जागतिक वेटलिफ्टिंगमध्ये  मीराबाईवर प्रमुख मदार 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 September 2019

ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी मीराबाई चानू हिच्यासह एकंदर चार महिला आणि तीन पुरुष वेटलिफ्टर्सची निवड झाली आहे. 

नवी दिल्ली: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताचा केवळ सात खेळाडूंचा संघ सहभागी होईल. या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी मीराबाई चानू हिच्यासह एकंदर चार महिला आणि तीन पुरुष वेटलिफ्टर्सची निवड झाली आहे. 

माजी विजेत्या मीराबाईसह (49 किलो), राष्ट्रकुल विजेती झिल्ली दालाबेहेरा (45 किलो), स्नेहा सोरेन (55 किलो), राखी हलादर (64 किलो) या महिलांची निवड झाली आहे; तर युवा ऑलिंपिक विजेता जेरेमी लारिन्नुंगा (67 किलो), राष्ट्रकुल विजेता अजय सिंग (81 किलो) आणि अचिंता शेऊली (73 किलो) यांचा संघात समावेश आहे. 

ऑलिंपिक स्पर्धा लक्षात घेऊनच ही निवड झाली आहे. त्यांना टोकियोसाठी सहा पात्रता स्पर्धांत खेळणे आवश्‍यक आहे. भविष्याचा विचार करून काही नवोदितांचीही उच्चस्तरीय प्रशिक्षणासाठी निवड केली आहे, असे राष्ट्रीय मार्गदर्शक विजय शर्मा यांनी सांगितले. 

दोन वर्षांपूर्वीच्या जागतिक स्पर्धेत मीराबाईने 48 किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. गतवर्षी दुखापतीमुळे ती या स्पर्धेत खेळली नव्हती. यंदा तिने फेब्रुवारीतील स्पर्धेत 192 किलो आणि आशियाई स्पर्धेत 199 किलो वजन उचलले होते. आशियाई स्पर्धेत मीराबाईचे पदक थोडक्‍यात हुकले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In World Weightlifting Head over to Mirabai