युरो फुटबॉल स्पर्धा कधी होणार? वाचा!

वृत्तसंस्था
Wednesday, 18 March 2020

फुटबॉल लीगची स्थिती

  • प्रीमियर लीग - ४ एप्रिलपर्यंत सर्व लढती स्थगित
  • ला लीगा - ४ एप्रिलपर्यंत लीग स्थगित
  • सिरी ए - इटली लॉकडाऊन असल्यामुळे लीगबाबत अनिश्‍चितता
  • बंडेस्लिगा - २ एप्रिलपर्यंत बंद
  • लीग वन - सुरुवातीस प्रेक्षकांविना; पण त्यानंतर बेमुदत लांबणीवर

लंडन - युरो फुटबॉल स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाल्याचे नॉर्वे तसेच स्वीडनच्या फुटबॉल संघटनांनी जाहीर केले. युरोपीय महासंघाची स्पर्धेचा निर्णय घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू होण्यापूर्वीच या स्पर्धेचे सह-यजमान असलेल्या दोन देशांनी स्पर्धा लांबणीवर पडल्याचे जाहीर केले.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

युरो स्पर्धा ११ जून ते ११ जुलै २०२१ या दरम्यान होईल, असे स्वीडीश संघटनेचे प्रमुख कार्ल एरिक निल्सन यांनी ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेस कळवले आहे. त्याच सुमारास नॉर्वे संघटनेने याच स्वरूपाचे ट्‌विट केले. युरोपातील ५५ फुटबॉल संघटनांचा सहभाग असलेली व्हिडीओ कॉन्फरन्स सध्या सुरू आहे. या बैठकीस क्‍लब तसेच विविध लीगचे प्रतिनिधीही खास निमंत्रित होते. 

युरो फुटबॉलच्या इतिहासात प्रथमच स्पर्धा लांबणीवर पडली आहे. अर्थात याचे संकेत युएफाने आपले कोपनहेगनमधील हॉटेल आरक्षण रद्द करून दिले होते. युरो स्पर्धा १२ जून ते १२ जुलैदरम्यान होणार होती. अद्याप पूर्ण न झालेल्या लीग ही युरो स्पर्धा लांबणीवर टाकण्याचे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. युरोपात इंग्लंड, स्पेन, इटली, फ्रान्स तसेच जर्मनीतील लीग महत्त्वाच्या आहेत. त्या सध्या स्थगित करण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर चॅम्पियन्स लीग, युरोपा लीग, विश्वकरंडक पात्रता लढतीही लांबणीवर पडल्या आहेत. युरो स्पर्धेऐवजी लीग पूर्ण करण्याकडे लक्ष देण्याची सूचना विविध लीगच्या प्रमुखांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will the Euro football tournament take place