भाईचा बड्डे, वाजले की बारा!

अक्षय गुंड
Tuesday, 17 December 2019

भुताष्टेचा युवक सागर यादव म्हणतो, माझ्या वाढदिवशी माझ्या सर्व मित्रांचा "पार्टी दे' असा आग्रह असतो. त्यामुळे एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यास 10 ते 15 हजार रुपये खर्ची पडतात. त्यामुळे घरीच जेवणाची मेजवानी करून मित्रमंडळी व गावकरी बोलावून वाढदिवस साजरा करतो. मित्र खूप दिवसांनी भेटतो म्हणून डीजेच्या तालावर डान्स करून आनंद घेत असतो. परंतु वाढदिवशी विधायक कार्य करण्याची संकल्पनाही करतो.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : शहरात जसे रात्री-अपरात्री रस्त्यांवर, चौकांत वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार सर्रास चालतात, तसेच आता ग्रामीण भागात देखील पाहायला मिळत आहे. "मुळशी पॅटर्न' चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून तरुणाईमध्ये वाढदिवस साजरा करण्याची एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. "भाईचा बड्डे, वाजले की बारा!' असे म्हणत मित्रांचे वाढदिवस थाटात साजरे करण्याची संस्कृती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत असून, सोशल मीडियात क्रेझ निर्माण करण्यासाठी भर रस्त्यावर तलवारीने केक कापणाऱ्या व गोंधळ घालणाऱ्या टोळक्‍यांची संख्याही वाढत आहे.

हेही वाचा : आयुष्याच्या संध्याकाळी पेन्शनसाठी भांडण्याची वेळ

स्पर्धा वाढदिवस साजरा करण्याची
सोशल मीडियाचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो. सर्वाधिक प्रमाण वाढदिवस साजरा करण्याचे दिसून येते. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवर वाढदिवस साजरा करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज कोणाचा वाढदिवस आहे, हे सोशल मीडियातून तत्काळ समजत असल्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे फॅड सध्या जोरात सुरू आहे. वर्षातून एक दिवस चर्चेत राहण्यासाठी युवक प्रत्येकाच्या लक्षात राहील असा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी प्रत्येकाची वाढदिवस करायची जणू स्पर्धाच लागलेली दिसते.

हेही वाचा : सोलापुरातील उड्डाणपुलाच्या कामाला "ब्रेक'

विकृत पद्धतीत होतेय वाढ
सोशल मीडिया येण्याच्या अगोदर काही मोजक्‍याच क्षेत्रातील व्यक्तींचा, लहान मुलांचा अथवा ज्यांच्याकडे संपत्ती, प्रतिष्ठा आहे अशा व्यक्तींचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्‍यात साजरा केला जात असे. त्याची चर्चा सर्वत्र व्हायची. परंतु, सोशल मीडियामुळे मात्र आता कुणीच मागे राहिले नाहीत. वाढदिवस हा जीवनातील अविस्मरणीय दिवस समजला जातो. त्यासाठी मित्रांसह आई-वडील, नातेवाइकांचा आशीर्वाद व शुभेच्छांची जोड महत्त्वाची ठरते. मात्र, आता त्यास फाटा देत वाढदिवस म्हणजे मौजमजा, सेलिब्रेशन, धांगडधिंगा अशा प्रवृत्तीत वाढ होत आहे. विकृत पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे फॅड सध्या जोमात आहे.

हेही वाचा : तपासणी न केल्याने "याचे' रखडले हस्तांतरण

सोशल मीडियातून "भाईगिरी'चे वेड
वाढदिवस साजरा करणारे, "बर्थडे बॉय'ला घेऊन एखाद्या चौकात, मुख्य रस्त्यावर जमतात. त्यांच्या दुचाक्‍या आडव्या लावतात आणि मग एका दुचाकीवर केक ठेवून तो कापला जातो. या वेळी वाहनांचे कर्णकर्कश्‍श हॉर्न व फटाक्‍यांची आतषबाजी होते. मग कापलेला केक एकमेकांच्या तोंडाला फासण्याची विकृत पद्धत मोठ्या अभिमानाने मिरवत हा युवा जोश सुरू असतो. तर अनेकदा वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवार व धारदार घातक हत्यारांचादेखील वापर केला जातो. यात विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील तरुणाला "भाईगिरी'चे, सोशल मीडियातून प्रसिद्धीचे लागलेले वेड. आपण भाई आहोत, आपला कसा दरारा आहे, हे दाखवण्यासाठी अनेक तथाकथितांकडून वाढदिवसाचे आयोजन केले जाते. या वेळी मोठ्या प्रमाणात मित्रमंडळी, हस्तकांना जमवून शक्तिप्रदर्शन केले जाते. जेवढी वाढदिवसाला संख्या जास्त, तेवढा मोठा भाई, असे या विश्‍वात हे युवक गुंतलेले दिसतात. वाढदिवसासाठी शहरातील एखाद्या भाईला बोलावले जाते. हा भाई देखील वाढदिवसाला एकटा न येता गल्लीबोळातील 10 ते 15 युवक सोबत घेऊन येताना दिसतो. एकंदरीत वर्षातून एक दिवस आपल्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा वर्षाव बघून प्रत्येकजण सेलिब्रेटी असल्याचा मनोमन आनंद वाटून घेतात.

हेही वाचा : बेफिकीर प्रशासनाचा नमुना सत्तर फूट रोड!

वाढदिवस साजरा करण्याबाबत अनेकांचं असं आहे म्हणणं...
भुताष्टेचा युवक सागर यादव म्हणतो, माझ्या वाढदिवशी माझ्या सर्व मित्रांचा "पार्टी दे' असा आग्रह असतो. त्यामुळे एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यास 10 ते 15 हजार रुपये खर्ची पडतात. त्यामुळे घरीच जेवणाची मेजवानी करून मित्रमंडळी व गावकरी बोलावून वाढदिवस साजरा करतो. मित्र खूप दिवसांनी भेटतो म्हणून डीजेच्या तालावर डान्स करून आनंद घेत असतो. परंतु वाढदिवशी विधायक कार्य करण्याची संकल्पनाही करतो.
माढा कॉलेजचा विद्यार्थी इम्रान बागवान म्हणतो, सध्या सोशल मीडियावर प्रसिद्धीची प्रत्येकाला भुरळ आहे. मित्राचा वाढदिवस आम्ही लक्षात राहील अशा वेगळ्या पद्धतीने साजरा करतो. सध्या वाढदिवस करण्याचा ट्रेंडच आहे. त्यात तरुणाई मागे कशी राहील! बदलत्या काळानुसार त्या गोष्टी केल्याच पाहिजेत.
उपळाई बुद्रूकचा युवक श्रीकृष्ण डुचाळ म्हणतो, वाढदिवसाच्या निमित्ताने नवे-जुने मित्र परिवार एकत्रित येतात. त्यात वाढदिवस हा वर्षातील एक आनंदाचा दिवस असतो. प्रत्येकाला आपला देखील वाढदिवस साजरा व्हावा, अशी काहीतरी वेगळे करण्याची संकल्पना असते.
माढाचे पोलिस निरीक्षक भगवान खारतोडे म्हणतात, युवकांनी वाढदिवस साजरा करताना रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालू नये. रात्रीच्या वेळी इतरांना त्रास होईल असे कृत्य करू नये.
मदर ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अभिमन्यू उकिरडे म्हणतात, वाढदिवस साजरा जरूर करावा, पण सांस्कृतिक पद्धतीने कौटुंबिक वातावरणात करावा. रस्त्यावर इकडे-तिकडे दारू पिऊन अथवा अंडी वगैरे फोडून धिंगाणा घालणे हे आपल्या संस्कृतीत नाही. युवकांनी सोशल मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी भरकटत जाऊ नये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Different Ways to Celebrate Youth Birthday