कुटुंबाची ‘सीईओ’

एखाद्या कंपनीचा सीईओ म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असणं म्हणजे काय? तर, त्या कंपनीतील ती एक सर्वोच्च अधिकाराची जागा असते. प्रत्येक सीईओ हा त्या कंपनीचा मालक असेल असं नाही
कुटुंबाची ‘सीईओ’
कुटुंबाची ‘सीईओ’sakal

तू फुलराणी

-डॉ. समीरा गुजर-जोशी

एखाद्या कंपनीचा सीईओ म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असणं म्हणजे काय? तर, त्या कंपनीतील ती एक सर्वोच्च अधिकाराची जागा असते. प्रत्येक सीईओ हा त्या कंपनीचा मालक असेल असं नाही; पण कोणत्याही परिस्थितीत त्या कंपनीसाठीचे महत्त्वाचे निर्णय घेणं, त्या व्यवसायाला दिशा देणं, कंपनीतील काम उत्तम प्रकारे सुरू आहे याकडे लक्ष देणं, व्यवसायामध्ये उत्तम वातावरण निर्माण करणं आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला ही कंपनी ‘आपली’ आहे असं वाटेल आणि आपण येथील एक महत्त्वपूर्ण सदस्य होत असे वाटेल यासाठी जातीनं लक्ष घालणं हे सगळेच सीईओच्या कामांमध्ये येतं.

त्याचबरोबर कंपनीची उद्दिष्ट ठरवणं, त्यासाठी योजना आखणं, त्या योजनांची अंमलबजावणी करणे, या सगळ्या योजना, काम यासाठी एक बजेट किंवा अर्थसंकल्प तयार करणं हेही त्याच्याकडून अपेक्षित असतं, तसंच कंपनीतील विविध सदस्य आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्स यांमधील दुवा होणं हेही त्यालाच करावं लागतं. आता एक गंमत करूया. ‘सीईओच्या’ जागी ‘गृहिणी’ हा शब्द घालूया आणि ‘कंपनीच्या’ जागी ‘कुटुंब’. आता तुमच्या लक्षात येईल, की एका घरातली गृहिणी ही त्या घराची तशी मालकीण असो वा नसो, ती त्या कुटुंबाची किंवा त्या घराची सीईओ नक्की असते. घरातले महत्त्वाचे निर्णय घेणं, घराचं आर्थिक गणित सांभाळणं, सगळ्या सदस्यांची मर्जी राखणं, गरजा पुरवणं, जेवणाच्या डब्यापासून परीक्षा, सणवार, पै-पाहुणे सगळ्यांचं व्यवस्थापन, विविध सदस्यांमधील दुवा होणं, बघा सगळी सीईओचीच तर कामं आहेत, पटतंय ना!

म्हणून असं वाटलं, की या अधिकाऱ्यामध्ये असे कोणते गुण असतात ज्यामुळे ते आपल्या कंपनीचा फायदा करून देतात? जर तेच गुण एखाद्या गृहिणीनं अंगी बाणवले, तर ती आपल्या कुटुंबाचा फायदा करून देऊ शकेल. मग या दृष्टीनं मी थोडं वाचायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात एक मजेशीर गोष्ट आली. खरंतर उत्तम सीईओमध्ये एका उत्तम गृहिणीचे गुण अपेक्षित असतात. म्हणजे बघा, त्याच्याकडे आशावाद असणं महत्त्वाचं मानलं जातं- कारण त्याच्या जोरावरच तो त्याच्या टीमला प्रेरित करू शकतो.

गृहिणीसुद्धा नेहमीच आशावादी असते. एक वेळ आपल्या वैयक्तिक गोष्टींसाठी ती निराश होईल; पण कुटुंबाच्या बाबतीत मात्र ती नेहमीच आशावादी असते आणि कुटुंबातल्या इतर कुणालाही निराश होऊ देत नाही. त्यांना सतत प्रेरित करत राहते. तसाच आणखी एक गुण म्हणजे ‘ॲक्सेप्टन्स’ अर्थात स्वीकार. याही बाबतीत गृहिणी उजवी म्हटली पाहिजे. कुटुंबातल्या प्रत्येकाच्या स्वभावाच्या खाचाखोचा तिला नीट माहिती असतात आणि सगळ्यांच्या कलानं घेत ती पुढे जात असते, कारण ही सगळी आपली माणसं म्हणून तिनं स्वीकारलेली असतात. आपल्या टीमच्या बाबत अधिकाऱ्याची भावनाही अशीच असेल तरच एक ताकदवान संघ तयार होईल. असे आणखीही काही गुण सांगता येतील, उदाहरणार्थ, विश्वास, निष्ठा, समजूतदारपणा, सहृदयता, जिद्द, चिकाटी, उपलब्धता (accessibility ) इत्यादी.

हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण एखादं काम आपण उत्तम करतो हे आपल्याला माहिती असतं आणि आपल्या कुटुंबाला उत्तम तेच द्यायचं असतं. या आपल्या अतिशय चांगल्या हेतूपायी सगळं मीच करणार असा हट्ट आपण धरून बसतो; पण एखादं काम दुसऱ्यावर सोपवणं म्हणजे त्या व्यक्तीवर विश्वास दाखवणं. आपल्या कुटुंबीयांवर अधूनमधून असा विश्वास दाखवायला हवा. अनेकदा आपण हे करण्यात मी कमी पडते आहे, असं सांगायला लाजतो. मला मदत हवी आहे याविषयी संवादच साधत नाही. कधीतरी असं करून बघा! मैत्रिणी, तुझ्या घरातले सदस्य तुला सरप्राईज करू शकतात.

तुझ्या समस्येचं अगदी सोपं उत्तर कदाचित त्यांच्याकडे असू शकतं. मैत्रिणी, कुटुंबाची सीईओ तू असलीस, तरी घरातले लहान आणि ज्येष्ठ सदस्यसुद्धा तुझे ‘टीम मेंबर्स’ आहेत. त्यांच्यावर थोडी थोडी जबाबदारी डेलिगेट कर आणि मग ही ‘टीम-कुटुंब’ किती छान परफॉर्म करतं ते बघ! दुसऱ्यावर जबाबदारी सोपवणं हीसुद्धा एक कला आहे आणि ती वाटती तितकी सोपी नाही. कोणाला काय काम सांगायचं यासाठी तुमच्याकडे माणसांची पारख असावी लागते. कामाचं स्वरूप त्यांना नीट समजावून सांगायला हवं. यात आणखी कळीचा मुद्दा असा, की मॅनेजमेंट करायचं आहे; पण मायक्रोमॅनेजमेंटचा मोह टाळायचा आहे एखादं काम दुसऱ्याला सांगितलं, की ते त्याला त्याच्या पद्धतीनं करू द्यायला हवं आणि अनेकदा आपल्याला अवघड वाटणारी गोष्ट आहे; पण अशक्य नव्हे. सवयीनं हे साध्य करता येतं. फॅमिलीची सीईओ व्हायला असेच आणखी काही खास गुण हवेत. त्याविषयी पुढे बोलूच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com