
Indian Woman’s Bond with Stray Cats and Dogs: मुक्या जिवांवर तुम्ही थोडी जरी माया केली तर ते तुमच्यावर जीव ओवाळून टाकतील, याचीच प्रचिती बरखा पटनायक यांना रोज येते. त्यांच्या घरी असलेल्या दहाही मनिमाऊंवर त्यांचा एवढा जीव आहे की, घरी येताच बरखा यांना या मुक्या दोस्तांचा गराडा पडतो. आपल्या भाषेत का होईना एकमेकींच्या तक्रारींचा पाढाच त्या बरखांपुढे वाचतात. त्या केवळ तक्रारीच करीत नाही तर बरखा यांनी शिकविल्याप्रमाणे येणाऱ्यांचे हसून स्वागतही करतात.
आयटी पार्कमध्ये नोकरी करणाऱ्या बरखा यांना बालपणापासून मुक्या जिवांची आवड आहे. ‘माणसांपेक्षा मुक्या जीवांवर प्रेम करा, त्यांना लळा लावा. संकटाच्या वेळी नक्कीच ते तुमची मदत करतील’, ही शिकवण बरखा यांची आजी कृष्णावेणी आणि वडील गुरुनाथ पटनायक यांनी त्यांना बालपणापासून दिली.
लहान असताना परिसरातील मोकाट श्वान आणि दररोज घरी येणाऱ्या मनिमाऊंचा बरखा यांच्या घरी ठिय्या असे. त्यामुळे मुक्या जिवांप्रती त्यांना आकर्षण निर्माण झाले. पुढे त्यांच्याशी जीव लावल्यानंतर हे लक्षात आले की, भाषा, राहणीमान, मनुष्य-प्राणी या भेदाच्या पुढे ही मैत्री आहे. आपली भाषा त्यांना कळत नसली तरी स्पर्श, चेहऱ्यावरील हावभाव अचूक टिपण्याचे कसब त्यांच्याकडे जन्मजात असते. त्यामुळे आमची मैत्री फुलत गेली. याच मैत्रीतून चिट्टू, मिनी, चेरी, पेप्सी, मिनी, मम्मा अशी त्यांची नावेही ठेवल्याचे बरखा सांगतात.
घरी असलेल्या दहा मनिमाऊंपैकी दोन त्यांनी रस्स्तावरून उचलून आणल्या आहेत. तर दोन-तीन स्वतः त्यांच्या घरी आश्रयाला आल्या. पुढे त्यांचा वंश वाढला. या मांजरींच्या सोबतीला तीन श्वानही आहेत. अगदी घरच्या सदस्यांप्रमाणे त्यांचा वावर असतो. नावाने आवाज देताच त्यांची हजेरी लागते. कामावरून कितीही थकून आले की, घरी आल्या आल्या मुक्या जिवांचा गराडा भोवती पडत असल्याने आलेला तणाव, क्षीण चुटकीसरशी निघून जातो, असे बरखा सांगतात.
उदरभरण हाच एकमेव मुक्या जिवांचा उद्देश असतो. प्रेम मिळाले की त्याकडे ते आकृष्ट होतात. एखाद्या जिवाला दोन-तीन-चार दिवस अन्न मिळाले नाही तरच तो आक्रमक होतो, हा माझा अनुभव आहे. श्वानाने दंश करणे, कुणावरही भुंकणे वाईटच. त्यामुळे त्यांच्याप्रती समाजात नकारात्मक भाव निर्माण होतात. परंतु मनुष्य हा बुद्धिवान प्राणी आहे. आपण प्रेमाने त्यांना जवळ घेतले, त्यांना खाऊ घातले तर ते कधीच तुमच्याशी बेईमानी करणार नाही. त्यामुळे मुक्या जिवांप्रती संवेदना पाळा, असे आवाहन बरखा पटनायक करतात.
प्राणीच जगण्याचा उद्देश शिकवितात. दुसऱ्यांच्या वेदना जाणून घेण्याच्या भावना प्राण्यांच्या सहवासात राहिल्याने विकसित होतात. घरासमोर मुके जीव भटकत असतात. त्यांना घरी आणू नका; परंतु एखादी पोळी किंवा इतर काहीतरी खाण्याचे द्या. त्यांना मारू नका. मारल्याने ते अधिक आक्रमक होतात. पुढे हा विखार अधिकाधिक वाढत जातो.
- बरखा पटनायक, प्राणीप्रेमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.