‘ऋतूप्रमाणे करा पोशाखांची निवड’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोशाख

‘ऋतूप्रमाणे करा पोशाखांची निवड’

कॅज्‍युअल पोशाख हा माझा आवडता वॉर्डरोब आहे. माझ्या मते, तुम्‍ही प्रवास करणार असाल, डिनरसाठी बाहेर जाणार असाल, शॉपिंग करायला किंवा मित्रांसोबत चित्रपट पाहायला जात असाल, अशा प्रत्‍येक प्रसंगासाठी हे सर्वांत उत्तम पोशाख. जीन्‍स व टी-शर्ट किंवा इतर कोणताही फ्लोरल प्रिंट ड्रेस माझे ‘गो-टू’ पोशाख आहेत. मला इंडो वेस्टर्न पोशाख खूप आवडतात. कारण, मला असे वाटते, की ते माझ्या शरीराला कॉम्प्लिमेंट करतात. फॅशन करताना, पोशाख परिधान करताना, साडी नेसताना काळजी घेतलीच पाहिजे.

सध्या मी ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवा गाडी नवा राज्य’ मध्‍ये रमाची भूमिका साकारत आहे. त्यात अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. माझ्या मते, तुम्‍ही तुमच्‍या व्‍यक्तिमत्त्वाला साजेसे पोशाख परिधान करण्‍यासंदर्भात काळजी घेतली पाहिजे. साड्या एकाच पद्धतीने नेसू नयेत, थोडा वेगळा प्रयोग करून नेसल्या तरीही छान वाटतात. साड्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सेसरीज मिळतात. उदाहरणार्थ बेल्ट. त्याचाही प्रयोग आपण करू शकतो. साडी जास्त फुगत असेल, तर वेगळ्या पद्धतीने निऱ्या व पदर कराव्यात. साडीच्या मटेरियलप्रमाणे आपण वेगवेगळे प्रयोग करू शकतो. त्यामुळे ती साडी शरीरावर अजून उठून दिसते. ड्रेस किंवा साडीचे कापड ऋतूप्रमाणे निवडावेत; कारण कपडे चुकीचे परिधान केले, तर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. मला आवर्जून सांगावेसे वाटेल, की हातमागावर (हँडलूमवर) बनवलेल्या साड्या मला जास्त आवडतात आणि मशीन मेड साड्या मी शक्यतो टाळते. हातमागावर बनवलेल्या साड्या खूप सुंदर असतात आणि मला असे वाटते, की यामुळे आपण कामगारांना प्रोत्साहित तर करतोच आणि त्यांना पैसेही मिळतात.

माझा साधा फॅशन फंडा म्‍हणजे मी प्रसंगानुसार व माझ्या मूडनुसार पोशाख परिधान करते. तसेच आरामदायी वाटेल असे पोशाख परिधान करते. कपड्यांच्या रंगांची निवडसुद्धा ऋतूप्रमाणे करावी, जसे उन्हाळ्यात थोडे फ्रेश आणि लाईट किंवा पेस्टल रंगाचे किंवा फ्लोरल प्रिंटचे पोशाख परिधान करावेत. पावसाळ्यात जरा स्कर्ट्‌स, शॉर्ट ड्रेसेस, वन पिसेस असे पोशाख तुम्हाला अगदी खुलून दिसतील. मला कोणी एक विशिष्ट फॅशन आयकॉन नाही. मी सगळ्यांकडून प्रेरणा घेत असते. मग ते माझे घरचे असूदेत, माझे सहकलाकार असूदेत किंवा माझ्या मित्र-मैत्रिणी.

फॅशन टिप्स

जे कपडे आपल्या शरीराला कम्फर्टेबल वाटणार नसतील, ते परिधान करू नयेत.

प्रसंग, तुमचे व्‍यक्तिमत्त्व आणि स्किन टोनला साजेशा रंगांचे पोशाख परिधान करा.

कानातल्‍यांची उत्तम जोडी खरेदी करा, कारण त्‍यामधून तुमचा चेहरा अधिक खुलून दिसतो.

प्रसंगानुसार मेकअप करा; पण त्‍याचा अतिरेक न करता साधा व नैसर्गिक ठेवा.

ट्रेंड्सना फॉलो करणे महत्त्वाचे नसते. तुमच्‍यामधील सर्वोत्तम व्‍यक्तिमत्त्व दिसून येईल असे पोशाख परिधान करा. खाली लोंबणार नाही, खराब नाही होणार किंवा भिजणार नाही अशा प्रकारे ड्रेसेसची निवड करावी.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Web Title: Choose Clothes According Season Clothes According Season

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..