राहुलच्या मूळगावी माळेवाडीत दिवाळी

अलताफ कडकाले
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सोलापूर - माळेवाडी (ता. जामखेड) येथील सुपुत्र राहुल बाळासाहेब आवारे याने ५७ किलो वजनी गटात ‘फ्री स्टाइल कुस्ती’ प्रकारात आक्रमक खेळाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला कुस्तीत पहिले सुवर्णपदक मिळवून देताच त्याच्या मूळगावी म्हणजेच माळेवाडीसह जामखेड तालुक्‍यात फटाके फोडून, पेढे वाटून दिवाळीसारखाच आनंद व्यक्‍त करण्यात आला.

दुष्काळी पट्ट्यात माळेवाडी हे राहुल आवारेचे मूळ गाव आहे. येथेच त्याची वडिलोपार्जित शेती असून, आजही राहुलचे नातेवाईक येथेच राहत आहेत. राहुलचे चौथीपर्यंतचे शिक्षण माळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर आवारे कुटुंबीय पाटोदा (जि. बीड) येथे स्थायिक झाले. बाळासाहेब हेही नामांकित कुस्तीपटू. त्यांची राहुल व गोकूळ ही दोन्ही मुले कुस्तीपटू आहेत. 

बाळासाहेब म्हणाले, ‘‘घरातल्या कुस्तीच्या वातावरणामुळे राहुल तिसरीत असल्यापासून कुस्ती खेळतोय. मी स्वतःच त्याला घरीच प्रशिक्षण द्यायला सुरवात केली. जत्रांच्या वेळी फड भरतात. त्या ठिकाणी आम्ही बापलेक एकत्र जायचो. त्यातूनच तो शिकत गेला. त्याची शाळा सकाळी १० ते ४ अशी असायची. मध्ये जेवणाची सुटी मिळायची. पाटोद्यापासून ८-१० किलोमीटर अंतरावर तालीम तयार केली होती. तालीम म्हणजे अक्षरशः पत्र्याची शेड होती. राहुलने तिथेच सराव केला. आता, आमच्या घरापासून जवळ तालीम केंद्र आहे. पत्र्याच्या शेडमध्ये खेळलेल्या राहुलने मिळवलेलं यश आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.’’ 

राहुल आवारेच्या यशामुळे जामखेडसारख्या दुष्काळी तालुक्‍याचे नाव आज खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर पोचले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राहुल आवारेने मिळविलेले यश सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
- प्रा. राम शिंदे, पालकमंत्री, नगर

Web Title: wrestling competition rahul aware malewadi