World Cup Hockey : भारताचे न्यूझीलंडविरुद्ध पारडे जड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hockey

World Cup Hockey : भारताचे न्यूझीलंडविरुद्ध पारडे जड

भुवनेश्वर : विश्वकरंडक स्पर्धेत प्रथमच खेळत असणाऱ्या वेल्स संघाविरुद्ध मोठ्या विजयाचा अपेक्षाभंग झाल्यामुळे विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत बाद फेरीत थेट प्रवेश मिळवण्याची भारताची संधी हुकली. त्यामुळे अंतिम आठ संघांत स्थान मिळवण्यासाठी उद्या न्यूझीलंडविरुद्ध झुंजावे लागणार आहे. अशातच हुकमी मिडफिल्डर हार्दिक सिंग दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत.

जागतिक हॉकी क्रमवारीत भारत सहाव्या; तर न्यूझीलंड १२ व्या स्थानावर आहे. न्यूझीलंडला आतापर्यंत विश्वकरंडक हॉकीत उपांत्य फेरी कधीही गाठता आलेली नाही. तसेच यंदाच्या स्पर्धेत लक्षवेधक कामगिरीही करता आलेली नाही. त्यामुळे कलिंगा स्टेडियमवर होणाऱ्या उद्याच्या सामन्यात भारताचे पारडे जड आहे.

मात्र हार्दिक सिंगच्या अनुपस्थितीची उणीव भासू न देणारा खेळ करावा लागणार आहे. १५ तारखेला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. काही दिवसांत तो तंदुरुस्त होईल असे सांगण्यात येत होते, परंतु आता तो स्पर्धेबाहेर गेला आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीमुळे भारताची आक्रमणातील ताकद काहीशी कमी झाली होती. वेल्सविरुद्ध ८ गोलांची गरज असताना हार्दिकची उणीव जाणवत होती. उद्याचा सामना जिंकून भारताने बाद फेरीत प्रवेश केला तरी उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या बेल्जियमचा सामना करावा लागणार आहे.

भारताने सलामीच्या सामन्यात स्पेनवर मिळवलेल्या विजयात हार्दिकने एकहाती मैदानी गोल केला होता. उद्या त्याच्याऐवजी राजकुमार पालची निवड करण्यात आली आहे. राजकुमार वेल्सविरुद्ध खेळला नव्हता.

वेल्सचा संघ स्पर्धेतील सर्वांत दुबळा समजला जात होता. त्यांच्याविरुद्ध इंग्लंडने ५-०; तर स्पेनने ५-१ असे विजय मिळवले होते. भारताला मात्र ४-२ अशा विजयावर समाधान मानावे लागले होते.

न्यूझीलंडवर वर्चस्व

गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या प्रो लीग स्पर्धेत भारताने न्यूझीलंडवर दोनदा ४-३ आणि ७-४ विजय मिळवले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही सामने कलिंगा स्टेडियमवर झाले होते.