पहिलं प्राधान्य मुलालाच

नाट्य परिषदेच्या एका नृत्य कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्याचा रिअर्सलही जोरदारपणे सुरू होती. त्यावेळी मी आई होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे लक्षात आले.
mother childrens
mother childrenssakal

नाट्य परिषदेच्या एका नृत्य कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्याचा रिअर्सलही जोरदारपणे सुरू होती. त्यावेळी मी आई होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे लक्षात आले. त्यावेळी मी माझा आनंद नाचूनच साजरा केला. त्यानंतर मी ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेत काम करत होते.

सहा महिन्याच्या प्रेग्नंसीपर्यंत मी त्या मालिकेत काम केले. त्यानंतर मला ती मालिका सोडावी लागली. कारण, सेटवर जाण्यासाठी जे जिने होते, त्यांना कठडे नव्हते. त्यावेळी अशी रिस्क घेणे योग्यही नव्हते. मात्र, दरम्यानच्या काळात मालिकेतील सहकलाकारांनी मला खूप सहकार्य केले.

प्रेग्नन्सीचा कालावधी मी खूप आनंदात घालवला. मी खूप गोड खात होते. सतत उलट्या होत होत्या. मात्र, मी आणि माझे बाळ सृदृढ व अतिशय हेल्दी होते. आठवा महिना संपत आला तेव्हाही मी ‘लग्नाची बेडी’ व ‘माझी बायको, माझी मेव्हणी’ या नाटकांचा प्रयोग केला.

त्यावेळी माझ्या उंचीमुळे माझं पोट दिसत नव्हतं; तसंच मी कपडे असे घालत असे, की त्यात पोट फारसं दिसत नव्हतं. इतकंच काय, सातव्या महिन्यात आम्ही मोटारीनं शेगावला गेलो होतो; तसंच बंगलोर फिल्म फेस्टिव्हललाही विमानानं गेलो होतो. या काळात सर्वच कलाकार आणि माझा नवरा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.

माझा मुलगा मानव याचा जन्म झाल्यानंतर मात्र आता आपण घरी बसणार आहोत, ही गोष्ट मानसिकरीत्या स्वीकारणं थोडंसं अवघड होतं; पण कुटुंबीय सोबतीला होते. आई- बाबा व नवरा काळजी घेत होते. मात्र, माझ्या भावाची इंजिनिअरिंगची परीक्षा असल्यानं आईला माझ्याजवळ फार राहता आलं नाही.

मानव सव्वा महिन्याचा झाल्यावर आई घरी गेली. नवऱ्याचीही कामं सुरू होती. तेव्हापासून मानव आणि माझं नातं घट्ट झालं आहे. कारण, तेव्हा पायावर घेऊन अंघोळ घालणं, त्याच्या झोपेच्या वेळेनुसार माझी झोप ॲडजस्ट करणं, या सर्व गोष्टी मी आनंदानं आणि आवडीनं करत आले. त्याचे बाबा संध्याकाळी आल्यानंतर मात्र मला चार- पाच तास आराम मिळत असे. मात्र, मानवची रात्रीची झोप खूप कमी असायची.

त्यामुळे सर्वजण चेष्टेनं म्हणत असत, ‘तू नाटक आणि चित्रपटाचं चित्रीकरण रात्रीच्या वेळी केलं, ते सगळं त्याच्यामध्ये उतरलं आहे.’ ते काही अंशी खरंही होतं. कारण तो रात्री अकरा वाजता जागा झाला, की सकाळी सातपर्यंत खेळत बसायचा. तसंच माझंही दैनंदिन वेळापत्रक झालं. या काळात माझ्या नवऱ्यानं खूप साथ दिली. आम्ही दोघांनीही बाळाचं लहानपण खूप एन्जॉय केलं.

आईपण आणि करिअर या दोन्हींपैकी एका गोष्टीची निवड करणं आव्हानात्मक असतं. मात्र, ज्यावेळी बाळाचा जन्म झाला अन् ती एक सुंदर जबाबदारी हाती आली, त्यावेळी सर्व गोष्टी दुय्यम ठरू लागल्या. मानवचा जन्म झाला, तेव्हाच मी ठरवलं की, माझं पहिलं प्राधान्य फक्त अन् फक्त मानवच असणार आहे. मी पूर्णपणे विचार केला आणि मानवलाच प्राधान्य दिलं. त्यामुळे दोन वर्षं मी शो आणि नाटकं खूप कमी केली. जास्त वेळ त्याच्या संगोपनासाठीच दिला. त्यामुळे मुंबईत चित्रीकरणासाठी गेले नाही. सवय व्हावी म्हणून त्याला काही दिवस पाळणाघरात ठेवत होते.

आई झाल्यानंतर मातृत्व एन्जॉय करण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतो. माझ्याकडूनही तसंच झालं. मानव झाल्यानंतर दोन वर्षांनी माझा मित्र विशाल इनामदार एका चित्रपटाची जुळवाजुळव करत होता. त्यावेळी मी त्याला पुन्हा काम सुरू करणार असल्याचं सांगितलं. प्रेग्नन्सीनंतर मी वजन कमी केलं असल्याचंही त्याला सांगितलं. तो पुण्यात आल्यानंतर त्याची भेट घेतली अन् ‘संशयकल्लोळ’ चित्रपटात मला संधी मिळाली.

त्यानंतर मी मागं वळून पाहिलं नाही. ‘संशयकल्लोळ’नंतर ‘व्हॉटसअप लग्न’, ‘मला एक चानस हवा’, ‘फुलराणी’ या चित्रपटांत काम केलं. त्याचबरोबर ‘सख्या रे’ व ‘साथ दे तू मला’ या मालिकांमध्ये काम केलं. ‘सख्या रे’ मालिकेच्यावेळी मानव पहिलीत होता. तो पुण्यात आणि मी मुंबईत. असं असताना त्यानं कधीही चिडचिड केली नाही.

एक गोड प्रसंग आठवतोय, एका नवीन रुजू झालेल्या शिक्षिकेनं त्याला पोर्टलवर पाठविलेल्या नोटिशीबद्दल विचारलं, तसंच तुझ्या आईनं याबद्दल सांगितलं नाही का, असा प्रश्न केला. त्यावेळी मानव म्हणाला, ‘माझी मम्मा बिझी आहे. ती शूटिंग करतीये. ती ‘सख्या रे’ मालिकेत काम करतीये. तुम्ही नक्की बघा.’ त्याचं हे उत्तर ऐकून संबंधित शिक्षिका अवाक् झाली अन् तिनं माझा नंबर घेऊन मला या सर्व गोष्टी सांगितल्या; तसंच आमच्या दोघांचंही कौतुक केलं. ही गोष्ट माझ्यासाठी कुठल्याही ॲवॉर्डपेक्षा खूप मोठी होती.

करिअरिस्ट मुलींना टिप्स...

  • तुम्ही कामानिमित्त कुठंही असा; पण मुलांशी संवाद ठेवा. त्यासाठी सतत सहवासात असण्याची गरज नाही.

  • आपण करत असलेल्या कामाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. आपल्या करिअरचा आपल्याला आणि कुटुंबाला कसा फायदा होतो, या गोष्टी मुलांना सांगितल्याच पाहिजेत. म्हणजे ती आपला आणि आपल्या करिअरचा आदर करतात.

  • आई- वडील वेगळ्या धाटणीचं करिअर निवडतात, तेव्हा मुलांनाही असं वेगळं करिअर करावंसं वाटतं. असचं माझ्याही मुलानं केलं. तो स्टेट लेव्हलचा ॲथलिट आहे. स्केटिंग खेळात त्यानं राज्यस्तरावर दोन मेडल मिळवली आहेत. मुलं अशी कामगिरी करतात, त्यावेळी आई म्हणून समाधान वाटतं. ‘सकाळ’च्या ‘स्कूलिंपिक’ स्पर्धेमध्येही मानवला चार सिल्व्हर मेडल्स मिळाली, ही आनंदाची गोष्ट आहे.

(शब्दांकन - अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com