ठाण्यातील शर्यतीत पिंटू अव्वल; करणसिंग विजेता

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 August 2019

खड्ड्यांचा सामना करीत पिंटूकुमार यादवने ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन पहिल्या क्रमांकाने पूर्ण केली खरी, पण या शर्यतीत विजेता ठरला तो करणसिंग. मुख्य शर्यत संपल्यावर झालेल्या आक्षेप आणि चौकशीनंतर पिंटू बाद ठरला आणि दुसऱ्या क्रमांकाने आलेल्या करणसिंगला विजेता घोषित करण्यात आले. 

ठाणे : खड्ड्यांचा सामना करीत पिंटूकुमार यादवने ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन पहिल्या क्रमांकाने पूर्ण केली खरी, पण या शर्यतीत विजेता ठरला तो करणसिंग. मुख्य शर्यत संपल्यावर झालेल्या आक्षेप आणि चौकशीनंतर पिंटू बाद ठरला आणि दुसऱ्या क्रमांकाने आलेल्या करणसिंगला विजेता घोषित करण्यात आले. 

नाशिक आर्मीकडून नोंदणी केलेल्या पिंटूने पुण्याच्या आर्मी स्पोर्टस्‌ इन्स्टिट्यूटच्या करण सिंगला जवळपास एका मिनिटाने मागे टाकले, पण या राज्यस्तरीय शर्यतीत सहभागासाठी आवश्‍यक असलेली कागदोपत्री औपचारिकता पिंटूकडून पूर्ण झाली नव्हती. आता यापूर्वी ठाणे जिंकलेल्या करण सिंग हा मूळचा हरयानाचा असला तरी तो महाराष्ट्रातील राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागासाठी असलेली पूर्तता त्याने पूर्ण केली आहे. 

आपण सांगता आहात, तेव्हाच मला मी जिंकल्याचे कळले आहे. अखेरच्या दीडशे मीटरमध्ये पिंकूप्रमाणे वेग वाढवू शकलो नाही, त्यामुळे अव्वल क्रमांक हुकला असेच वाटत आहे. आता हा माझा पहिलाच अनुभव आहे. अतिरिक्त 30 हजार माझ्यासाठी मोलाचे आहेत, असे करण सिंगने सांगितले; तर पालघरचा ज्ञानेश्‍वर चौथ्याचा तिसरा झाल्यामुळे खूश झाला होता. पहिल्या तिघांत नसल्यामुळे निराश होतो, पण आता जरा समाधान वाटत आहे असे त्याने सांगितले. 

कोणतीही स्पर्धा झाल्यावर आम्ही विजेत्या खेळाडूंची कागदपत्रे तपासतो. पिंटूकडे महाराष्ट्रातील स्पर्धेत खेळण्यासाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रे नव्हती. त्याचबरोबर या स्पर्धेचे निरीक्षक असलेले राजेश जोशी नाशिकचे आहेत. त्यांनी हा खेळाडू आमच्याकडे नोंदणीकृत नसल्याची माहिती दिली. त्यानेही आपली चूक झाल्याचे मान्य केले, असे ठाणे जिल्हा ऍथलेटिक्‍स संघटनेचे सचिव अशोक अहेर यांनी सांगितले. आम्ही स्पर्धेच्या प्रवेशिका ऑनलाईन स्वीकारल्या होत्या. त्यात पिंटूने आपण नाशिक आर्मीचे असल्याचे सांगितले होते, असे ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

घर सावरण्यास मदत होईल 
महिलांची शर्यत जिंकलेली आरती पाटील नाशिकची असली, तरी तिचे मूळ गाव कोल्हापूर आहे. गडहिंग्लज तालुक्‍यातील कडगाव हे तिचे मूळ गाव. पुरामुळे घराचे नुकसान झाले नसले, तरी शेतीचे झाले आहे. आता मी जिंकलेल्या बक्षीस रकमेची घर सावरण्यास मदत होईल. त्यासाठी मला हे विजेतेपद जास्त मोलाचे वाटत आहे, असे आरतीने सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: winner pintu disqualified, runner up karansingh won the race