सुंदर अनुभव

मला आईपणाची चाहूल लागली, तेव्हा मी ‘युवा डान्सिंग क्वीन’ हा डान्स रिॲलिटी शो करत होते. त्याचं चित्रीकरण मुंबईमध्ये सुरू होतं. बॅक टू बॅक आमचे खूप डान्स परफॉर्मन्सेस होते.
dhanashri kadgaonkar
dhanashri kadgaonkarsakal

मला आईपणाची चाहूल लागली, तेव्हा मी ‘युवा डान्सिंग क्वीन’ हा डान्स रिॲलिटी शो करत होते. त्याचं चित्रीकरण मुंबईमध्ये सुरू होतं. बॅक टू बॅक आमचे खूप डान्स परफॉर्मन्सेस होते. सेमीफायनलमध्ये सहा मुलींची निवड झाली, त्यात मीसुद्धा होते. अंतिम फेरी दणक्यात करायची, त्यासाठी थोडासा आराम करायचा म्हणून प्रत्येक जण आपापल्या गावी गेले होते. मीही पुण्याला आले होते. त्यानंतर चार दिवसांतच लॉकडाऊन लागलं.

लॉकडाऊन नंतर वाढत गेलं, त्यामुळे सगळं बारगळलंच. मी प्रचंड वर्कहॉलीक आहे; मात्र कोरोनात अचानक खूप दिवस आपण घरी होतो. काम तर बाजूलाच राहिले होते. त्याकाळात आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी खूप तडजोड करावी लागली; पण आपण त्यातूनच मार्ग शोधतच होतो. 

कोरोनापूर्वी मी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत काम करत होते. गरोदर राहून अडीच महिने झाले होते, त्यावेळी मला प्रॉडक्शन हाऊसनं विचारलं,  की ‘आपण ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचा पुढील भाग करत आहोत. तू काम करशील का?’ तेव्हा मी प्रेग्नंट होते. या मालिकेचं अन् माझं एक वेगळंच नातं होतं.

कोल्हापूरशी नाळ जुळली होती. मलाही पुन्हा काम करावंसं वाटत होतं; पण कोरोनासारख्या सगळ्या रिस्की गोष्टी होत्या. मला पोटातल्या बाळाचीही काळजी घ्यायची होती. त्यामुळे मी नकार दिला.

आई होणं ही गोष्ट आनंददायी असली, तरी हे एक आव्हानही असतं. त्या काळात तुम्ही मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या  वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असता. अनेक लोक तुम्हाला अनेक गोष्टी सांगत असतात, गुगल तर सातत्याने वेगवेगळं सांगत असतं.

त्यामुळे इन्स्टाग्राम किंवा इतर माध्यमांवर आई होणं किती आनंददायी आणि छान आहे, हे बघितलेलं असलं तरी खऱ्या जीवनात ती एक कसोटीच असते. अनेक गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात, तुमचं शेड्यूल्ड ठरवावं लागतं. मात्र, या अनुभवातून जाणं खूप छान वाटतं.

आई झाल्यानंतर पहिलं वर्ष बाळाच्या हालचाली पाहण्यातच जातं. त्यात ते पालथं कधी पडेल, ते रांगेल कधी, उभं कधी राहील,  कधी चालेल, बोलायला कधी लागेल, हे सतत लोकांना विचारणं, गुगल करणं हे शिकण्यातच माझं पहिलं वर्ष गेलं. माझा मुलगा कबीर दीड वर्षाचा होता.

त्यानंतर मी ‘तू चाल पुढं’साठी ‘झी मराठी’सोबत काम सुरू केलं. तीन महिने तर मला शूटिंग जिथं व्हायचं, तेथील पायऱ्या चढताना असं वाटायचं, की मी पळून जाऊ का? मी चूक केलीय का? कबीरचं सगळे नीट करत असतील का? मात्र, घरातील सगळे कबीरला खूप चांगलं सांभाळत होते.

आई झाल्यानंतर मला खलनायिकेच्या भूमिकेबाबत विचारलं, तेव्हा मला वाटत होतं, की ही भूमिका घ्यायला नको, कारण आता आपण अतिशय सुंदर मूड अनुभवतोय. यातून मला फक्त सकारात्मक ऊर्जा पाहिजे होती. नकारात्मक पात्र घेतलं तर त्याचा खोल परिणाम आपल्या मनावर होईल का? तो कबीरला दिसेल का?... वगैरे वगैरे.

चित्रीकरणासाठी मुंबईत गेल्यानंतर पहिले चार महिने कबीर माझ्यासोबत नव्हता, कारण मी माझ्या मैत्रिणीकडे राहत होते. नंतर घर घेतलं आणि आम्ही सगळे राहायला आलो. अभिनयात पडलेला अडीच ते तीन वर्षांचा गॅप भरून काढण्याची ताकद मिळाली. आई म्हणून मी खूप मजा करत होते, कारण कबीर माझ्यासोबतच होता. फॅमिली सोबत राहत होती. हे सर्व करताना करिअरकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला नाही.

माझ्या अनुभवावरून सांगायचं झालं, तर सुरुवातीला कबीर एकदा इतका रडला, तेव्हा मी आणि दुर्वेश खूप घाबरलो होतो. तेव्हा आम्ही दोघंही रडलो.  आपलं चुकतंय का काही, आपल्याला येत नाही का नीट सांभाळायला, या सगळ्या भावनांतून आम्ही दोघे गेलो; पण तो काळच तसा असतो.

नंतर  बाळ का रडत असतं, ते समजत जातं. खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात. आनंद, दुःख किंवा त्याला पडणारं स्वप्न किंवा त्याला काही काचत असेल, दुखत-खुपत असेल, तेव्हा याची भावना व्यक्त करण्याची एकच गोष्ट असते ती म्हणजे रडणं. ते मला नंतर कळत गेलं. आज मी म्हणीन, की आई होण्याचा तो निर्णय सुंदर होता. आईपणामुळे वेगळी दिशा मिळते, जगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन बनतो.

करिअरिस्ट मुलींना टिप्स....

  • आईपण आणि करिअर हे खूप वैयक्तिक विषय आहेत. ती मुलगी  मानसिकरीत्या, शारीरिकरीत्या तयार नसेल, तोपर्यंत तिला कोणी आग्रह करू नये.

  • मी एका छान जिवाला जन्म देणार आहे, त्याच्यासाठी मी छान वेळ देऊ शकते, हा विचार करूनच निर्णय घ्या.

  • अनेक गोष्टींत तडजोड करण्याची तयारी पाहिजे, कारण आई झाल्यानंतर  खूप गोष्टी बदलतात.

  • आपल्या करिअरचं कसं होईल, अशी चिंता मुलींना असते; पण आपल्यामध्ये टॅलेंट असेल तर नक्कीच आपण त्याही पुढे जाऊ शकतो. कारण बाळ हा ‘लकी चार्म’ आहे. कबीर आला आणि आमचं ठाण्यात घर झालं.

  • आपल्या जोडीदाराची पूर्ण साथ प्रत्येक गोष्टीत असली पाहिजे, कारण त्यातूनच आपल्यालाही उभारी मिळत असते.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com