
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी मेगा फायनल रंगणार आहे. या दोन्ही संघात कोण भारी ठरणार? यासंदर्भातील चर्चा आता जोर धरु लागल्या आहेत.
WTC Final: ब्रेट लीची 'बोलंदाजी' विराट सेनेला टेन्शन देणारी
World Test Championship Final : ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसंदर्भात मोठे विधान केले आहे. 18 ते 22 जून रोजी साउथहॅम्प्टनच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी मेगा फायनल रंगणार आहे. या दोन्ही संघात कोण भारी ठरणार? यासंदर्भातील चर्चा आता जोर धरु लागल्या असून ब्रेटलीने फायनलमध्ये कोणाचे पारडे जड असेल, यावर भाष्य केले आहे. मेगा फायनलमध्ये न्यूझीलंडचा संघ भारी ठरेल, असे भाकित ब्रेटलीने केले आहे. यासंदर्भात त्याने कारणही सांगितले.
न्यूझीलंडचा संघ घरच्या मैदानावर ज्या परिस्थितीत खेळतो त्याच पद्धतीच्या वातावरणात ते फायनल खेळणार आहेत. इंग्लंडच्या खेळपट्टीवर चेंडू स्विंग होण्याचा अंदाज आहे. न्यूझीलंडमध्येही अशाच प्रकारच्या खेळपट्ट्या असतात. त्यामुळे इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या फायनलमध्ये न्यूझीलंडच्या संघाला अधिक फायदा होईल, असे ब्रेटलीला वाटते. ब्रेटलीची ही बोलंदाजी टीम इंडियाचे टेन्शन वाढवणारी आहे.

दोन्ही संघातील फलंदाजीसंदर्भात ब्रेटली म्हणाला की, फलंदाजीचा विचार केल्यास दोन्ही संघ समतोल वाटतात. दोन्ही संघात स्विंग खेळू शकतील असे फलंदाज आहेत. पण ज्यावेळी गोष्ट गोलंदाजीकडे येते त्यावेळी न्यूझीलंडचे पारडे जड होते. जो संघ चांगली गोलंदाजी करेल तो ट्रॉफी उचलेल, असा अंदाज ब्रेटलीने व्यक्त केलाय.
साउथहॅम्प्टनच्या खेळपट्टीबाबत ब्रेट ली म्हणाला की, या ठिकाणची खेळपट्टी सुपर फास्ट वाटत नाही. खेळपट्टी उत्तम असेल याची आशा आहे. पण गोलंदाजांना अधिक फायदा उठवता येईल, असे वाटते. दोन्ही संघात टक्कर होईल. एवढेच नाही तर स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्याने व्यक्त केलाय.