- प्राप्ती रेडकर, पूजा मोईली
मैत्री हे नाते नसून ती एक भावना आहे. अशी भावना ज्यामध्ये आपल्याला सगळ्या नात्यांचं प्रेम मिळू शकतं. असा विचार करणारी अभिनेत्री आणि ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ फेम प्राप्ती रेडकर सांगते की तिची मैत्रीण पूजा मोईली अशीच आहे.
याविषयी प्राप्ती म्हणाली, ‘मी यापूर्वी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘काव्यांजली’ मालिकेत काम केलं होतं. यावेळी पूजानं माझ्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या लूक टेस्ट दरम्यानच मी तिला पहिल्यांदा भेटले आणि तिला पहिल्यांदा बघताक्षणी मला आतून वाटलं, की या मुलीसोबत माझं काहीतरी खास नातं निर्माण होणार आहे.
आमच्या वाईब्ज खूप जास्त मॅच झाल्या. मला सर्वांशी हसून खेळून बोलायला खूप आवडतं; पण म्हणून मी पटकन कोणाशी मैत्री नाही करत. मात्र, मी पूजाशी बोलले, तेव्हा लगेचच तिच्याशी कनेक्ट झाले. तिचा स्वभाव आणि तिचा लाघवीपणा यामुळे ती अगदी क्षणार्धात समोरच्या व्यक्तीला आपलंसं बनवू शकते. मालिकेत तिचं नाव आशू होतं, म्हणून मी तिला आशूच म्हणते. आता ती मालिका संपली; पण तरीही ती माझ्यासाठी कायमच माझी आशू राहणार आहे.
‘मला आठवतंय मी आणि आशूनं त्यावेळी सेटवरचे सगळे क्षण एंजॉय केले. आम्ही सेटवर एक माहौल तयार करायचो, ज्यामुळे आमच्या सोबत बाकीच्यांनाही काम करताना उत्साह वाटायचा. आम्ही नेहमीच एकत्र असायचो, त्यामुळे आमच्यापैकी कोणी एक जण नसली, तरी लगेच प्रश्नांचा भडिमार व्हायला सुरुवात व्हायची आणि आम्हालाही खूप मज्जा यायची.’
पूजा सांगत होती, ‘प्राप्ती वयानं खूप लहान आहे; पण तरीही तिची कामाची समज खूप चांगली आहे. एक व्यक्ती म्हणून मला तिच्याविषयी खूप आदर वाटतो. ती खूप लहान वयात ज्या प्रकारे काम करतेय आणि बदल्यात तिला जी प्रसिद्धी मिळतेय त्याचा जराही गर्व न करता ‘डाऊन टू अर्थ’ राहते ते पाहून खरंच खूप छान वाटतं. ती सगळ्यांशी आपुलकीनं वागते. तिची निरागसता आणि तिचं केअरिंग नेचर मला अतिशय आवडतं.
‘माझा आणि प्राप्तीचा बॉण्ड खूप स्ट्राँग आहे. आम्ही दोघीही आता एकमेकींशी खूप चांगल्या कनेक्ट झालोय. मला प्राप्तीच्या रूपात सगळ्या प्रकारचं प्रेम, काळजी, माया सगळं काही मिळालं आहे आणि मला ती अगदी शेवटपर्यंत माझ्यासोबत हवी आहे. किती वाद होऊ देत, मतभेद होऊ देत शेवटी आम्ही एकत्र येणारच आहोत, हे आम्हाला माहितीये.’
प्राप्तीनं पुढे सांगितलं, ‘आपले मित्र-मैत्रिणी, किंवा आपल्यावर प्रेम करणारी माणसं आपल्यासाठी नेहमीच चांगले विचार करतात. चांगल्या शुभेच्छा देतात; पण आपल्या घरची माणसं ज्या प्रकारे आपल्यावर प्रेम करतात तसं कोणीच नाही करू शकत. आशू मात्र याला अपवाद ठरली. अलीकडेच माझी ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
या मालिकेविषयी मी पहिल्यांदा आशूला सांगितलं, त्यावेळी तिनं हे काम मला मिळावं यासाठी स्वामींकडे नवस केला. जेव्हा या मालिकेसाठी माझं फायनल सिलेक्शन झालं आणि तेव्हाही मी पहिला फोन आशूलाच केला. त्यावेळी तिने स्वामींच्या मठात जाऊन केलेला नवस फेडला. ही गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. आपल्या घरचे आपल्यासाठी हे करतातच; पण आपली मैत्रीणही घरच्यांप्रमाणे प्रेम करते, ही गोष्ट खूप स्पेशल आहे, असते. यामुळेच आशू माझ्यासाठी कायमच खास असेल.’
पूजा म्हणाली, ‘अलीकडेच माझे बाबा वारले. त्यावेळी माझ्या आईसाठी मला स्ट्राँग राहणं गरजेचं होतं. हे प्राप्तीलाही समजत होतं. त्यामुळे मी स्ट्राँग राहावी, मी कमजोर पडता कामा नये म्हणून ती मुलगी माझ्यासोबत थांबली. आणि खरंच ती वेळ अशी होती, की मला कोणाच्यातरी आधाराची खूप गरज होती आणि ते मी न सांगता प्राप्तीला प्रत्येकवेळी समजतं.
असं बऱ्याचवेळा झालंय, की आमच्या दोघींपैकी कोणीही उदास असेल किंवा काही बिनसलं असेल, तर ते आम्हाला न सांगता आपोआपच समजून येतं. रोज आमचा एकत्र कॉल होतोच होतो. कधी कामामुळे तो कॉल नाहीच झाला, तर मग आम्हाला सारखं काहीतरी चुकल्यासारखं वाटंत.
मला खरंच प्राप्तीच खूप कौतुक वाटतं, की आता तिची नवीन मालिका सुरू झाली आहे ज्यामुळे तिचं काम वाढलं आहे; पण तरीही ती तिच्या बिझी शेड्युलमधून माझ्यासाठी पाच मिनिटं का होईना वेळ काढते आणि मला कॉल करून गप्पा मारते. ती माझ्यासाठी खरंच खूप खास आहे. माझी मनापासून इच्छा आहे, की प्राप्ती खूप मेहनत घेतेय, तिची खूप स्वप्नं आहेत. जी लवकरात लवकर पूर्ण होवोत.’
(शब्दांकन : मयूरी गावडे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.