बुकीश : 'एक्‍स्ट्रॉऑर्डिनरी व्होयाजेस'

Book
Book

चंद्र-सूर्य-तारे तोडून आणून प्रियतमेच्या पदरात टाकण्याचं वचन देण्याचं कोणत्या प्रियकराला पहिल्यांदा सुचलं या प्रश्‍नाचं उत्तर देणं जितकं कठीण आहे, तितकंच चंद्रावर पाऊल ठेवण्याचं स्वप्नं पहिल्यांदा कोणी पाहिलं असेल, याही प्रश्‍नांचं उत्तर तितकंच कठीण आहे. पण ज्यूल्स व्हर्नच्या कल्पनाविश्‍वातल्या नायकांनी हे स्वप्न नुसतंच पाहिलं नव्हतं तर पूर्णही केलं होतं. आणि ही स्वप्नपूर्ती म्हणजे निव्वळ कल्पनेची भरारी नव्हती, तर त्या कल्पनेला पुढे बऱ्याच प्रमाणात विश्‍वासार्ह ठरलेल्या गणिती आकडेमोडीची जोडही होती. ‘फ्रॉम दी अर्थ टू दी मून’ ही विज्ञान काल्पनिका लिहिली गेली ती नील आर्मस्ट्रॉंग ‘ग्रेट लीप’च्या एक शतक आधी.

सहा-सात महिन्यांपूर्वी मानवाच्या चांद्रविजयाच्या पन्नाशीच्या निमित्ताने ‘फ्रॉम दी अर्थ...’ पुन्हा शोधली आणि मग पाठोपाठ आल्या ‘अराऊन्ड द वर्ल्ड इन एटी डेज’, ‘ट्वेन्टी थाऊजंड लीग्ज अंडर द सी’ आणि ‘जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ’. ज्यूल्स गॅब्रियल व्हर्न यांची नोंद जागतिक साहित्य घेते ते फ्रेंच कादंबरीकार, नाटककार आणि कवी म्हणून. पण काल्पनिक विज्ञानकथा लेखनाची वाट निर्माण करण्याचं श्रेय ज्यूल्स व्हर्नना दिलं जातं. त्यांच्यानंतर विज्ञानकथांची वाट रुंद केली ती एच. जी. वेल्स यांनी.
‘फ्रॉम दी अर्थ टू दी मून’ लिहिली गेली १८६५मध्ये. अमेरिका तेव्हा सिव्हिल वॉरमधून बाहेर पडत होती, नानाविध शोध लावत विज्ञान पंचमहाभूतांना कवेत घेऊ पाहत होतं आणि, थॉमस अल्वा एडिसनचा सर्वदूर पोचलेला बल्ब तयार व्हायला अजून पंधरा वर्षांचा अवकाश होता. या काळात व्हर्नच्या काल्पनिकेतल्या ‘बाल्टीमोर गनक्लब’चे सदस्य थेट चंद्रावर जाण्याची योजना आखतात.अडचणींवर मात करून ती योजना अंमलातही आणतात.विविध विषयांना स्पर्श करणारी व्हर्न यांची चौपन्न पुस्तके ‘एक्स्ट्रॉऑर्डिनरी व्होयाजेस’ या नावाने ओळखली जातात. काल्पनिका लिहीत असतानाही विज्ञानविषयक तपशिलांची अत्यंत बारकाईने अभ्यास करून केलेली मांडणी हे व्हर्न यांच्या कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य. दृश्‍यतंत्रांच्या साह्याने बनवलेल्या चित्रफिती आज दर्शकांना एखाद्या सफरीचा, साहसयात्रेचा किंवा वैज्ञानिक नवलाईचा थेट भिडणारा अनुभव देऊ शकतात. तरीही चांद्रसफरीविषयी लिहिताना हातातल्या अगदी तुटपुंज्या साधनांनिशी व्हर्न यांनी केलेला पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचे अंतर मोजण्याचा प्रयत्न किंवा ‘ट्वेन्टी थाऊजंड लीग्ज अंडर द सी’ मधली ‘नॉटीलस’ नावाची अणू ऊर्जेवर चालणारी पाणबुडी वाचकांना आजही थक्क करून सोडते. व्हर्न यांच्या साऱ्या नवलकथांची जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. युनेस्कोची एक यादी आहे, ज्या लेखकांच्या कलाकृतींची सर्वाधिक भाषांतरे झाली आहेत अशा टॉप ५० लेखकांची. त्या यादीतली पहिली तीन नावे आहेत - अगास्था ख्रिस्ती, ज्यूल्स व्हर्न आणि विल्यम शेक्सपिअर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com