बांगलादेशवर मात करत झिंबाब्वेचा पाच वर्षांनी कसोटी विजय

वृत्तसंस्था
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

ब्रॅंडन मावुटा आणि सिंकदर रझा यांच्या गोलंदाजीच्या जोरावर झिंबाब्वेने मंगळवारी यजमान बांगलादेशचा पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात 151 धावांनी पराभव केला. झिंबाब्वेचा गेल्या पाच वर्षांतील हा पहिला कसोटी विजय ठरला. 

सिल्हेट (बांगलादेश) : ब्रॅंडन मावुटा आणि सिंकदर रझा यांच्या गोलंदाजीच्या जोरावर झिंबाब्वेने मंगळवारी यजमान बांगलादेशचा पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात 151 धावांनी पराभव केला. झिंबाब्वेचा गेल्या पाच वर्षांतील हा पहिला कसोटी विजय ठरला. 

विजयासाठी 321 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाने चौथ्या दिवशी बिनबाद 26 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरवात केल्यावर त्यांचा डाव 169 धावांत आटोपला. कसोटी पदार्पण करणारा लेग स्पिनर मावुटा याने 21 धावांत 4, तर ऑफ स्पिनर रझाने 41 धावांत 3 गडी बाद करून विजयात मोलाचा वाटा उचलला. झिंबाब्वेकडून पदार्पण करणारा आणखी एक खेळाडू वेलिंग्टन मसाकद्‌झा याने 2 गडी बाद केले. 

झिंबाब्वेने 2013 मध्ये हरारे येथे पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी पहिल्या विजयाला गवसणी घातली. त्याचबरोबर त्यांना 17 वर्षांनी पहिला मालिका विजय नोंदविण्याची संधी आहे. यापूर्वी 2001 मध्ये त्यांनी बांगलादेशवर विजय मिळविला होता. मालिकेतील दुसरी कसोटी ढाका येथे 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. 

चौथ्या दिवसाच्या सकाळीच रझाने बांगलादेशच्या तीन महत्त्वपूर्ण विकेट मिळवून त्यांना अडचणीत आणले. कर्णधार महमुदुल्लाने स्वतःला बढती देत फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला; पण तोदेखील अपयशी ठरला. झिंबाब्वेच्या फिरकीपुढे त्यांचे फलंदाज टिकू शकले नाहीत. 

मी प्रचंड उत्साहित झालो आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने मैदानावर खूप मेहनत घेतली आणि आपले सर्वस्व पणाला लावले. प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. 
हॅमिल्टन मसाकद्‌झा, झिंबाब्वे कर्णधार 

संक्षिप्त धावफलक 
झिंबाब्वे 282 आणि 181 वि.वि. बांगलादेश 143 आणि 169 (इम्रूल कायेस 43, अरिफुल हक 38, बावुटा 4-21, रझा 3-41, मसाकद्‌झा 2-33). 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zimbabwe wins 1st test after 5 years