सुट्टीचे दिवस

अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्नानं इन्स्टाग्रामवर एक सुंदर रील शेअर केली आहे. त्यामध्ये ती म्हणते, की आपली मुलं स्मार्ट असावीत असं प्रत्येक पालकाला वाटतं;
actress twinkle khanna over summer holidays of children smart games
actress twinkle khanna over summer holidays of children smart gamesSAkal

- डॉ. समिरा गुजर-जोशी

अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्नानं इन्स्टाग्रामवर एक सुंदर रील शेअर केली आहे. त्यामध्ये ती म्हणते, की आपली मुलं स्मार्ट असावीत असं प्रत्येक पालकाला वाटतं; पण ज्यांचं वॉचही स्मार्ट आहे अशा या पिढीला खऱ्या अर्थाने स्मार्ट फक्त आणि फक्त पुस्तकंच बनवू शकतात. ( १०० टक्के सहमत!).... पण मुलांना वाचनाची गोडी लावायची कशी?

या यक्षप्रश्नावर तिनं एक छान, सोपा, सुटसुटीत उपायही सुचवला आहे. तिनं आपल्या मुलीबरोबर हे प्रोजेक्टच हाती घेतलं आहे, ज्यामध्ये तिनं आणि तिच्या मुलीनं जवळच्या बुक स्टोअरमध्ये जाऊन काही पुस्तकं खरेदी केली. आता माय– लेकी ही पुस्तकं एकत्र वाचणार आहेत. हे वाचन करत असताना तिनं तिच्या मुलीला पुस्तकाच्या समासात लिहिण्याची,

पुस्तकावर खुणा करण्याची मुभा दिली आहे. म्हणजे न कळलेले शब्द अधोरेखित करणं, त्यांचे अर्थ समासात लिहिणं, एखादं वाक्य आवडलं, तर हायलाइट करणं. एखादा व्याकरणातला प्रश्न असेल, की वाक्यातील क्रियाविशेषण शोधा, उपमा शोधा, तर त्याचं उत्तर अधोरेखित करणं अशा सगळ्या गोष्टी करण्याची मुभा आहे.

अर्थातच कोणी यावर आक्षेप घेईल, की पुस्तकावर असं लिहिणं योग्य नाही; पण मैत्रिणी, तुझाही अनुभव असेल, की पुस्तकावर पेन्सिलच्या खुणा केल्या, की ते पुस्तक आपल्याला आपलं वाटू लागतं. मला तरी पालक म्हणून हा सुचवलेला उपाय आवडला.

स्क्रीन टाइमच्या विश्वात पुस्तकं अजिबात न वाचण्यापेक्षा पुस्तक हातात पडणं अधिक महत्त्वाचं असं वाटलं. त्याचबरोबर मी अगदी योग्य वेळी हे रील पाहिलं असंही वाटलं, कारण उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे.

शाळेत असताना ‘उन्हाळ्याची सुट्टी’ हे शब्द मनात गारवा निर्माण करायचे. खरं तर उन्हाळ्याचा असह्य उकाडा सुसह्य होतो तो आंब्यामुळे आणि सुट्टीमुळे. अर्थात मुलांना सुट्टी म्हणजे पालकांना डबल काम हे आता पालक झाल्यानंतर लक्षात येतं आहे. आपल्या लहानपणी तर हा काळ स्थलांतराचा असायचा. काही मुलं तर सुट्टी लागायची त्या दिवशी जी आजोळी जायची ती शाळा सुरू होण्याच्या एक आठवडा आधी वगैरे परतायची.

बरं, हे स्थलांतर ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा मिलाफ घडवून आणायचं. शहरातली मुलं जशी मामाच्या गावी जायची तशी मुंबईच्या मामाकडेही भाचरे पाहुणी यायची. बहुतेकदा या स्थलांतरामध्ये पालकांचा सहभाग हा मुलांना मामाकडे किंवा काका-मावशी यांच्याकडे पोचवणं इतकाच असायचा.

मग मुलं आपल्याच नातेवाइकांकडे, पण एकटी राहायची. बरोबर वेगवेगळ्या वयाची इतर भावंडं. या सगळयांत लाड व्हायचे, पण कितीही काही म्हटलं तरी सवयीचं वातावरण नसणं, सोबतीला आई-बाबा नसणं, नव्या गोष्टींशी जुळवून घेणं यांत बरंच काही नकळत शिकायला मिळायचं.

मग एकत्र भटकणं, भांडणं, रूसवे-फुगवे, थट्टा–मस्करी या सगळ्यांतून आपोआप बॉंडिंग व्हायचं. आजच्या मुलांची बरीचशी सुट्टी घरी जाते. मग आई-वडील आपापली शेड्यूल सांभाळून एखादी ट्रिप प्लॅन करतात... पण एखाद्या आलिशान रिसॉर्टमध्ये घालवलेली सुट्टी त्यांना असा आयुष्यभर पुरणारा श्रीमंत अनुभव देते का? हा प्रश्न मनाला स्पर्शून जातोच.

मैत्रीणी, हा तुझाही अनुभव असेल, की आज भावंडं अनेकदा व्हिडियो कॉलवर बोलतात, फेस टाइम करतात हे खरं, पण त्यांना एकत्र राहण्याचा अनुभव मिळाला नसेल, तर अत्यंत औपचारिक गप्पा मारून पालकांचं समाधान करून ती मुलं तिथून सटकतात. मात्र, एखाद्या निवासी कॅम्पला गेलेली हीच मुलं तिथे मात्र छान नवीन मित्र – मैत्रीणी करुन येतात आणि ती मैत्री टिकवतात.

मला वाटतं, हेही पुस्तकांवर खुणा करण्यासारखंच आहे. त्या पेन्सिलच्या खुणांनी ते पुस्तक आपलं होऊन जातं, तसे अशा सुट्टीतल्या सहवासानं माणसं आणि गावं आपलीशी होऊन जातात. तूच आठवून बघ तुझी लहानपणीची सुट्टी आणि मलाही सांग, कोणत्या आठवणी आजही ताज्या आहेत तुझ्या मनात? करवंदाची, कैरीची चव आजही जि‍भेवर रेंगाळते आहे ना? अशाच एखाद्या सुट्टीत पोहायला, सायकल चालवायला शिकली होतीस ना?

आता तुला काय, मला काय खरंच सुट्टीच्या दिवशी तरी सुट्टी मिळते का, हा प्रश्नच आहे, पण आपल्या बालपणीतल्या सुट्टीच्या दिवसांनी आपल्याला किती आनंद दिला आहे! त्या आठवणींनीसद्धा मन झोपाळ्यावर झोके घ्यायला लागतं. मला असं नक्की वाटतं मित्रीणी, की या सुट्टीत भावंडांचं युनियन आणि नात्यांचं रियुनियन घडायला हवं. तुला काय वाटतं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com