्याने स्लॉग ओव्हरमध्ये देखील दमदार गोलंदाजी केली.

Virat Kohli
Rohit Sharma : रोहितमुळं रिझवान पुन्हा निराश, भारतीय कर्णधारानं 33 वी धाव घेतली अन्...

दवबिंदूंची टीम इंडियाला साथ

भारत ज्यावेळी न्यूझीलंडचे 274 धावांचे तसे सोपे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरला त्यावेळी भारताच्या साथीला दवबिंदू देखील आले होते. या दवबिंदूंमुळे भारतीय सलामीवीरांनी 71 धावांची खणखणीत सलामी दिली.

मात्र यानंतर लॉकी फर्ग्युसनने रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना चालतं करत भारताचं टेन्शन वाढवलं होतं. श्रेयस अय्यरने दवबिंदूंनी आच्छादलेल्या खेळपट्टीवर धडाकेबाज सुरूवात करत हे टेन्शन दूर केलं. खरं मात्र त्याची बाऊन्सरची दुखरी नस किवींनी दाबली अन् भारताच्या सोप्या चेसमध्ये मोठा ट्विस्ट आला.

विराट अन् जडेजाने नौका केली पार

अय्यर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. ही जोडी आपल्याला विजयापर्यंत नेईल असे वाटत होते. मात्र त्यातच राहुल सँटनरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यातच राहुलनंतर आलेला सूर्या देखील 2 धावा करून धावबाद झाला.

भारताच्या सुरळीत चाललेल्या नौकेला एकमद भगदाडच पडलं. आता मदार ही विराट कोहली आणि त्याला साथ देण्यासाठी आलेल्या अष्टपैलू रविंद्र जडेजावर होती. विजयासाठी अजून 83 धावांची गरज होती.

मात्र चेस मास्टर विराट कोहलीने पुन्हा एकदा भारताची नौका पार नेली. त्याने पडलेलं भगदाड मुजवलंच याचबरोबर भारताला गुणतालिकेत देखील अव्वल स्थानावर पोहचवलं. मात्र भारताचा हा विजय हा जितका सोपा असायला हवा होतो तितका तो सोपा नव्हता. किवींनी पुन्हा एकदा आपण शांतीत क्रांती करणारी माणसं आहोत हे दाखवून दिले. टीम इंडिया जरी जिंकली असली तरी तिला किवींनी खडबडून जागं केलं असेल अशी आशा आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com