Children Mental Health : लहान मुलांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी मोकळा संवाद महत्वाचा ; कशी कराल सुरूवात?

Children Mental Health : लहान मुलांच्या मानसिक-शारीरिक जडणघडणीकडे लक्ष द्यावे. त्यांना विविध माध्यमांतून व्यक्त होऊ द्या. प्रत्येक बाबतीत आपण त्यांच्या पाठीशी आहोत, असा आत्मविश्‍वास देणे महत्त्वाचे आहे.
Children Mental Health
Children Mental Healthesakal

डॉ. राणी खेडीकर

Children Mental Health : लहान मुलांच्या मानसिक-शारीरिक जडणघडणीकडे लक्ष द्यावे. त्यांना विविध माध्यमांतून व्यक्त होऊ द्या.प्रत्येक बाबतीत आपण त्यांच्या पाठीशी आहोत, असा आत्मविश्‍वास देणे महत्त्वाचे आहे. बालकांच्या आत्महत्या टाळण्यासाठी त्यांचे भावविश्‍व हळुवारपणे हाताळावे.

माझी लेक कालपासून खूप शांत होती. तिला जवळ घेऊन विचारलं, काही समस्या आहे का बेटा? तर ती माझ्या कुशीत शिरून रडायला लागली. मी तिला रडू दिलं. ती म्हणाली, ‘‘मम्मा, अनुष्काने सुसाईड केलं.’’ मला कळेचना काय बोलावं. तिला हृदयाशी घट्ट धरून तशीच थांबले काही वेळ. अनुष्का म्हणजे माझ्या लेकीच्या वर्गात शिकणारी मुलगी. सदैव हसतमुख नि चुणचुणीत. काय झालं असं की, तिला जीव द्यावासा वाटला? तिचे आई-वडील दोघेही डॉक्टर. ती अभ्यासात हुशार होती; पण कधी कधी ताणात असे. प्रामाणिक आणि अभ्यासू होती. मात्र कधीच कोणत्या स्पर्धा, खेळ यात भाग घेत नसे.

शाळा सुटली की घरी जाण्याची घाई असायची. क्लासमध्ये पण ती एखादं उत्तर चुकलं की खूप ताण घ्यायची, असं लेक सांगे. अनुष्कानं कोणतीही आवड जपली नव्हती. तिची घुसमट होत असावी. हा ताण मोकळा करण्यासाठी स्वस्थ असा मार्ग तिच्याकडे नव्हता कदाचित. तिच्या पालकांनी कधीही तिला अभ्यासाचं ओझं वाटावं, अशी वागणूक दिली नसल्याचं कळलं. मग ती स्वतःच ते ओझं वाहत असावी. कधी कधी सकारात्मक परिश्रम आवश्यक असतात. कारण त्यामुळे ध्येय गाठता येते. पण त्या दबावाखाली राहून मानसिक स्वास्थ्य गमावून अजाण भीतीच्या सावलीत जगणे धोक्याचे आहे.

एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार येणं किंवा आत्महत्येच्या वेगवेगळ्या प्रकारची कल्पना करणं याला मानसोपचारतज्ज्ञ ‘सुसाइड आयडिएशन’ म्हणतात. मनोविकारतज्ज्ञ डॉ. अंबरीश धर्माधिकारी सांगतात, ‘‘आत्महत्येचा विचार नैसर्गिक नसतो. मेंदूतील बायो-न्यूरॉलॉजिकल बदलांमुळे लोकांना जीवन व्यर्थ वाटू लागतं. आत्महत्येचे विचार येतात.

आत्महत्येच्या नव्वद टक्के घटनांत मानसिक आजार प्रमुख कारण आहे. डिप्रेशन किंवा नैराश्येतले लोक जगाकडे नेहमीच नकारात्मकतेने बघतात. त्यांना सतत कोणती तरी भीती वाटते. ते अस्वस्थ असतात. कोणत्याही कामात शंभर टक्के योगदान देऊ शकत नाहीत. त्यांच्या बोलण्यातून अशी भीती किंवा आत्महत्येचे विचार व्यक्त होतात, तेव्हा ती धोक्याची घंटा मानावी.’’

आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक

भारतात २०१७ ते २०१९ या कालावधीत १४ ते १८ वयोगटातील २४हजार ५६८ मुलांनी आत्महत्या केल्याचे ‘गुन्हे अहवाल ब्युरो’च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. यापैकी तेरा हजार ३२५ मुली आहेत. याचाच अर्थ, आत्महत्येमध्ये मुलींचे प्रमाण ५४, तर मुलग्यांचे ४६ टक्के आहे. दररोज साधारण २२ मुले आत्महत्या करतात. हा आकडा चिंताजनक आहे. महाराष्ट्रात दररोज दोन मुले आत्महत्या करतात. बालकांनी आत्महत्येस प्रवृत्त होणं ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

आधुनिक युगात तंत्रज्ञान जितकं सुलभ होत आहे, तितकंच घातकही आहे. सायबर गुन्हे व त्यातून बालकांचा होणारा छळ यामुळे त्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. बालमन भीतीने जास्त विचलित होते. अशावेळी योग्य मानसिक आधार आणि सुरक्षेची शाश्वती बालकास मिळाली नाही तर ते या समस्येतून बाहेर पडण्यास मार्ग राहात नाही. अशावेळी ते व्याकूळ होऊन आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकते.

बालकामध्ये लहानपणी एखादी नकारात्मक, वाईट, भीतीदायक, मानसिक-भावनिक स्थितीवर घाव करणारी घटना मोठे झाल्यावरदेखील तशीच राहते. बालपणी झालेला हा आघात कौमार्य अवस्थेपर्यंत मनात लपवून बालक वर-वर आनंदी असल्याचं दाखवतं; पण परत तशी एखादी घटना घडली तर त्याची तीव्रता ही तेवढी नसली तरीही बालपणीच्या वाईट अनुभवही आत्महत्येचे कारण बनते.

बालकांना सुरक्षित वाटणे खूप महत्त्वाचे असते. आपल्याकडून एखादी चूक झाली, अपयश आलं, कोणी भीती दाखवली, धमकावले, चुकीचे कृत्य करण्यास भाग पाडले अशा परिस्थितीत बालकावर विश्वास ठेवणे आणि कायम आम्ही तुझ्यासोबत आहोत. जी समस्या येईल, संकट येईल त्याचा सामना आपण मिळून करू, ही शाश्वती बालकास पालक, शिक्षक यांच्याकडून मिळणे आवश्यक आहे. बालक मोकळेपणाने व्यक्त होऊ शकेल असं वातावरण कुटुंबात, शाळेत असणे ही सगळ्यांची जबाबदारी आहे.

त्यांना व्यक्त होऊ द्या

काही कुटुंबांत बालकांना अतिसंरक्षण दिलं जातं; ज्यामुळे बालकांचे स्वतःचे विचार, तत्त्व आणि विशिष्ट परिस्थितीत मार्ग काढण्याची स्वतःची पद्धत विकसित होत नाही. काही कुटुंबात बालकाची सुरक्षा याचा विचारच नसतो. दोन्ही स्थिती बालकांसाठी घातक आहे. त्यांना व्यक्त होण्यास संधी देणं हे देखील कौशल्य आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपचारपद्धती वापरतात. रंगोपचार एक प्रभावी माध्यम होऊ शकतं.

बालक हे चित्र आणि रंग यातून व्यक्त होते. त्यांना चित्र काढण्याची, रंग भरण्याची सवय लावावी. नकारात्मकता दूर व्हावी, आत्मविश्‍वास वाढावा म्हणून वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे. व्यक्त होण्यासाठी चित्रकला खूप सुंदर माध्यम आहे. मनातील भावना चित्र, रंगाद्वारे वाचल्या जाऊ शकतात. काही मुलं जास्त बोलत नाहीत. अशांना रोज डायरी लिहिण्याची आणि आज लिहिलेलं उद्या वाचायची सवय लावावी. आजची उदासीनता काही उपायांनंतर उद्या कमी होते. आज वाटणारी नकारात्मकता कोणाशी तरी बोलल्यावर उद्या सकारात्मकतेत रुपांतरीत होते. या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून देताना अतिशय विश्वासाने त्याचं हे डायरी विश्व हाताळावं.

मैत्री, प्रेम, आकर्षण याबाबत मोकळेपणाने चर्चा करून हार्मोन्समध्ये होत असलेला बदल समजावणं. तसेच सेरोटोनीन, डोपामाईन याचे आपल्या शरीरात होणारे स्त्रवन आपल्याला आनंद देतात, म्हणून त्याची संपूर्ण माहिती, कारणे आणि परिणाम याची चर्चा करावी. आनंदी राहण्यासाठी बाहेरील चुकीच्या आमिषाला बळी न पडता स्वतःच्या गुणांचा शोध घेणं, त्यातून मिळणारा आनंद घेणं याची सवय लावावी. यामुळे ते स्वतःचे शारीरिक, मानसिक, भावनिक स्वास्थ्य याची काळजी घेतील. असे अनेक प्रभावी उपाय निश्चितच आपण करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे, बालकाशी आपला संवाद आणि सुसंवाद असणं गरजेचं आहे. त्यांचं ऐकून घेणं, समजून घेणं आणि तुम्ही कायम त्याच्यासोबत आहात, ही जाणीव त्याच्या मनात निर्माण करावी.

(लेखिका पुण्याच्या ‘बाल कल्याण समिती’च्या अध्यक्ष आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com