esakal | वैवाहिक आयुष्यात रोज वाद होतात? भांडण मिटवण्यासाठी करा 'हे' ८ प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

husband wife dispute.jpg

वैवाहिक आयुष्यात रोज वाद होतात?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या काही काळात जोडप्यांमधील घटस्फोट घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यात मुंबई, पुणे यासारख्या शहरी भागात या घटस्फोटचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळतं. लहानसहान कारणांवरुन खटके उडाले, वैचारिक मतभेद झाले की लगेच ही तरुण मंडळी विभक्त होण्याचा निर्णय घेतात. आता प्रत्येकाच्या घटस्फोटाचं कारण वेगवेगळं असतं. मात्र, त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो. त्यामुळेच नात्यात दुरावा येत असल्याचं जाणवू लागल्यास त्या समस्येकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच नात्यातील दुरावा मिटवण्यासाठी काय करावं ते जाणून घेऊयात. (8-Things-To-Try-Before-Giving-Up-On-Your-Marriage)

१. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप थांबवा -

भांडण करताना अनेक जण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. पतीने किंवा पत्नीने कशी फसवणूक केली, त्रास दिला याचा सतत पाढा वाचत असतात. मात्र, असं वर्तन करणं सोडून द्या. वाद घालण्यापेक्षा आपण कुठे चुकतोय याचा विचार करा. जर तुम्हाला उत्तर सापडलं तर कदाचित तुम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णयदेखील मागे घ्याल.

२. वाद सोडवण्याचा प्रयत्न करा -

'झालं गेलं गंगेला मिळालं', असं म्हणत झालेल्या वादावर पडदा टाका. भांडणातील मुद्दे परतपरत उगाळात बसू नका. त्यामुळे वाद आणखी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नेमका वाद कशामुळे होतोय त्याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करा. मनात द्वेष, मत्सर ठेऊ नका.

हेही वाचा: कोणालाही दिसणार नाहीत लव्हबाईट्सचे डाग; वापरा 'या' ट्रिक्स

३. भविष्याकडे लक्ष द्या -

भूतकाळात झालेल्या गोष्टी तिथेच विसरुन पुढे निघून जायचं असतं. त्यामुळे यापूर्वी काय झालं याकडे लक्ष देण्यापेक्षा यापुढे काय करु शकतो यावर लक्ष केंद्रित करा. तसंच झालेल्या जुन्या गोष्टींवरुन सतत समोरच्याला टोमणे मारणं, रागात बोलणं बंद करा. तसंच पती किंवा पत्नीचा राग दुसऱ्या व्यक्तींवर काढू नका. त्यामुळे भावी आयुष्यातील नात्यांवर परिणाम होऊ शकतो.

४. शारीरिक प्रेम किंवा आकर्षण वाढवणे -

शारीरिक प्रेम किंवा आकर्षणामुळे तुमचं नातं अधिक दृढ होतं. त्यामुळे नात्यातील प्रेम वाढवण्याचा प्रयत्न करा. डिनर डेट, एखादा चित्रपट किंवा फिरायला जा. त्यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होऊ शकतं.

५. एकमेकांना वेळ द्या -

दररोज एकमेकांना वेळ देणं शक्य नसेल तर आठवड्यातून २ दिवस तरी पार्टनरला वेळ द्या. किमान ३० मिनीटे दिल्यामुळेही तुमचं नातं सुधारण्यास मदत होऊ शकते. तसंच दिवसातून एखादा मेसेज, फोन केला तरी नात्यातील ओलावा टिकून राहू शकतो.

६. प्रामाणिकपणा आणि संवाद -

पार्टनरविषयी तुमच्या ज्या भावना आहेत त्या थेट स्पष्टपणे त्याच्यासमोर मांडा. व्यक्त व्हा. नात्यात कधीही कोणती गोष्ट लपवू नका. तसंच संवाद साधत असताना जुने विषय कधीही काढू नका.

७. जुनी दुखणी काढू नका -

अनेक जणांना भांडण झालं की जुन्या मुद्द्यावर आरोप करण्याची सवय असते. मात्र, असं करु नका. जुन्या जखमांवरील खपल्या काढू नका. तसंच जुन्या गोष्टींचं भांडवलही करु नका. त्यामुळे नात्यातील ताण वाढू शकतो.

८. विसरुन जा आणि माफ करा -

नातं टिकवून ठेवायचं असेल तर माफ करणं आणि झालेल्या गोष्टी सोडून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे वाद झाल्यावर आपल्या पार्टनरला माफ करा आणि त्याला नीट समजावून सांगा. तसंच तुम्ही देखील काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका.

loading image
go to top