Pune : थंडी बनली स्टायलिश अन्‌ उबदार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter

थंडी बनली स्टायलिश अन्‌ उबदार!

पुणे : हिवाळ्याची चाहूल लागल्यामुळे उबदार कपड्यांची बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. परंतु, पारंपरिक स्वेटर, कानटोपीपेक्षा आता फॅन्सी कपड्यांना विशेषतः महिलांची पसंती मिळत आहे. त्यात स्वेटशर्टस, वेगवेगळे जॅकेट्स, कोट्स, वुलन ब्लाऊज, स्टायलिश मफलरना वाढती मागणी असल्याचे या क्षेत्रातील व्यावसायिकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

हिवाळ्यात उबदार कपड्यांत आता बहुविध पर्याय आले आहेत. नामांकित ब्रॅंडसचाही त्यात समावेश आहे. विशेषतः युवावर्गाची आवड लक्षात घेऊन ब्रॅन्डसने कपड्यांचे डिझाइन्स फॅशनला पूरक तयार केले आहेत. एक बुटीकचालक अजय माहेश्वरी म्हणाले, ‘‘हिवाळ्यात नुसतेच स्वेटर न घालता अन्य पर्यायांचे बरेच ट्रेंडस आले आहेत. वुलन कुर्ती हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून लोकप्रिय होत आहे. त्या आधुनिक, स्टायलिश आणि आरामदायक असतात. तरुणांपासून ते गृहिणीपर्यंत सगळेच हा पर्याय वापरू लागले आहेत. तसेच प्लेन, एक रंगी कुर्ती या कार्पोरेट आणि रॉयल लुक देतात. आणखी एक नवीन ट्रेंड म्हणजेच स्कार्फ. थंडी कमी असली तरी, मॅचिंग स्कार्फ पारंपरिक कपड्यांचीही थंडी बनली स्टायलिश अन्‌ उबदारशोभा वाढवितो.

त्यासोबत पार्टी लुक असणारी वुलन कुर्तीही सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.’’महिला व पुरुषांसाठी विविध प्रकारचे जॅकेट्स बाजारपेठेत आले आहेत. क्रॉप पफर जॅकेट, फर कोट्स, डेनिम जॅकेट, रॅप कोट आदींचा त्यात समावेश आहे. कापड व्यावासयिक संदीप काळे म्हणाले, ‘‘हिवाळा सुरू झाला म्हणजे तसे कपडे घालणे गरजेचे असते. त्यासाठी सध्या महाविद्यालयीन युवतींची गर्दी होऊ लागली आहे. सोबत वेगवेगळे टॉप; अतिशय जाड व उबदार पण दिसायलाही स्टायलिश दिसतात अशा कपड्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. स्कार्फ १५० रुपयांपासून मिळतो तर, जॅकेट्स आणि टॉप्स चारशे-पाचशे रुपयांपासून उपलब्ध आहेत.’’

हिवाळ्यात त्वचेच्या खूप समस्या निर्माण होतात. त्यामुळे शक्यतो सैल कपडे वापरले जातात. त्यासाठी स्टाइलिश लूज जीन्स आहेत. तसेच भारतीय लूक देणारी धोती देखील आहेत. पूर्वी सगळे कानटोपी घालायचे. काही लोकांना तर ती आवडायची ही नाही! पण आता त्यातही अनेक प्रकार आहेत. अनेक रंग, स्टाइल, कापड यांमध्ये विविधता आली आहे.

आजकाल स्टाइल ही प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलते. नुसता ट्रेंड फॉलो न करता लोक आता स्वतःला काय आरामदायी, साजेशी असं आहे, त्याच्याकडे जास्त लक्ष देतात. सध्या मार्केटमध्ये इतकी व्हरायटी बघायला मिळते, की प्रत्येक साइज, रंग, कापड, स्टाइल यांमध्ये उबदार कपडे उपलब्ध आहेत. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी वेगवेगळे जॅकेट्स, वुलन कपडे, विशेषतः स्त्रियांसाठी वेगवेगळे डिझाइन, रंग यांमध्ये कुर्ती, साड्या, ड्रेस, वुलन जॅकेट्स, डेनिम जॅकेट्स पाहायला मिळतात; तर नुसतीच स्टाइल न राहता आपल्या आरोग्याची त्यातून काळजीही घेतली जाते.

- सानिका कुलकर्णी,

कपड्यांच्या ऑनलाइन व्यावसायिक

loading image
go to top