World Cup Cricket 2023 Final : भारताचा स्वप्नभंग! ऑस्ट्रेलियाचा विजेतेपदाचा षटकार

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दहा सामन्यांत भारतीय फलंदाजांनी फेरारीच्या वेगात गाडी चालवली, परंतु अंतिम शर्यतीत तिची बैलगाडी झाली.
Winner Australia Cricket Team
Winner Australia Cricket Teamsakal

अहमदाबाद - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दहा सामन्यांत भारतीय फलंदाजांनी फेरारीच्या वेगात गाडी चालवली, परंतु अंतिम शर्यतीत तिची बैलगाडी झाली. अवघ्या २४० धावाच त्यांना करता आल्या. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सात गडी राखून पार केले आणि अजिंक्यपदाचा षटकार ठोकला. त्यामुळे विश्वकरंडक जिंकण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा धुळीस मिळाले. यासोबतच कोट्यवधी भारतीय क्रिकेटरसिकांचा स्वप्नभंग झाला.

स्पर्धेतील सर्व दहा सामने आणि आजचा अंतिम सामना हे पूर्णपणे विरोधाभासी होते. अंतिम सामन्याचे दडपण प्रामुख्याने फलंदाजांना पेलवले नाही. मानसिकता तेथेच कमकुवत झाली. अक्षरशः धावांसाठी झगडावे लागले. पहिल्या १० षटकांत दोन बाद ८० आणि नंतरच्या ४० षटकांत ८ बाद १६० अशी अवस्था झाली तेथेच ८० टक्के सामना गमावला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिलेदार ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळी साकार करून दोन्ही संघातला फरक स्पष्ट केला.

विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू झाल्यापासून भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच आघाड्यांवर जोरदार कामगिरी करून तमाम क्रीडारसिकांच्या आशा उंचावल्या होत्या. भारतीय संघ २०११ नंतर यंदा पुन्हा एकदा विजेतेपदाचा करंडक जिंकणार असा विश्‍वास वाटू लागला होता, मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी भारतीय संघाला लयच सापडू दिली नाही.

पहिल्या दोन सामन्यांत पराभव पत्करल्यानंतर आपल्या चुका सुधारत ऑस्ट्रेलियाने जोरदार कामगिरी केली. दोन्ही तुल्यबळ संघ असल्यामुळे अंतिम सामना रोमहर्षक होईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात सामन्यातील काही क्षण वगळता संपूर्ण सामन्यावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखले.

घाई अंगाशी

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली व भारताला फलंदाजीला बोलावले. सावध सुरुवात करणाऱ्या रोहित शर्माने मॅक्सवेलच्या षटकात एक षटकार व एक चौकार मारून दहा धावा वसुल केल्या, तरीही पुढच्या चेंडूवर पुढे सरसावत मोठा फटका मारण्याच्या मोहात तो बाद झाला. पाठोपाठ श्रेयस अय्यरही माघारी फिरला. पाच चेंडूत भारताने हे दोन फलंदाज गमावले तेथेच भारतीय फलंदाजीची गाडी चिखलात रुतली. ती विराट कोहली आणि राहुल यांनी बाहेर काढली खरी, परंतु अपेक्षांच्या ओझ्याखाली तिची चाके निखळली.

खेळपट्टीत बदल झाला?

भारतीय फलंदाज खेळत होते तेव्हा दुपारी धावांसाठी त्यांना झगडावे लागत होते. चौकार मिळणे मुश्कील झाले होते. चेंडू काहीसा थांबून येत होता, मात्र सायंकाळी विद्युत प्रकाशझोतात याच खेळपट्टीवर चेंडू चांगल्याप्रकारे बॅटवर येत होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने भारताला प्रथम फलंदाजी दिली. आपण नाणेफेक जिंकली असती तर प्रथम फलंदाजी स्वीकारली असती असे रोहित म्हणाला.

मुळात कमिन्सने रोहितपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने खेळपट्टी ओळखली. त्याने स्वतः आखूड टप्याचे कमी वेगात चेंडू टाकून भारतीय फलंदाजांना बांधून ठेवले होते. अर्धशतक करणारे विराट कोहली आणि के. एल. राहुल यांचा कमी ‘स्ट्राईक रेट’ हेच दर्शवणारा होता.

भारताच्या २४१ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना ४७ धावांत ३ बळी गेल्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अत्यंत सावधपणे खेळ केला आणि भारतीय गोलंदाजांना विजय टप्प्यात येईपर्यंत यश मिळू दिले नाही. ट्रॅव्हिस हेड (१३७) आणि लाबूशेन (नाबाद ५८) यांनी स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली.

एकाच वर्षात दुसरे अपयश

अपेक्षा उंचावयाच्या आणि निर्णायक क्षणी अवसानघात करायचे अशी भारतीय संघाची अवस्था झालीय. याच वर्षात जूनमध्ये झालेल्या कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना भारतीयांनी ऑस्ट्रेलियाकडूनच गमावला होता. आता एकदिवसीय विश्वकरंडकही ऑस्ट्रेलियाकडून गमावण्याची वेळ आली. भारताचा २००३ च्या विश्वकरंडक अंतिम सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता.

ट्रॅव्हिस हेड कर्दनकाळ

भारताने या वर्षात ‘आयसीसी’च्या दोन स्पर्धा गमावल्या दोन्ही वेळेस ट्रॅव्हिस हेड कर्दनकाळ ठरला. त्याने रविवारच्या अंतिम सामन्यात १३७ धावा केल्या, तर जून महिन्यात झालेल्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात १६३ धावांची खेळी केली होती.

ऑस्ट्रेलिया का जिंकले, भारत का हरला?

  • ऑस्ट्रेलियाने हवामानाचा अचूक अंदाज घेतला. त्यामुळेच नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय.

  • प्रत्येक भारतीय फलंदाजाचे कच्चे दुवे शोधून त्यानुसार योजना आणि अंमलबजावणी.

  • प्रत्येक भारतीय फलंदाजासाठी नियोजनबद्ध क्षेत्ररक्षण

  • ट्रॅव्हिस हेडकडून अत्यंत जबाबदारीपूर्ण खेळी, योग्य वेळी शतक

  • लाबुशेनची चांगली साथ

  • इतर सामन्यांमध्ये केलेली आक्रमक सुरुवात भारताला अंतिम सामन्यात करता आली नाही. आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्याने मधल्या फळीवर दबाव

  • भारताचे फिरकीपटू अपयशी.

  • के. एल. राहुल आणि सूर्यकुमार या दोघांनाही अधिक गतीने धावा करण्यात अपयश.

  • आणखी ५०-६० धावा झाल्या असत्या तर ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण झाला असता.

  • ऑस्ट्रेलियाकडून उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन

...तरीही भारताचा पराभव

  • भारताचे सलग - १० विजय

  • सर्वाधिक निर्धाव - ९ षटके

  • सर्वाधिक धावा - विराट कोहली - ७६५

  • सर्वाधिक विकेट - मोहम्मद शमी - २४

  • सर्वाधिक षटकार - रोहित शर्मा - ३१

  • सर्वोत्तम गोलंदाजी - मोहम्मद शमी - ७/५७

  • सर्वाधिक वेळा - ५ विकेट : शमी - ३ वेळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com