esakal | World Cup 2019 : विराट सांगतोय, धवनऐवजी पंतला अजून संघात स्थान का नाही?
sakal

बोलून बातमी शोधा

Shikhar-Virat

भारताचा सलामीवीर शिखर धवन जखमी झाल्यानंतर त्याच्या जागी नव्या खेळाडूची अधिकृत निवड का केली गेली नाही, याबाबत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने खुलासा केला आहे.

World Cup 2019 : विराट सांगतोय, धवनऐवजी पंतला अजून संघात स्थान का नाही?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वर्ल्ड कप 2019 : भारताचा सलामीवीर शिखर धवन जखमी झाल्यानंतर त्याच्या जागी नव्या खेळाडूची अधिकृत निवड का केली गेली नाही, याबाबत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने खुलासा केला आहे.  

"धवन लवकरात लवकर बरा होईल अशी आशा आहे. पुढील साखळी सामन्यात तसेच उपांत्य सामन्यात तो नक्कीच खेळण्यासाठी मैदानावर उतरेल. त्यामुळे आम्ही त्याला सोबत ठेवले आहे," असे कोहलीने ट्रेंट ब्रिज येथील न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर म्हटले आहे. 

यंदाच्या विश्व करंडक स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना शिखर धवनच्या डाव्या हाताच्या बोटाला मार लागल्याने तो जखमी झाला. पुढील 10-12 दिवसांत तो तंदुरुस्त होऊ शकणार नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्यानंतर धवनच्या जागी संघात कोणत्या नव्या खेळाडूला संधी मिळणार हे जाहीर करण्यापेक्षा संघ व्यवस्थापनाने धवनला निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला. ऋषभ पंतला धवनच्या जागी स्थान मिळण्याची शक्यता आहे.

कोहलीने धवनच्या मानसिकतेचेही कौतुक केले. त्याचा सकारात्मक दृष्टीकोनच त्याला लवकर तंदुरुस्त बनविण्यात मदत करेल. त्याला खेळायचे आहे. धवनची ही मानसिकता इजा बरे करण्यास आणि खेळण्यासाठी तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असेही कोहलीने म्हटले आहे. धवनला दोन आठवड्यांसाठी प्लास्टर करण्यात येणार आहे. धवनच्या रिकव्हरीबद्दल अशी कोणतीही ठराविक टाइमलाइन दिली नसली तरी विराटने धवनच्या डाव्या हाताच्या प्रगतीविषयी संकेत दिले आहेत.

विश्व करंडक स्पर्धेच्या साखळी सामन्यात तसेच उपांत्य सामन्यांत सलामी जोडीची उपलब्धी ही महत्त्वाची ठरणार आहे, असे संघ व्यवस्थापनाला वाटते. थ्रो करताना त्याला त्रास होईल का हेदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे, कारण तो एक स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणारा प्रमुख खेळाडू आहे. धवन हा मूळात उजवा असला तरी तो डावखुरी फलंदाजी करतो, असे भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी म्हटले आहे.

धवनच्या अनुपस्थितीत के. एल. राहुल रोहित शर्मासोबत फलंदाजीसाठी सलामीला मैदानात उतरेल, परंतु चौथ्या क्रमांकावर नक्की कोणाला खेळवायचे हा भारतीय संघासमोरील डोकेदुखी ठरणारा प्रश्न कायम राहणार आहे. भारताचा पुढील सामना पाकिस्तानविरुद्ध रविवारी (ता.16) मँन्चेस्टर येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात दिनेश कार्तिक किंवा विजय शंकर या दोघांपैकी कोणाला अंतिम संघात स्थान मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

loading image