esakal | फाटक्या जीन्सचा ट्रेंड आला तरी कुठून? जाणून घ्या रंजक इतिहास
sakal

बोलून बातमी शोधा

 ripped jeans

सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांच्या वॉर्डरोबमध्ये ही जीन्स पाहायला मिळते.

फाटक्या जीन्सचा ट्रेंड आला तरी कुठून? जाणून घ्या रंजक इतिहास

sakal_logo
By
शर्वरी जोशी

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी काही दिवसांपूर्वी महिलांच्या कपड्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच वाद पेटला आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे रिप्ड जीन्समधील फोटो शेअर करत तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकारानंतर सोशल मीडियावर रिप्ड जीन्स म्हणजे काय? किंवा या जीन्सचा शोध कसा लागला? ती कशी तयार करण्यात येते? असे बरेचसे विषय नेटकऱ्यांनी सर्च केले आहेत. रिप्ड जीन्सची सध्या तरुणाईमध्ये विशेष क्रेझ असून जीन्सच्या या प्रकाराला तरुण-तरुणींकडून चांगली पसंती मिळत आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांच्या वॉर्डरोबमध्ये ही जीन्स पाहायला मिळते. त्यामुळेच रिप्ड जीन्स म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेऊयात.

सध्याच्या काळात रिप्ड जीन्सची चलती असल्याचं पाहायला मिळतं. महाविद्यालयात जाणारे अनेक तरुण-तरुणी सर्रास या जीन्सचा वापर करताना दिसतात.  विशेष म्हणजे सर्व सामान्य जीन्सपेक्षा या जीन्सची किंमत अधिक असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच रिप्ड जीन्सची नेमकी सुरुवात कशी झाली ते पाहुयात.

कशी झाली रिप्ड जीन्सची सुरुवात?

१८७० मध्ये सगळ्यात पहिल्या जीन्सचा शोध लागला. लोब स्ट्रॉस यांनी पहिली जीन्स तयार केली होती. कंपनीमध्ये काम करणाऱ्या मजुरांसाठी खास करुन ही जीन्स तयार करण्यात आली होती.  विशेष म्हणजे हे मजूर पटकन ओळखता यावेत यासाठी तिला रंग गडद निळा करण्यात आला होता. या पहिल्या जीन्सनंतर जवळपास १०० वर्षानंतर रिप्ड जीन्स तयार करण्यात आली. १९७० पर्यंत ज्यांना जीन्स खरेदी करणं शक्य नव्हतं तेच केवळ अशा पद्धतीच्या फाटक्या जीन्स वापरत. त्याकाळी फाटकी जीन्स परिधान करणं हे गरीबीचं एक लक्षण मानलं जायचं.

७० च्या दशकात विरोध करण्यासाठी तयार झाली रिब्ड जीन्स

७० च्या दशकात नव्या स्टाइलच्या कपड्यांच्या वापरावर अनेक निर्बंध होते. यामध्येच रिप्ड जीन्सचा देखील अनेकांनी विरोध केला होता. हा विरोध मोडीत काढण्यासाठी रिप्ड जीन्स मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आल्या. अनेक पॉप स्टार, रॉक स्टार्सने या जीन्सला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं.
७० च्या काळानंतर पुन्हा ही जीन्स लुप्त झाली. मात्र, २०१० मध्ये  पुन्हा या जीन्सचा ट्रेण्ड आला. ८० च्या दशकात हाय-वेस्ट जीन्स, बेलबॉटम जीन्स वगैरे सारख्या अनेक जीन्सचा ट्रेण्ड आला. विशेष म्हणजे आता अनेक लोकप्रिय ब्रॅण्ड या जीन्सची निर्मिती करत आहेत.

कशी तयार केली जाते रिप्ड जीन्स 

रिप्ड जीन्स तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली लेझरच्या मदतीने आणि दुसरी हाताच्या माध्यमातून. यात खासकरुन डेनिममध्ये रिब्ड जीन्स तयार केल्या जातात. ही जीन्स तयार करण्यासाठी तिला एका खुंटीवर अडकवली जाते. त्यानंतर त्यावर लेझरची किरणे सोडली जातात. परंतु, अनेक ब्रॅण्डेड कंपन्यामध्ये हाताच्या माध्यमातून या खास जीन्स तयार केल्या जातात. यात सगळ्यात आधी  जीन्सवर एक ठराविक डिझाइन तयार केलं दातं. त्यानंतर हाताच्या माध्यमातून किंवा ट्विजरच्या माध्यमातून त्याला फिनिशिंग देण्यात येतं.

रिप्ड जीन्समध्ये आहेत हे प्रकार

रिप्ड जीन्समध्येदेखील काही प्रकार आहेत. यात स्क्रेप, श्रेड, होल असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.
 

loading image