‘नीव’बरोबरचा नवा जन्म

आई होण्यासाठी मी उपचार घेत होते. त्यामुळे मी आई होणार ही बातमी माझ्यासाठी अचानक समोर आलेली बातमी नव्हती.
archana nevarekar
archana nevarekarsakal

- अर्चना नेवरेकर

आई होण्यासाठी मी उपचार घेत होते. त्यामुळे मी आई होणार ही बातमी माझ्यासाठी अचानक समोर आलेली बातमी नव्हती. आईपणासाठी मी स्वत:चं मन तयार ठेवलं होतं. आई होण्याचा मला आनंद तर होताच; पण त्याचबरोबर माझ्या उपचारांबाबत थोडी चिंताही होती. खरं तर या चिंतेमुळे माझ्या भावना थोड्या झाकोळल्या गेल्या होत्या; पण आई होण्याच्या सुखद भावनांपुढे ही चिंता विरून गेली.

आई झाल्यावर शारीरिक, मानसिक बदल तर झालेच, शिवाय काम करतानाचा प्राधान्यक्रम बदलला. खरं तर हे सगळ्या महिलांसाठी नवीन असतं. त्या काळातील जगच नवीन वाटतं. आई होताना बाळाबरोबरच माझाही जन्म नवीन होता. कारण नीवमुळे मला आईपणाचा जन्म मिळाला.

माझं आयुष्य त्याच्याभोवती घुटमळत होतंच, शिवाय मी स्वत:देखील तितकाच वेळ देत होते. अनेक वेळा असं होतं, की मुलाचा विचार करताकरता आई स्वत:कडे दुर्लक्ष करत असते. मी तसं न होऊ देता मुलाबरोबरच स्वत:कडेही तितकंच लक्ष देत होतं.

आई झाल्यानंतरही माझं काम कधीच थांबलं नाही. ॲवॉर्ड्‌स, पिक्चर अशी कामं सुरूच होती. या सगळ्यामध्ये माझ्या छोट्या मुलाची कुठेही वणवण होऊ नये म्हणून माझी आई, बहीण सतत माझ्याबरोबर होत्या. त्यामुळे त्याला सांभाळणं मला फारसं कठीण गेलं नाही. अशा वेळेस एकत्र कुटुंबपद्धती खूप महत्त्वाची वाटते.

कामानिमित्त बाहेर असताना अशी अनेक उदाहरणं माझ्यासमोर आहेत, जिथं पालक मुलांना एकट्यानं सांभाळत होते; पण मला नीवला सांभाळताना कोणतीच अडचण आली नाही, कारण माझ्या घरातील सर्वजण त्याला सांभाळण्यासाठी सदैव तत्पर होते.

त्यामुळे मी कितीही कामात असले तरी माझ्या मनाला शांती होती, की तो सुरक्षित आहे. अनेक मातांना आपल्या बाळासाठी ‘बेबी सीटिंग’ची व्यवस्था करावी लागते. अशा वेळेस त्यांची परिस्थिती काय होत असेल? तसा अनुभव माझा नव्हता. त्यामुळे घरात ज्येष्ठ असणं खूप महत्त्वाचं असतं. हा अनुभव आई होताना प्रत्येक महिलेला येत असतो.

खूप वर्षांनी मला बाळ झाल्यानं त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यांचा मी आनंद घ्यायचा ठरवलं होतं. नीव फारसा रडवा नव्हता. तो समंजस आहे. अभ्यासातही तो हुषार आहे. मला जेव्हा कामानिमित्त बाहेर जायचं असतं, तेव्हा माझ्या घरातील कोणी ना कोणी त्याला पाहण्यासाठी असतं. त्याचं कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी वेगवेगळं ‘बाँडिंग’ आहे.

त्यामुळे आपली परंपरा, संस्कार त्याला कुटुंबातूनच मिळत असल्यानं मी निश्‍चिंत आहे. सोशल मीडियामुळे मी कायम त्याच्या जवळ असते. कधी आठवण आली, तर व्हिडिओ कॉल करून तो मला पाहू शकतो, बोलू शकतो.

राग मनात न ठेवण्याचा धडा

मुलांच्या डोक्यात कुणाविषयी कधीच राग नसतो. जरी राग आलाच तरी ते खूप कमी वेळात शांत होतात, त्यांचा राग निवळतो. ते सगळ्या गोष्टी विसरून जातात. नीवच्या बाबतीत तसंच होतं; पण आपलं तसं होत नाही. आपण काही गोष्टी मनातच ठेवत असतो. नीव उगाचच कोणाशीही स्पर्धा करत नाही. समोर कोणतीही व्यक्ती किंवा त्याच्या वयाची मुलं असोत, त्यांच्याशी त्याची गट्टी जमतेच. मुलं फार निष्पाप असतात आणि हा राग मनात न ठेवण्याचा धडा मला माझ्या नीवकडूनच मिळाला आहे.

करिअरिस्टीक मुलींसाठी टीप्स

  • मूल झाल्यावर फार मोठं ओझं घेऊन जगू नका.

  • मूल, करिअर, आपली तब्येत या गोष्टी आपण सहज निभावून नेऊ शकतो.

  • आपलं करिअर सोडण्याचा विचार कधीच करू नका.

  • विभक्त कुटुंबात आपले शेजारी, नातेवाईकांची मदत घेऊ शकता.

(शब्दांकन - तनिष्का डोंगरे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com