#SteppingOut : लढवय्या युवराजचा क्रिकेटला निरोप 

#SteppingOut : लढवय्या युवराजचा क्रिकेटला निरोप 

मुंबई : यशापेक्षा अपयशच जास्त आले; पण कधीही हार मानली नाही. अखेरपर्यंत कसे लढायचे, हे मला क्रिकेटने शिकवले, अशा शब्दांत भावना व्यक्त करत षटकारकिंग म्हणून ओळख असलेला, कर्करोगावरही मात करून पुन्हा तेवढ्याच जोमाने आणि जिद्दीने खेळणाऱ्या युवराजसिंगने क्रिकेटचा निरोप घेतला. 

भारतात झालेल्या 2011 मधील विश्‍वकरंडक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू युवराजने असाच बहुमान 2007 च्या पहिल्या ट्‌वेन्टी-20 स्पर्धेतही मिळवला होता. 17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 400 हून अधिक सामने खेळल्यानंतर युवराजने आज या शानदार कामगिरीला पूर्णविराम देण्याचा निर्णय मुंबईत जाहीर केला. एकदोन वर्षांनंतर प्रशिक्षण क्षेत्रात जायचे आहे, त्याद्वारे क्रिकेटची सेवा कायम ठेवायची आहे, असे युवराजने निवृत्ती जाहीर करताना सांगितले. 

लढण्याची जिद्द मिळाली 
क्रिकेटने मला सर्वस्व दिले, त्यामुळेच मी येथे उभा आहे. या खेळावर प्रेमाचे आणि नाराजीचे असे दोन्ही प्रकारचे नाते राहिले. या खेळाने मला जे दिले त्यामुळे तिरस्कार करण्याचा प्रश्‍नच नाही. हा खेळ माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक राहिला आहे. याच खेळाने मला लढण्याची जिद्द दिली. जमिनीवर पडल्यावर माती झटकण्याची ऊर्जा दिली. अशा प्रकारे मी वारंवार उठून उभा राहिलो आणि मार्गक्रमण करत राहिलो, अशी भावना व्यक्त करताना युवराज अधूनमधून भावनिक होत होता. 

वडिलांचे स्वप्न 
मी क्रिकेटपटू व्हावे आणि विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळावे, हे वडिलांचे स्वप्न होते. ते मी पूर्ण करू शकलो याबद्दल मी सुदैवी समजतो आणि या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे मी आभार मानतो, असे सांगताना युवराजने वडील योगराज यांच्याबरोबचे नातेही जाहीरपणे मांडले. वडील, आई, पत्नी यांच्याशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला. गेल्या 20 वर्षांत वडिलांशी मी कधीच एवढी चर्चा केली नव्हती, ती आता केली यावरून आमच्यातील नात्याची तुम्हाला कल्पना येईल, असे युवराज म्हणाला. 

स्वर्गाला हात लावून आलो 
2011 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत चार मॅन ऑफ दी मॅच आणि मालिकावीर असा बहुमान स्वप्नवत होता; पण त्यानंतर कर्करोगाशी सामना करताना मी स्वर्गाला हात लावून आलो. हे सर्व इतक्‍या झटपट झाले, की काहीच समजत नव्हते, पण मी हार स्वीकारली नाही. या आजाराशी सामना करताना उपचार करणाऱ्या सर्व डॉक्‍टरांचे मी आभार मानतो, अशी जाणीव युवीने व्यक्त केली. आता "युविकॅन' या माझ्या फौंडेशनमार्फत कर्करोग पीडितांना मदत करणार आहे. हा आजार होणाऱ्या गरीब पीडितांसाठी निधीही उभारणार आहे, असे युवराजने सांगितले. 

आठवणीतील खेळी 
आठवणीतील खेळींबाबत बोलताना युवराजने 2002 मधील इंग्लंडमधील नॅटवेस्ट स्पर्धेतील अंतिम सामन्यातील खेळी, 2004 चे लाहोरमधील कसोटी शतक, 2007 टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतील सलग सहा षटकार आणि 2011 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामना, या लढतींची आठवण सांगितली. 

सर्वांत मोठे अपयश 
2014 च्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 21 चेंडूंत मला 11 धावाच करता आल्या, ते माझे सर्वांत मोठे अपयश होते. आपली कारकीर्द येथेच संपली, अशी मला जाणीव झाली होती, पण लढत राहण्याची जिद्द उफाळून आली. काही वेळ घेतला आणि पुन्हा जोमाने पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियात सिडनीत टी-20 लढतीत अखेरच्या षटकात षटकार आणि चौकार मारून विजय मिळवला, त्यामुळे आत्मविश्‍वास पुन्हा मिळवला. त्याअगोदर देशांतर्गत स्पर्धांतही धावांचा रतिब घातला होता, असे युवीने सांगितले. 

गांगुलीचे आभार 
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली मी कारकिर्दीची सुरवात केली. आयडॉल सचिन तेंडुलकर आणि श्रेष्ठ खेळाडू अनिल कुंबळे, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, राहुल द्रविड आणि जवगल श्रीनाथ यांच्याबरोबर खेळण्याची संधी मिळाली. झॅक (झहीर खान), गौती (गौतम गंभीर), वीरू (वीरेंद्र सेहवाग), आशू (आशिष नेहरा), भज्जी (हरभजनसिंग) हे माझे खास मित्र होते. याच संघाबरोबर आम्ही धोनीच्या नेतृत्वाखाली आणि गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली विश्‍वविजेतेपद मिळवल्याचेही युवी म्हणाला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com