
West Indies : विंडीजची वर्ल्डकप टीमच होईना तयार; प्रशिक्षक सिमन्सनीं देखील टेकले हात!
नवी दिल्ली : वेस्ट इंडीजचे (West Indies) मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स (Phil Simmons) यांनी मोठ्या निराशेने सांगितले की वेस्ट इंडीज संघाकडून खेळण्याचे आवाहन खेळाडूंना करणे बंद केलं पाहिजे. कराण वेस्ट इंडीजचे अनेक खेळाडू फ्रेंचायजी लीगमध्ये खेळत आहेत. नाही तर ते दुखापतग्रस्त झाले आहे. त्यामुळे वेस्ट इंडीजला आगामी टी 20 वर्ल्डकपसाठी (T20 World Cup 2022) सर्वश्रेष्ठ संघ निवडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे प्रशिक्षक सिमन्स खूप निराश झाले आहेत.
इएसपीएन क्रीकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार सिमन्स म्हणतात की, 'यामुळे खूप वेदना होतात. यासाठी कोणताही वेगळा उपाय नाही. मात्र तुम्ही काय करू शकता? मला नाही वाटत की मला माझ्या लोकांना आपल्या देशाकडून खेळण्यासाठी आवाहन करायला हवे. मला असे वाटते की तुम्ही जर वेस्ट इंडीजकडून खेळू इच्छिता तर तुम्ही स्वतःला देशासाठी उपलब्ध कराल.'
सिमन्स पुढे म्हणाले की, 'जीवन बदललं आहे. आता लोकांकडे वेगवेगळ्या जागी जाण्याच्या संधी आहे. जर ते वेस्ट इंडीजला सोडून इतर ठिकाणी जात असतील तर परिस्थिती अशीच होणार आहे.' विंडीजच्या संघाकडून न खेळण्याऱ्या खेळाडूंची यादी खूप मोठी आहे. आंद्रे रसेल निवडीसाठी उपलब्ध नाही. विंडीजचा स्टार खेळाडू सुनिल नारायण सध्या द हंड्रेड स्पर्धा खेळत आहे. इविन लुईस आणि ओशाने थॉमस फिटनेस चाचणीसाठी आले नव्हते. तर शेल्डन कार्ट्रेल, फॅबियन अॅलन आणि रोस्टन चेस दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.
वेस्ट इंडीजने नुकतीच भारताविरूद्धची टी 20 मालिका 4 - 1 अशी गमावली. आता टी 20 वर्ल्ड कपपूर्वी संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चाचणी तपासून पाहण्यासाठी न्यूझीलंड विरूद्धच्या तीन सामन्यांची मालिका उरली आहे. दरम्यान, निवडसमिती प्रमुख डेसमंड हेन्स यांनी रसेल बाबतीत सांगितले की, माझ्या माहितीनुसार तो उपलब्ध नाही. कारण त्याने स्वतःच संघ निवडीसाठी उपलब्ध राहण्यास नकार दिला आहे. मला सर्व खेळाडूंनी वेस्ट इंडीजकडून खेळल्यास आनंद होईल. सर्व खेळाडूंनी स्वतःला संघासाठी उपलब्ध करावे असे वाटते.'