
Wasim Akram : हे काही गल्लीतलं क्रिकेट नाही... नजम सेठींच्या पवित्र्यावर अक्रम काय म्हणाला?
Wasim Akram Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट बोर्ड हे आशिया कप 2023 च्या व्हेन्यूवरून वाद विवाद करत आहेत. आशिया क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जय शहा यांनी पाकिस्तानात होणारा आशिया कप त्रयस्थ ठिकाणी आयोजित केला जाईल असे सांगितले. त्यानंतर माजी पीसीबी चेअरमन रमीझ राजांपासून नवे पीसीबी सर्वेसर्वा नजम सेठी यांच्या पर्यंत सर्वांनी आपली मते व्यक्त केली.
सेठींनी एशियन क्रिकेट काऊन्सीलकडे चर्चेचा दरवाजा उघडण्याची विनंती केली होती. ती विनंती आता मान्य झाली आहे. या सर्वांबाबत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने आपले मत व्यक्त केले आहे.
वसीम आक्रमने सेठींनी घेतलेल्या भुमिकेला पाठिंबा देत रमीझ राजांनाही चिमटा काढला. वसीम अक्रम म्हणाला, 'नजम सेठी यांनी खूप योग्य उत्तर दिलं आहे. हा विषय दोन्ही सरकारांनी याला परवानगी देण्यावर अवलंबून आहे. तुम्ही दोन्ही बोर्डांसोबत योग्यरित्या चर्चा केली पाहिजे. हे काही गल्ली क्रिकेट नाही. जेथे तुम्ही आमच्या देशात आला नाही तर आम्ही देखील तुमच्या देशात येणार नाही. मला कळत नाही की ही कोणती मुलं आहेत. जे येतात आणि पाकिस्तान क्रिकेट चालवू पाहतात.'
वसीम अक्रमने रमीझ राजांवर देखील वक्तव्य केले. तो म्हणाला की, 'ते सहा दिवसांसाठी आले आता ते परत आपल्या मुळच्या ठिकाणी गेलेत. नजम सेठी यांच्याकडे अनुभव आहे. क्रिकेटर पीसीबीचा चेअरमन असायला हवा ही संकल्पना चुकीची आहे. हा एक प्रशासकीय जॉब आहे. तुम्हाला सगळ्या क्रिकेट बोर्डशी एक योग्य संवाद साधावा लागतो. नजम सेठी हे या जॉबसाठी योग्य व्यक्ती आहेत. मला कोणाला राग येईल याची परवा नाही.'