esakal | टी-20साठी कोहलीला विश्रांती देण्याचा विचार
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका झाल्यावर तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. पाठोपाठ लगेच श्रीलंकेविरुद्धची कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. 

टी-20साठी कोहलीला विश्रांती देण्याचा विचार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : न्यूझीलंडविरुद्ध होणारी टी 20 सामन्यांची मालिका आणि त्यानंतर होणारी श्रीलंकेविरुद्धची मालिका लक्षात घेता निवड समिती आता कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्याचा आणि कसोटीसाठी अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांचा पुन्हा विचार करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका झाल्यावर तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. पाठोपाठ लगेच श्रीलंकेविरुद्धची कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. 

इंग्लंडमधील चॅंपियन्स करंडक स्पर्धेपासून भारतीय संघ सातत्याने क्रिकेट खेळत आहे. निवड समितीने संघ निवडताना जरूर "रोटेशन' पद्धतीचा उपयोग केला. पण, कर्णधार विराट कोहली मात्र अविरत खेळतच आहे. या वर्षी जून महिन्यापासूनचा कालावधी लक्षात घेतला, तर कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तीन एकदिवसीय सामने धरून आतापर्यंत तीन कसोटी, 23 एकदिवसीय आणि तीन टी 20 सामने खेळला आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडविरुद्धच्या टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी त्याला विश्रांती मिळू शकते. असा निर्णय झाल्यास रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. मात्र, कोहली या मालिकेत खेळल्यास त्याला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते असाही मतप्रवाह पुढे येत आहे. 

कसोटीसाठी अश्‍विन,जडेजा 
श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघ निवडला जाईल, तेव्हा अश्‍विन आणि जडेजा यानांच स्थान मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या दोन्ही प्रमुख गोलंदाजांना एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला होता. या दरम्यान अश्‍विनने कौंटी आणि जडेजाने एक रणजी सामना खेळताना आपली छाप पाडली आहे. कसोटीसाठी अन्य खेळाडूंमध्ये चेतेश्‍वर पुजारा, वृद्धिमान साह, तंदुरुस्त झाल्यास मुरली विजय, लोकेश राहुल यांचाही विचार होणार यात शंकाच नाही. गोलंदाजांचा विचार होईल, तेव्हा कसोटीसाठी महंमद शमी, उमेश यादव या वेगवान, तर तिसरा फिरकी गोलंदाजी म्हणून कुलदीप यादवची वर्णी लागू शकते. भुवनेश्‍वर कुमारकडे एकदिवसीय सामन्यातील गोलंदाज म्हणून बघितले जात असले, तरी त्याचाही विचार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

loading image
go to top