Wimbledon 2022: जोकोविचला विम्बल्डनमध्ये अव्वल मानांकन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wimbledon 2022 novak djokovic and rafael nadal

Wimbledon 2022: जोकोविचला विम्बल्डनमध्ये अव्वल मानांकन

Wimbledon 2022 : सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचला एटीपी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असतानाही पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेत अव्वल मानांकन देण्यात आले आहे.( novak djokovic and rafael nadal)

स्पर्धेचे आयोजक असणाऱ्या ऑल इंग्लंड क्लबने रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे रशियन व बेलारूशी खेळाडूंना स्पर्धेत खेळण्यास बंदी घातल्याने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकवर असणारा डॅनिल मेदवेदेव हा या स्पर्धेचा भाग नसेल, तर जर्मनीचा दुसरा मानांकित अलेक्झांडर झ्वेरेवही दुखापतग्रस्त असल्याने या स्पर्धेत भाग घेणार नाही.

फ्रेंच ओपन विजेत्या राफेल नदालला या स्पर्धेसाठी द्वितीय मानांकन मिळाले असले तरी, जोकोविच-नदालला वेगवेगळ्या गटात जाग मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या दोन अव्वल खेळाडूंमध्ये वर्षातील तिसऱ्या जेतेपदासाठी अंतिम फेरीतच १० जुलै रोजी लढत शक्य आहे. या वर्षीच्या रोलँड गॅरोस उपांत्यपूर्व फेरीत या दोघांची गाठ पडली होती जिथे नदालने विजय मिळवला होता. तसेच, नदालविरुद्धच्याच फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीतून निवृत्त झाल्यानंतर झ्वेरेवच्या उजव्या घोट्याच्या फाटलेल्या अस्थिबंधांवर या महिन्यात शस्त्रक्रिया झाली होती.

कोरोनासाठी लसीकरण केलेले नसल्यामुळे वर्षाची पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोविचला आपल्या जेतेपदाचा बचाव करता आला नाही, त्यामुळेच त्याला मेदवेदेवकडून जागतिक क्रमवारीतील आपले पहिले स्थान गमवावे लागले.

जोकोविचने या ग्रासकोर्ट स्पर्धेवर वर्चस्व गाजविलेले आहे, विम्वल्डनमध्ये चांगली कामगिरी केली तरी, त्याची क्रमवारी अजून कमी होऊ शकते कारण, एटीपी व डब्ल्यूटीएने या स्पर्धेसाठीचे २,००० गुण काढून घेतलेले आहेत.

सरेना विल्यम्स बिगरमानांकित

महिला क्रमवारीत यूएस ओपन चॅम्पियन एम्मा राडूकानूला बेलारूसच्या आर्यना सबालेंकाच्या अनुपस्थितीत १०वे मानांकन मिळाले आहे. पोलंडची जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाच्या इगा स्विटेकला यामध्ये अव्वल तर एस्टोनियन अॅनेट कोंटावेटला दुसरे मानांकन देण्यात आलेले आहे, तर वाइल्ड कार्ड मिळालेल्या सेरेना विल्यम्सला मानांकन मिळालेले नाही कारण, ती गेल्या वर्षीच्या विम्बल्डनमधील पहिल्या फेरीच्या सामन्यातून निवृत्त झाल्यापासून स्पर्धात्मक टेनिस खेळलेली नाही.

Web Title: Wimbledon 2022 Novak Djokovic And Rafael Nadal Until The Final Sports

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top