
WTC Final 2023 : 'परिस्थिती बघून संघ निवडा...' WTC फायनलपूर्वी माजी दिग्गजाने टीम इंडियाला दिला इशारा
Ind vs Aus WTC Final 2023 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सात जूनपासून जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यासाठी अंतिम अकरा जणांचा संघ आधीच ठरवू नका.
ओव्हल येथील खेळपट्टी अन् परिस्थिती पाहूनच भारतीय संघाची निवड करा, असा सल्ला भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी टीम इंडियाला दिला आहे.
भारत-न्यूझीलंड यांच्यामध्ये दोन वर्षांपूर्वी जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्याच्या आधी तेथे पाऊस पडला होता. मात्र त्यानंतरही भारतीय संघामध्ये तीन वेगवान गोलंदाज व दोन फिरकी गोलंदाज यांचा समावेश करण्यात आला. याचा फटका भारतीय संघाला बसला. न्यूझीलंडने जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना जिंकला.
पहिल्यावहिल्या स्पर्धेच्या जेतेपदावर त्यांनी मोहोर उमटवली. या लढतीबाबत प्रसाद म्हणाले, भारतीय संघाने दोन फिरकी गोलंदाज व तीन वेगवान गोलंदाज खेळवण्याचे ठरवले होते. पण पाऊस पडल्यानंतर योजनेत बदल करायला हवा होता. मात्र तसे झाले नाही. संघ व्यवस्थापन त्याच योजनेवर कायम राहिले. अखेर भारतीय संघ पराभूत झाला, असे प्रसाद यांनी नमूद केले.
ओव्हलमधील खेळपट्टी व वातावरण कसे यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे. कसोटीच्या पाच दिवसांमध्ये त्यामध्ये कोणते बदल होतील हेही सांगता येणार नाही. त्यामुळे आधीच संघ ठरवण्याची चूक करू नये, असे प्रसाद यांना वाटते.
रिषभ पंत सर्वोत्तम
प्रसाद यांनी रिषभ पंत याचेही या वेळी कौतुक केले. ते म्हणाले, रिषभ पंत याने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड येथे धावांचा पाऊस पाडला आहे. भारतातील इतर कोणत्याही यष्टिरक्षकाला ते जमले नाही. म्हणून पंत भारताचा सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे. त्याच्या अनुपस्थितीत के. एस. भारत याला संधी द्यायला हवी, असे प्रसाद म्हणाले.
भारतीय फलंदाजांवर अवलंबून
भारताची फलंदाजी आणि ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी असा हा सामना असणार आहे. शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे हे भारताचे फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स, जोश हॅझलवूड, मिचेल स्टार्क या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा कशाप्रकारे सामना करताहेत यावर या लढतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे, असे प्रसाद स्पष्ट करतात