esakal | कोरोना काळात निरोगी आरोग्यासाठी फॉलो करा ५ टीप्स

बोलून बातमी शोधा

corona
कोरोना काळात निरोगी आरोग्यासाठी फॉलो करा ५ टीप्स
sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

सध्या देशात कोविड -१९ चं सावट आहे. परंतु, या विषाणूपेक्षा त्याच्यामुळे निर्माण झालेल्या भीतीचं प्रमाण जास्त आहे. सोशल मीडियावर या विषाणूविषयी अनेक मेसेज, माहिती व्हायरल होत आहे. यात अफवांचादेखील समावेश आहे. त्यातच नागरिक कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता थेट अफवांवर विश्वास ठेवत आहेत. त्यामुळे चुकीची माहिती मिळाल्यामुळे अनेकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. विशेष म्हणजे भीती आणि अतिप्रमाणात चिंता याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. भीतीमुळे शरीरातील अनुकंपी चेतासंस्था (फाईट-फ्लाईट) अतिशय वेगाने कार्य करू लागते. यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते. डोकेदुखी/अंगदुखी, अतिताण, छातीत तीव्र कळा येणे, हृदयविकार,अल्सर, पोटात मळमळण होणे असे आजार होऊ शकतात. जास्त भीतीमुळे अनेक मानसिक आजारदेखील उद्भवू शकतात. पॅनिक अटॅक, डिसोसिएटिव्ह मनोवृत्ती, भीतीदायक विचारांनी पछाडले जाणे, पीटीएसडी, नैराश्य आणि विकृत मनःस्थिती यासारख्या गंभीर मानसिक आजारांचा देखील यामध्ये समावेश असू शकतो. त्यामुळे मनातील ही भीती कमी कशी करावी किंवा या काळात मानसिक आरोग्य कसं राखावं हे जाणून घेऊयात.

भीतीविरोधात लढण्यासाठी आपली परानुकंपी (रेस्ट-डायजेस्ट) चेता संस्था मजबूत करणे महत्त्वाचे असते. यासाठीच्या काही पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.

१. विश्रांती -

दीर्घ श्वसन, योग्य मार्गदर्शनानुसार ध्यान करणे, योगासने, स्ट्रेचिंग, जेकबसनची प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन पद्धत

२. एखाद्या सुखद जागेची कल्पना करणे किंवा सकारात्मक विचार करणे.

३. कृतज्ञता वही -

रोज रात्री झोपण्यापूर्वी अशा तीन चांगल्या गोष्टी लिहून ठेवणे ज्या तुमच्याबाबतीत त्या दिवसभरात घडल्या.

४. मनात येणाऱ्या विचारांची नोंद करणे. तुमच्या मनात जे-जे नकारात्मक विचार येत असतात ते तपासून पहा. त्या विचारांना काही ठोस पुरावा आहे का, ते खरोखरच खरे आहेत का, त्याचा अभ्यास करा.

५. प्रत्येकवेळी आपण 'परफेक्ट' असायला हवे असे अजिबात गरजेचं नाही. कोणासोबतही स्वतःची तुलना करू नका.

६. तुम्हाला जी भीती वाटते आहे त्याबद्दल बोला. गरज भासल्यास, एखाद्या मानसिक आरोग्य तज्ञाची मदत घ्या.

कोविड काळात मन निरोगी व शांत राहावे यासाठी सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी ५ सोप्या टीप्स

१. नियमितपणे थोडं-थोडं खात राहा. एकदम खूप जास्त खाणे किंवा बराच वेळ काहीच न खाणे असे प्रकार करू नका. निकोटीन, अल्कहोल, कॅफिन आणि इतर मादक पदार्थांचे सेवन अजिबात करू नका.

२. स्वतःची एक दिनचर्या ठरवा. कामांची एक नियमित पद्धत ठरवा. कामांमधून मोकळा वेळा काढा, ब्रेक घ्या. एखादा छंद जोपासा. तुमचे रोजचे काम झाले की विरंगुळ्यासाठी काही गोष्ट करा.

३. भरपूर झोपा. पण त्याबरोबरीनेच दररोज व्यायाम देखील करा. दीर्घ श्वसन, योगासने, स्ट्रेचिंग करा आणि आराम तंत्रांचा वापर करा.

४. लोकांसोबत बोलताना, वागताना सकारात्मकता बाळगा. मित्रमंडळी, कुटुंबीय यांच्यासमवेत सकारात्मक किंवा विनोदी गोष्टी शेअर करा. नकारात्मक विचार, गोष्टी किंवा बातम्या पाहणे, शेअर करणे, फॉरवर्ड करणे टाळा. तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या आणि सकारात्मक गोष्टींची आठवण स्वतःला पुन्हा पुन्हा करून द्या.

५. या संधीचा वापर इतरांना मदत करण्यासाठी करा. आपला बळी जात आहे असे विचार जर तुमच्या मनात येत असतील तर त्या विचारांना थारा देऊ नका. स्वतःच्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण मिळवा. शांत राहा. जर तसे करणे शक्य होत नसेल तर तुमच्या जवळच्या मानसिक आरोग्य तज्ज्ञाशी संपर्क साधा.

मानसिक गैरसमज आणि तथ्ये

१. गैरसमज : नेहमी हसत राहावे, नेहमी आनंदी राहावे.

तथ्य - दुःख किंवा नैराश्य यासारख्या नकारात्मक भावना दाबून टाकून चेहऱ्यावर खोटे हसू आणल्याने तुम्हाला अधिक जास्त त्रास होऊ शकतो. स्वतःच्या भावनांचा योग्य प्रकारे स्वीकार करणे आणि त्या व्यक्त करणे तुमच्यासाठी जास्त उपयोगी ठरू शकते.

२. गैरसमज : संताप बाहेर काढल्याने तुम्ही रागावर विजय मिळवू शकता.

तथ्य - शांत होण्याऐवजी संताप बाहेर काढल्याने तुमच्या मनातील राग अधिक जास्त घट्ट होतो, तुम्हाला अधिकाधिक राग येतो आणि तो जास्त काळ टिकून राहतो. तुम्हाला ज्या गोष्टीचा राग आला आहे त्यापासून काही काळ दूर राहा, मनात उत्पन्न झालेल्या उद्रेकाला वाट करून देण्यासाठी व्यायाम किंवा तत्सम काहीतरी काम करा, तसेच तुमच्या रागाचे नेमके कारण काय ते जाणून घेणे जास्त प्रभावकारी ठरते.

३.गैरसमज : अल्कहोल सेवनामुळे चिंता दूर होते.

तथ्य - अल्कहोल सेवनामुळे चिंता दूर होत नाही किंवा अल्कहोल कोणालाही कोविड-१९ संसर्गापासून वाचवू शकत नाही. खरे तर, अल्कहोल खूप हानिकारक आहे कारण ते तुमची रोगप्रतिकार शक्ती कमजोर करते व आरोग्याच्या समस्या उत्पन्न होण्याचा धोका वाढतो.

(डॉ. शौनक अजिंक्य हे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टन्ट सायकियाट्रिस्ट आहेत.)