विराट कोहली - रोहित शर्मा एकमेकांचे तोंड पाहणार नाहीतच का?|Virat Kohli Rohit Sharma Dispute | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

virat kohli rohit sharma
विराट कोहली - रोहित शर्मा एकमेकांचे तोंड पाहणार नाहीतच का?

विराट कोहली - रोहित शर्मा एकमेकांचे तोंड पाहणार नाहीतच का?

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटसाठी (Indian Cricket) 2021 हे वर्ष संपता संपता भरपूर वाद देऊन जात आहे. भारतीय संघ (Team India) टी 20 वर्ल्डकपमधून पहिल्या फेरीतच बाहेर पडला. विराट कोहलीने (Virat Kohli) वर्ल्डकपपूर्वीत टी 20 मधील कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले. बीसीसीआयने (BCCI) रोहित शर्माकडे (Rohit Sharma) टी 20 पाठोपाठ एकदिवसीय संघाचेही कर्णधारपद (ODI Captaincy) सोपवले. जेव्हापासून नेतृत्वात बदल झाले आहे तेव्हापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली एकमेकाच्या नेतृत्वाखाली खेळले दिसले नाहीत.

टी 20 वर्ल्डकप नंतर विराट - रोहित एकत्र नाहीच

भारत युएईमध्ये झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा(Rohit Sharma) हे भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू एकत्र खेळलेले नाहीत. रोहित शर्माने न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेनंतर कसोटीसाठी विश्रांती घेतली होती. तर विराट कोहलीने टी 20 मालिकेसाठी विश्रांती घेतली.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत विराटचा आराम

न्यूझीलंड विरुद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. त्यावेळी भारताचा पूर्णवेळ टी 20 कर्णधार रोहित शर्माने भारताचे नेतृत्व केले. यानंतर न्यूझीलंड विरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार होती.

मात्र या कसोटी मालिकेत रोहित शर्माने विश्रांती घेतली. तर दुसऱ्या कसोटीत विराट कोहलीने पुन्हा कसोटी संघाची धुरा आपल्या हातात घेतली. यावेळी विराट कोहली आणि रोहित शर्मा एकत्र खेळले नाहीत.

विराटचे कर्णधारपद गेले

दरम्यान, न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेनंतर बीसीसीआयने भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa) कोसटी संघाची घोषणा केली. यावेळी त्यांनी अजून एक घोषणा करत भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले.

टी 20 प्रमाणे विराट कोहली एकदिवसीय संघाचेही नेतृत्व सोडले अशी चर्चा सुरु होती. तेवढ्यात बीसीसीआयने (BCCI) एकदिवसीय संघाचा कर्णधार बदलल्याची घोषणाच केली. ही एक प्रकारे विराट कोहलीची उचलबांगडीच होती. दरम्यान, बीसीसीआयच्या घोषणेनंतर रोहित शर्माने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची तयारी देखील सुरु केली. दुसरीकडे विराट कोहलीच्या बाजूने शांतता होती. त्याने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती.

रोहित शर्माच्या दुखापतीची बातमी

एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्येही उपकर्णधार म्हणून बढती मिळाली होती. रोहित शर्माही मुलाखतीतून नव्या भुमिकेबाबत खूष असल्याचे सांगत होता. मात्र सरावादरम्यान रोहित शर्माला दुखापत झाल्याचे वृत्त आले. पाठोपाठ तो दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेलाही मुकणार असल्याचे लगेचच समजले. त्याला प्रियांक पांचालच्या रुपाने बीसीसीआयने रिप्लेसमेंटही दिली.

रोहित पाठोपाठ विराटचीही माघार

रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेत नसणार हा धक्का भारतीय चाहत्यांच्या पचनी अजून पडला नाही. तोच विराट कोहली अजून संघाच्या बायो बबलमध्ये दाखल झाला नसल्याची माहिती समोर आली. त्यावर बीसीसीआय खुलासे देत असतानाच विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील एकदिवसीय मालिका खेळणार शक्यता नसल्याची बातमी आली.

विराट कोहलीने बीसीसीआयकडे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एका छोट्या ब्रेकची मागणी केली आहे. विराटने कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हा ब्रेक मागितला असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून कळते आहे. याबाबत बीसीसीआयने अजून अधिकृत माहिती दिलेली नाही. विराट आणि अनुष्काची मुलगी वामिका हिचा पहिला वाढदिवस 11 जानेवारीला येतो. त्यासाठीही विराट कोहलीने सुट्टी मागितली असल्याचे बोलले जात आहे.

बायो बबलमधील छोटी सुट्टी म्हणजे मालिकेला मुकणे

विराट कोहलीने जर वामिकाच्या पहिल्या वाढदिवसासाठी बीसीसीआयकडे सुट्टी मागितली असेल तर विराट कोहली दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीस मुकण्याची शक्यता आहे. कारण तिसरा कसोटी सामना हा 11 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहे.

जरी विराटने एक दोन दिवसाची सुट्टी मागितली तरी विराट कोहलीला या सुट्टीसाठी बायो बबल सोडावा लागणार आहे. एकदा का बायो बबल सोडला की पुन्हा बायो बबलमध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला विलगीकरणात जावे लागेल. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिके बरोबरच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेलाही मुकावे लागेल. कारण एकदिवसीय मालिकेतील तीन सामने लगेच 19, 21 आणि 23 जानेवारीला होणार आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही भारतीय संघात एकत्र दिसण्याची शक्यता कमी आहे. ज्यावेळी विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतीय संघात एकत्र खेळत असतात त्यावेळी संघाची ताकद काही औरच असते.