जागतिक ब्रॉंझविजेती पूजाची चाचणीत हार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

जागतिक ब्रॉंझ पदक विजेती पूजा धांदा हिला जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीतच हार पत्करावी लागली. हा धक्कादायक निकाल सोडल्यास लखनौत झालेल्या महिलांच्या स्पर्धेचे निकालही काहीसे अपेक्षेप्रमाणेच आणि एकतर्फी लागले.

मुंबई: जागतिक ब्रॉंझ पदक विजेती पूजा धांदा हिला जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीतच हार पत्करावी लागली. हा धक्कादायक निकाल सोडल्यास लखनौत झालेल्या महिलांच्या स्पर्धेचे निकालही काहीसे अपेक्षेप्रमाणेच आणि एकतर्फी लागले.
सरिता मोर हिने 57 किलो गटात पूजाला 2-1 असे पराजित केले. लखनौतील या चाचणीत पूजासाठी भारतीय संघातील स्थान अवघड असणार याची कल्पना उपांत्य फेरीत आली होती. आंशू मलिकने पूजाविरुद्धच्या उपांत्य लढतीतील काही सेकंद बाकी असेपर्यंत 4-3 आघाडी राखली होती, पण पूजाने अखेरच्या सेकंदात गुण घेत 4-4 बरोबरी साधली आणि आगेकूच केली होती; मात्र सरिताने पूजाला प्रतिकाराची संधी लाभणार नाही याची काळजी घेतली.
साक्षी मलिक (62 किलो) आणि विनेश फोगत (53 किलो) यांना तर अंतिम फेरीत आव्हानही लाभले नाही. विनेशने पिंकीचा 9-0; तर साक्षीने रेश्‍मा मानेचा 13-2 असा सहज पाडाव केला. दोघींची एकतर्फी हुकुमत नक्कीच मार्गदर्शकांना जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने सुखावत असेल.
एकतर्फी अंतिम लढतींच्या मालिकेस सुरुवात करताना सीमाने 50 किलोच्या अंतिम सामन्यात निर्मलास 7-0 पराजित केले. किरणने 76 किलो गटाच्या अंतिम लढतीत गुरशरणप्रीत कौरला 6-4 असे हरवले; तर 68 किलो गटात दिव्या कांक्रणने नवज्योत कौरचा 6-3 असा पाडाव केला.
 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world bronze medallist wrestler lost in selection trial