शार्दुल ठाकूरला विराटचा मानाचा मुजरा

Virat praises Shardul Thakur in Marathi article by Mukund Potdar
Virat praises Shardul Thakur in Marathi article by Mukund Potdar

वेस्ट इंडिज : 5 बाद 315
शार्दुल ठाकूर 10-0-66-1
भारत : 6 बाद 316
शार्दुल ठाकूर नाबाद 17 (6 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार)

वेस्ट इंडिजविरुद्ध कटकला रविवारी पार पडलेल्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने ही कामगिरी केली. बॅटींग करण्यापूर्वी शार्दुलची ओळख ही बोलींग ऑल राऊंडर किंवा युटिलीटी क्रिकेटर अशी नव्हती. त्याचे बोलींगचे आकडेही त्याची धुलाई झाल्याचे दाखवत होते, पण त्याने मोक्याच्या क्षणी निकोलस पूरन याला आऊट केले. 13 बॉल उरले असताना शार्दुलने त्याचा अडसर दूर केला. जर पूरन शेवटपर्यंत टिकला असता तर विंडीजला किमान सव्वातीनशेच्या पलिकडे तरी टार्गेट ठेवता आले असते. याचे कारण दुसरीकडे किएरॉन पोलार्ड होता. तो पण सेट होऊन टोलेबाजी करीत होता.

शार्दुलने एकमेव विकेट मोक्याच्या क्षणी घेतली. मग तो बॅटींगला उतरला तेव्हा जम बसलेला विराट कोहली परतला होता. अष्टपैलू रवींद्र जडेजा स्थिरावला होता. समीकरण म्हटले तर आवाक्यात, म्हटले तर हाताबाहेर अशी स्थिती होती. झटपट क्रिकेटमध्ये तीनशेच्या पलिकडील आव्हान अगदी गुंतागुंतीचे असते. कोणत्याही क्षणी पारडे फिरते. अशावेळी शार्दुलने फिनीशिंग केले.

24 बॉल-30 रन्स असे समीकरण असताना किमो पॉल विराटचा बचाव भेदतो. मग पुढच्याच चेंडूवर शार्दुल चौकार ठोकत दडपण झुगारून देतो. विंडीजचे प्रतिआक्रमणाचे इरादे नेस्तनाबूत करण्याचा जोरदार इशारा त्या कव्हर ड्राईव्हमध्ये असतो. त्यानंतर स्ट्राईक रोटेट करणे आणि मग शेल्डन कॉट्रेलला षटकार-चौकार ठोकत विजयाची औपचारीकता उरविणे असा पराक्रम तो गाजवितो.

अशा शार्दुलला कर्णधार विराटने खास शाबासकी दिली. मानला रे तुला ठाकूर हे विराटचे शब्द मेहनती शार्दुलसाठी जणू काही मानपत्रच ठरतात. शार्दुल आणि त्याच्यासारखाच मुंबईकर श्रेयस अय्यर यांना मिळालेले चान्स पुरेसे नव्हते, पण जो संधीची प्रतिक्षा करतो आणि ती मिळाल्यावर फायदा उठवितो तोच नाव कमावतो. संधी मिळत नाही म्हणून इतरांना नावे ठेवून उपयोग नसतो.

भारतीय क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजीत न भूतो अशी चुरस निर्माण झाली आहे. उमेश यादवने कसोटीतील उपयुक्तता सिद्ध केली, तर शार्दुल कटकमध्ये क्लीक झाला. झटपट क्रिकेटमधील कामगिरी म्हणजे फास्ट ट्रॅक असतो. शार्दुलला याआधी मिळालेली संधी आणि या कामगिरीनंतर मिळणारी संधी यात फरक असेल. यापुढे त्याच्याकडे एक मॅचवीनर म्हणून पाहिले जाईल.
विराटला त्याच्यासारखेच लढवय्ये आवडता. शार्दुल हा तर मुंबईकर क्रिकेटपटू म्हणजे उपजतच खडूस. त्यामुळेच विराटने दिलेले मानपत्र हे सुद्धा अगदी वेचक-वेधक अशा मराठीत.

शाब्बास शार्दुल, अशीच ठाकूरगिरी करीत राहा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com