‘आनंदा’चा डबा

आता हा ‘आनंदाचा डबा’ म्हणजे तरी काय? आणि हा डबा सकारात्मकता, आत्मविश्वास आणि यशस्वी मानसिकता तरी कशी निर्माण करेल?
Family
FamilySakal
Updated on

- अश्‍विनी आपटे- खुर्जेकर, व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागार

एका कार्यक्रमांमध्ये सकारात्मकतेबद्दल बोलताना प्रेक्षकांमधल्या एकांनी मला विचारलं, ‘तुम्हाला जर सकारात्मकता, आत्मविश्वास आणि यशस्वी मानसिकता निर्माण करण्यासाठी सगळ्यात उपयोगी एक साधन कुठलं असं विचारलं, तर तुम्ही कुठलं सांगाल?’ त्यावर मी त्यांना सांगितलं, ‘याचं उत्तर दडलंय... ‘आनंदाच्या डब्या’त.

आता हा ‘आनंदाचा डबा’ म्हणजे तरी काय? आणि हा डबा सकारात्मकता, आत्मविश्वास आणि यशस्वी मानसिकता तरी कशी निर्माण करेल?

तर हा आनंदाचा डबा म्हणजे प्रत्येक छोटे-मोठे आनंदी क्षण यश आणि चांगली बातमी पोटात ठेवणारा डबा. दरवर्षाच्या सुरुवातीला मी एक नवीन डबा तयार करते. वर्षभरातले प्रत्येक छोटे मोठे आनंदी साजरा करण्यायोग्य क्षण, मिळालेले प्रत्येक यश, चांगली बातमी, एका कागदावर तारीख आणि वारासकट लिहून या डब्यामध्ये टाकते आणि वर्षाअखेरीला हा डब्बा उघडून मागच्या वर्षातले सर्व चांगले क्षण, यश, बातम्या परत एकदा जगते.

मला खात्री आहे तुम्ही विचार करत असाल, या आनंदाचा डब्याचा उपयोग तरी काय?

तर मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात आनंदाचे मोठे क्षण अगदी मोजकेच असतात. उदाहरणार्थ, लग्नकार्य, मूलबाळ होणं, घर घेणं, गाडी विकत घेणं, नोकरी मिळणं, बढती होणं; पण असे आनंदाचे लहान क्षण अनेक असतात. ते आपण बरेचदा नंतर विसरून जातो.

एखादं झालेलं कौतुक, एखाद्या गोष्टीमुळे मिळालेला आनंद, छोटसं पण अभिमानास्पद यश, एखादं समाधान... अशा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी एका कागदावर लिहून तो कागद या आनंदाच्या डब्यात टाकत राहा आणि वर्षाअखेरीला या आनंदाची जमापुंजी बघा. वर्षभरात मोठे आनंद, मोठं यश मोजकं असू शकतं; पण असे छोटे छोटे आनंद देणारे, अभिमान वाटावे असे क्षण अनेकदा येऊन जातील, आणि आनंदाचा हा डबा तुम्हाला हे छोटे क्षण लक्षात ठेवायला मदत करेल.

ज्या वेळेला खूप नैराश्य किंवा नकारात्मकता असेल, अशा वेळी हा डबा खूप उपयोगी ठरेल. अनेकदा एखादी मोठी गोष्ट आपल्याला हवी तशी झाली नाही किंवा हवी ती मिळाली नाही, तर आपल्याला खूप वाईट वाटतं, नैराश्य येतं. अशा वेळी हा आनंदाचा डबा तुम्हाला या छोट्या; पण अतिशय महत्त्वाच्या क्षणांची आठवण करून देईल.

आता हा डबा कसा तयार करायचा? घरात असलेला कुठलाही डबा घ्या. पुठ्ठ्याचा असो, पत्र्याचा असो, स्टीलचा असो, काचेचा असो, की मातीचा असो. हा डबा तुमच्या स्वतःपुरता असो अथवा तुमच्या कुटुंबाचा सामूहिक असो. आजपासून प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला आनंद देईल, समाधान देईल, यश वाटेल, ती एका कागदावर लिहून या डब्यामध्ये जमा करा.

आणि मग या डब्याची जादू बघा. मैत्रिणींनो, वर्षभरानं जेव्हा तुम्ही हा डबा उघडाल, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर नकळत हास्य उमटेल, मन आनंदानं भरून जाईल आणि तुमच्या आतल्या सकारात्मकतेला नवी ऊर्जा मिळेल. हा डबा फक्त आठवणी साठवण्यासाठी नाही, तर स्वतःवरचा विश्वास वाढवण्यासाठी, आपल्या प्रगतीची जाणीव ठेवण्यासाठी आणि कठीण प्रसंगी आत्मबळ मिळवण्यासाठी आहे.

म्हणूनच, आजपासून या छोट्या छोट्या आनंदी क्षणांना पकडायला आणि जपायला सुरूवात करा. कारण जीवनात खरी जादू मोठ्या गोष्टींमध्ये नाही, तर या छोट्या पण मोलाच्या क्षणांमध्ये दडलेली असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com